दैनिक स्थैर्य । दि. १३ ऑक्टोबर २०२२ । सातारा । तसं बघायला गेलं तर केशव सीताराम ठाकरे म्हणजेच प्रबोधनकार ठाकरे आणि भाऊराव पाटील म्हणजेच आपले कर्मवीर अण्णा या दोघांच्या नात्यांचा उल्लेख शब्दांमध्ये करताना आपण फ्रेंड, फिलॉसॉफर, गाईड अशा उपमा देऊन करतो. पण खऱ्या अर्थाने पाहिलं तर हे नाते उपमांच्या पलीकडचे होते. प्रबोधनकार ठाकरे आणि कर्मवीर भाऊराव पाटील ही दोन थोर व्यक्तिमत्वं महाराष्ट्राच्या इतिहासाला आणि भूगोलाला वळण लावून गेली. प्रबोधनकारांबद्दल बोलायचं झालं तर महात्मा फुले यांच्या सत्यशोधनाचा विचार पुढं नेणारे आक्रमक विचारवंत, भिक्षुकशाहीचा कर्दनकाळ ठरलेले समाजसुधारक, मराठी पुरोगामी पत्रकारितेला नवी दिशा देणारे बंडखोर लेखक-संपादक, जातीनिष्ठ इतिहास लेखनाचा फोलपणा दाखवून इतिहासाची पुराव्यांचे आधारे सत्य व नवी मांडणी करणारे इतिहासकार, महाराष्ट्रभर सातत्याने फिरून विद्रोहाची पेरणी करणारे ज्वलंत वक्ते, समाज
सुधारणांना जनसामान्यांपर्यंत पोचवण्यासाठी सर्वस्व पणाला लावणारे नाटककार, दिग्दर्शक आणि निर्मातेही, मोजक्याच पण ठसकेबाज भूमिका करणारे लक्षवेधी अभिनेते, सार्वजनिक नवरात्रोत्सवाचे संस्थापक, संयुक्त महाराष्ट्र प्रत्यक्षात आणण्यासाठी वयाच्या सत्तरीत तुरुंगवास भोगणारे आंदोलनाचे नेते, गेल्या अर्धशतकापेक्षाही जास्त काळ महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी असणाऱ्या ठाकरे कुटुंबाचे प्रेरणास्थान आणि याशिवाय लेखक, कवी, संगीतकार, सतारवादक, पटकथालेखक, चित्रकार, फोटोग्राफर, शिक्षक, उद्योजक, विक्रेते, जनसंपर्क अधिकारी अशा विविध भूमिकांत वावरलेल्या अफाट बहुआयामी व्यक्तिमत्वाचं कर्तुत्व शब्दांत पकडणं कठीण आहे.
प्रबोधनकार ठाकरे आणि कर्मवीर भाऊराव पाटील हे तसे समवयस्कच होते; पण भाऊराव त्यांना वडिलकीचा मान देत. एवढेच नव्हे, तर त्यांना ते मार्गदर्शक मनात. या दोघांची पहिली भेट १९२२ च्या एप्रिल महिन्यात शिवजयंतीच्या निमित्ताने झाली. साताऱ्याच्या शिवजयंतीच्या कार्यक्रमाला ‘व्याख्याता’ म्हणून भाऊरावांनी प्रबोधनकारांना बोलावले होते. त्या दोन-तीन दिवसात प्रबोधनकारांच्या भाषणांनी व भाऊरावांच्या सत्यशोधक जलशांनी साताऱ्यात धमाल उडवून दिली. भाऊरावांनी आपल्या वगनाट्यात तरुण ब्राह्मण विधवांची दुःखे अशा प्रभावी शब्दांत मांडली, की ऐकणाऱ्यांची मनेही हेलावून गेली. समोर बसलेल्या जनसमुदायातून नाभिक समाजाची शे-दीडशे मंडळी उभा राहिली आणि त्यांनी जाहीर केले – “उद्यापासून जो नाभिक बायाबापड्यांना शिवेल तो आपल्या जन्मदात्या आईला हात लावील!” भाऊराव पाटील काय चीज आहे, हे प्रबोधनकारांच्या या वेळी लक्षात आले. कर्मवीर अण्णांचे चरित्र लिहून पुस्तकरूपाने १९५७ रोजी Dr. Anjilvel V. Matthew यांनी प्रकाशित केले. यालाच बरेचजण कर्मवीर भाऊराव पाटील यांचे पहिले चरित्र असे म्हणतात. पण अण्णांचे पाहिले चरित्र हे प्रबोधनकार ठाकरे यांनी लिहले आहे. प्रबोधनकार ठाकरे ‘प्रबोधन’ या नावाचे एक नियतकालिक चालवायचे. ‘प्रबोधन’ या
नियतकालिकाने घडवलेली जागृती हा महाराष्ट्राच्या समाज प्रबोधनाच्या, समाज सुधारणेच्या आणि पत्रकारितेच्या इतिहासाचा फार महत्वाचा भाग आहे. आणि हेच महत्व स्पष्ट करताना ‘मराठी वृत्तपत्रांचा इतिहास’ या ग्रंथात रा. के. लेले म्हणतात की “ठाकरे
यांच्या ‘प्रबोधन’ पत्राची कारकीर्द अवघी पाच-सहा वर्षांचीच होती; पण तेवढ्या अल्पावधीत त्याने केलेली वृत्तपत्राच्या व सामाजिक चळवळीच्या क्षेत्रांतील कामगिरी न विसरता येण्यासारखी आहे. ठाकरे ह्यांच्या पत्राचे स्वरूप राजकीय प्रश्नांवर भर देणारे नव्हते. आगरकरांप्रमाणे सामाजिक सुधारणांचा पुरस्कार करणारे हे पत्र होते. आगरकरांच्या सामाजिक सुधारणांचा पाया अत्यंत शास्त्रशुद्ध होता; पण त्यांनी त्या सुधारणांचा पुरस्कार केला, त्या पांढरपेशा वर्गापुरत्याच मर्यादित होत्या. त्यांच्या सुधारणावादाचे आवाहन बहुजन समाजापर्यंत पोचले नाही. त्यांनी म.ज्योतीराव फुले यानी प्रसृत केलेले विचार व केलेले कार्य ह्यांची दखल घेतल्याचेही आढळत नाही. या दृष्टीने पाहिले तर ठाकरे ह्यांनी ‘प्रबोधना’द्वारा ज्या सामाजिक सुधारणांचा पुरस्कार केला त्या अधिक व्यापक होत्या……या
दृष्टीने ह्यांचे ‘प्रबोधन’ आगरकरांच्या पुढे काही पावले गेलेले होते” . ‘प्रबोधनचा’ पहिला अंक १६ ऑक्टोबर १९२१ ला प्रकाशित झाला. पहिले दोन वर्षे म्हणजे १९२१-१९२२ आणि १९२२-१९२३ या प्रकाशन वर्षांत ‘प्रबोधन’ मुंबईतून पाक्षिक म्हणून नियमित प्रकाशित झालं आहे. दोन्ही वर्षी दर महिन्याच्या १ आणि १६ तारखेला ‘प्रबोधन’ प्रकाशित होत असे. या दोन वर्षांचे मिळून सध्या ४८ अंक उपलब्ध आहेत. तिसऱ्या प्रकाशन वर्षांत ‘प्रबोधन’ सातारा रोडहून प्रकाशित होऊ लागले. १९२३-१९२४ या प्रकाशन वर्षाचे पाक्षिक म्हणून पहिले १८ अंक सलग निघाले आहेत. त्यानंतर ‘प्रबोधन’ दहा महिने प्रकाशित होऊ शकलं नव्हतं. चौथ्या वर्षापासून ‘प्रबोधन’ मासिक बनून पुण्याहून प्रकाशित होऊ लागलं. चौथ्या वर्षांत एप्रिल १९२५ पासून मे १९२६ या १४ महिन्यांत ‘प्रबोधन’ चे १२ अंक प्रकाशित झाले. पाचव्या प्रकाशन वर्षांतला पहिला अंक जुलै १९२६चा आहे. तेव्हापासून नोव्हेंबर १९२७ पर्यंत दहा अंक प्रसिद्ध झालेत. त्यानंतर तब्बल दोन वर्षांचा
खंड आहे. ऑक्टोबर १९२९ मध्ये पाचव्या प्रकाशन वर्षांचा ११-१२ वा जोडअंक प्रकाशित झालाय. सहाव्या प्रकाशन वर्षांत नोव्हेंबर १९२९ पासून मार्च १९३० पर्यंत सलग पाच अंक प्रकाशित झाले. सहाव्या प्रकाशन वर्षांत नोव्हेंबर १९२९ पासून मार्च १९३० पर्यंत सलग पाच अंक प्रकाशित झाले आहेत. त्यानंतर कोणतीही घोषणा न करता ‘प्रबोधन’ बंद पडलं. अधिक नेमकेपणाने सांगायचं झालं तर त्यानंतर ‘प्रबोधन’ चा कोणताही अंक आज उपलब्ध नाही.
कर्मवीर अण्णांची अनेक चरित्रे प्रकाशित झालेली आहेत. त्यातले पहिले विस्तृत चरित्र हे Dr. Anjilvel V. Matthew यांनी १९५७ साली लिहले. ते रयत शिक्षण संस्थेच्या सातारा येथील छत्रपती शिवाजी कॉलेजचे प्राचार्य देखील होते त्यांनी कर्मवीर अण्णांच्या जीवनकार्याचा प्रवास जवळून पाहिला होता. पण प्रबोधनकार ठाकरेंनी २९ वर्षे अगोदर म्हणजेच १९२६ साली आपल्या ‘प्रबोधनच्या’ १९२६ सालच्या ५ व्या वर्षीच्या २ऱ्या अंकात ‘सत्यशोधक भाऊराव पाटील यांचा अल्पपरिचय’ या नावाने अण्णांचे एक छोटेसे चरित्र प्रकाशित केले होते. हे चरित्र यासाठी अत्यंत मौल्यवान आहे की १९२६ पर्यंत अद्यापि भाऊरावांना ‘कर्मवीर’ ही पदवी लावली गेली नव्हती. त्यांचे शिक्षणप्रसाराचे कार्य हे महाराष्ट्रात पसरू लागले होते. महाराष्ट्राला त्यांची पहिली ओळख ‘हाडाचा सत्यशोधक’ म्हणूनच होती. अशा या सत्यशोधकाचे चरित्र प्रबोधनकार ठाकरेंनी कोल्हापूरच्या डांबर प्रकरणापर्यंत दिले आहे. हे चरित्र लहान असले तरी जो काही पहिला भाग प्रबोधनकारांच्या हातून लिहून झाला. त्याचेही महत्व कमी आहे असे नाही. या छोट्याश्या चरित्राची विभागणी प्रबोधनकारांनी ७ भागात केली आहे. १)सातारचे भाऊराव पाटील २)घराणे आणि पूर्वसंस्कार ३)पहिला अस्पृश्योद्धार ४)आमदार ज्ञानदेव ध्रुवनाथ घोलप
M.L.C. ५) कृषिकर्म सुधारणा मंडळ ६) कोल्हापुरी राजकारणी गडांतर ७)कोल्हापूर पोलीसांचे अत्याचार. त्याकाळी भाऊरावांना ‘पाटील मास्तर’ म्हटले जाई. या पाटील मास्तरांविषयी अखिल सातारा जिल्ह्यात सामान्य लोकांत, विशेषतः अस्पृश्य समाजात किती, आदरभाव वसत होता, हे या चरित्रातील एका परिच्छेदावरून ध्यानात येईल. त्यात प्रबोधनकार म्हणतात, “भगवंताने देशसेवेचा ताम्रपट भिक्षुकांनाच एकट्याला दिलेला नाही. त्यांच्या बऱ्यावाईट अभिप्रायावर जगण्या मरण्याची बळजबरी सुरु होणें शक्य नाही. त्यांच्या कारस्थानाला
कोणी कितीही बळी पडला, तरी तो जर अस्सल निष्ठावंत कर्मयोगी असेल, तर त्या कारस्थानाने त्याचा रोमही वाकडा होणार नाही. भिक्षुकशाहीच्या हाती शिक्षणप्रसार व वृत्तपत्रांचे प्रचंड शिंगाडे असल्यामुळे त्यांना आपल्या भिक्षुकी गुंडगिरीचा ध्वनि जबरदस्त
घुमविता येतो. परंतु तेवढ्यामुळे असें समजण्याचे मुळीच काही कारण नाही, की महाराष्ट्रांत त्यांच्या कंपूशिवाय दुसरे कोणी मितभाषी एकनिष्ठ स्वार्थत्यागी देशसेवक व जनसेवक नाहीत. आहेत, ठिकठिकाणी निश्चयाने, एकनिष्ठेने आपापली विहित कर्तव्ये मिटल्या तोंडी
करणारी अनेक नररत्ने आहेत…… सातारचे भाऊराव पाटील हे नांव भिक्षुकी कंपूत मोठ्या अचक्यादचक्याचे झाले आहे. सातारा जिल्यातच काय, पण अवघ्या महाराष्ट्रांत हे नांव निघतांच ब्राह्मणेत्तर जनतेंत एका जोरदार चैतन्याचे वारे स्फुरण पाऊ लागते. टिळकी पुण्याईवर महाराष्ट्राच्या सर्वकारणी नेतृत्वाचे आसन फूटफाकट पटकविणाऱ्या नरसोपंत केळकरांपासून तो थेट टिळकी कारस्थानांना बळी पडून हतप्रभ झालेल्या अच्युतराव कोल्हटकरांपर्यंत असा एकही भिक्षुक सापडणार नाही की ज्याला भाऊराव पाटीलाची कर्मयोगी कदर आणि बहुजन समाजावरील त्यांचे जिव्हाळ्याचे वजन माहित नाही.
कृतज्ञतेला पारखा न झालेला असा कोणता अस्पृश्य आहे की जो हे नाव ऐकताच या ‘पाटील मास्तरा’ विषयी आदरयुक्त भावनेचे आनंदाश्रु ढाळणार नाही. सातारा जिल्ह्यांत असा एकही शेतकरी नाही की भाऊरावाने ज्याच्या माजघरापर्यंत प्राथमिक शिक्षणाचे लोण नेऊन
पोचविलेले नाही. ब्राह्मणेत्तर बहुजन-प्रबोधनाची अशी एकही संस्था, चळवळ, परिषद, सभा, जलसा, व्याख्यानमाला, जत्रा, किंवा शाळा आढळणार नाही की जिथं भाऊराव पाटलाचे श्रम खर्ची पडलेले नाहीत. इतकी सर्वस्पर्शी व सर्वव्यापी चळवळ करणारी ही व्यक्ति कोण, कशी आहे, कसल्या ध्येयाच्या मागे लागलेली आहे इत्यादी सर्व तपशील महाराष्ट्रापुढे मांडण्याचा मान प्रथमतः प्रबोधनालाच मिळत आहे, हे या कलमाचे भाग्य होय. भाऊरावांचे चरित्र म्हणजे तरुण महाराष्ट्राला जितके हृदयंगम तितकेच आत्मप्रबोधनात्मक वाटेल, अशी आशा आहे. आमची अशी खात्री आहे की भाऊराव जर ब्राह्मण असते, निदान भटाळलेले असते, तर भिक्षुकशाहीने त्यांना आजला आकाशापेक्षांही उंच उचलून धरले असते.”
प्रबोधनकारांनी लिहलेले भाऊरावांचे हे चरित्र संपूर्ण अधिकृत, संशोधित, अद्ययावत आणि विश्वासार्ह आहे. हे चरित्र सध्या महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने ‘प्रबोधन’ मधील प्रबोधनकार या ग्रंथाच्या ३ऱ्या खंडामध्ये पृष्ठ क्रमांक ९० वर प्रकाशित केले आहे.
सर्वांनी ते अवश्य वाचावे.