कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कार्यातील मजबूत आधार – पै.इस्माईलसाहेब मोहम्मदसाहेब मुल्ला…

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १३ डिसेंबर २०२२ । सातारा । महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, यांच्या नंतर पुरोगामी विचारांचा प्रसार रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ.बाबासाहेब आंबेडकर व साने गुरुजी यांनी केला. स्वातंत्र्यपूर्व कालखंडात अज्ञान, अंधश्रद्धा,   अस्पृश्यता, महिला शिक्षण याकडॆ पाहण्याचा दृष्टिकोन निश्चितच विवेकवादी, विज्ञानवादी तयार होण्यास योग्य नव्हता अशा परिस्थितीत कर्मवीर भाऊराव पाटील यांनी या सर्व समस्यांचे निराकरण केवळ शिक्षण आणि शिक्षणच आहेत हे जाणले व  1909 मध्ये सांगली जिल्ह्यात दुधगाव येथे  ग्रामस्थांच्या मदतीने सर्व जाती-धर्माच्या मुलांसाठी दुधगाव विद्यार्थी आश्रम सुरू केला हा प्रयोग चांगलाच यशस्वी झाला यानंतर 4 ऑक्टोबर 1919 रोजी भाऊराव यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना  ली. सुरुवातीला स्वतःचा भाऊ बंडू व इतर समाजाची 4 मुले त्यामध्ये नानासाहेब माने, तुकाराम माने, मोहिते, शंकर कांबळे अशा  5 मुलांसह  शिक्षण संस्थेची सुरुवात केली. गावोगावी जाऊन आर्थिकदृष्ट्या दुर्बल, होतकरू विद्यार्थ्यांचा शोध घ्यायचा आणि वसतिगृहात आणून मुलांसाठी स्वतः खर्च करून, देणगी जमा करून त्यांना जेवण व शिक्षणाची संधी निर्माण करून दिली.

भाऊराव पाटील यांनी सुरू केलेल्या वसतिगृहात पै. इस्माईलसाहेब  मुल्ला, बॅरिस्टर पी. जी.पाटील, माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर बाबासाहेब भोसले, क्रांतिवीर प्रा.ग.प्र. प्रधान,  माजी कुलगुरू प्राचार्य शिवाजीराव भोसले, माजी चेअरमन व संविधान समितीचे सदस्य रामचंद्र
मनोहर नलावडेसाहेब, आप्पासाहेब पाटील असे अनेक क्रांतिवीर व जेष्ठ नेते यांची जडण-घडण कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. पुढे या महान विभूती यांच्या त्याग व कृतिशील विचारांचा वारसा आजही महाराष्ट्राला व पर्यायाने भारत भूमीला प्रेरणादायी व दिशादर्शक, चिरंतन प्रेरणादायी आहे. भाऊराव पाटील यांनी चिराग सी सोच रखिये, मत सोचो की घर किसका रोशन हुआ  या विचारानुसार अनेक प्रेरणादायी व निर्लोभी व्यक्तिमत्त्व घडविले. यामागे सुद्धा भाऊरावांची दूरदृष्टी होती. आपल्या नंतर हे शैक्षणिक व सामाजिक कार्य, देशहितासाठी पुढील पिढी भाऊराव पाटील यांनी तयार करून ठेवली होती. भाऊराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेले व रयत शिक्षण संस्थेच्या पायातील मजबूत दगड म्हणजे पै. इस्माईलसाहेब मुल्ला होय. पै.इस्माईलसाहेब मुल्ला यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील काले गावी 1900 मध्ये झाला. वडिलांचे अकाली निधन परिस्थिती हलाखिची त्यावेळी मुल्ला साहेबांचे वय 10 वर्षाचे होते. 1923 नंतर  व्हर्नक्यूलर फायनल (7 वी) पुणे विभागात 10 जिल्ह्यात प्रथम क्रमांकाने पास झाल्यावर भाऊराव पाटील यांनी मुल्ला साहेबांची बुद्धिमत्ता व शिक्षणाविषयी आस पाहून सातारा येथे वसतिगृहात दाखल करण्यासाठी मुल्ला साहेब यांच्या घरी गेले. भाऊराव पाटील यांनी त्यांच्या आईला सांगितले तुमचा मुलगा हुशार आहे, कर्तृत्ववान आहे त्याला पुढील शिक्षणासाठी मी सातारा येथे वसतिगृहात घेऊन जातो. सुरुवातीला मुल्ला साहेबांच्या आई साताऱ्याला आपल्या मुलाला भाऊराव पाटील यांच्या ताब्यात द्यायला तयार होईना अनेकांनी समजूत काढली की तुमचा मुलगा हुशार आहे भविष्यात तो खूप मोठा अधिकारी होईल. नावलौकिक मिळवेल अशी भाऊरावांनी ग्वाही दिली शेवटी गावच्या चार जाणकार मंडळींच्या मध्यस्थीने आईने मुल्लासाहेबांना भाऊराव पाटील यांच्या स्वाधीन केले. यानंतर भाऊराव पाटील व मुल्ला साहेब यांचे घनिष्ठ संबंध तयार झाले.

सर्व जाती – धर्माच्या मुलांसमवेत एकत्र बसून अभ्यास करणे, खेळणे, बागेत काम करणे अशी रोज दिनचर्या असे. मुल्ला साहेब यांच्या आई दर 2 -3 महिन्यातून एकदा आपला मुलासाठी गोड जेवण घेऊन येत. भाऊराव पाटील सर्व विद्यार्थ्यांना शिक्षणाविषयी मार्गदर्शन
करीत थोर महामानव व त्यांचे शिक्षण विषयक विचार विद्यार्थ्यांना ऐकवित. ज्ञानाच्या जोरावरच तुम्ही उत्तम काम करू शकता, तुम्ही खूप-खूप शिका, मोठे व्हा समाजासाठी, देशासाठी आपले योगदान द्या. या  कर्मवीरांच्या विचारांकडे मुल्ला साहेब आकर्षित झाले.
आपण खूप- खूप मेहनत घ्यायची, खूप शिकायचे, वेळ वाया न घालवता मुल्लासाहेब रिकाम्या वेळेत इंग्रजी भाषा शिकण्यासाठी स्वतः वाचन करीत अनेक नवनवीन शब्द पुन्हा – पुन्हा वाचन करायचे, अपरिचित शब्दांची सूची तयार करून शिक्षकांकडून ते शंकांचे निरसन करून घेत. हा त्यांचा नित्यक्रम असायचा आणि त्यामुळेच जिद्द व चिकाटीच्या जोरावर  1928 मध्ये ते मॅट्रिक  परीक्षेत उत्तम यश मिळविले. हे पाहून भाऊराव पाटील यांना सुद्धा खूप हेवा वाटत. तू शिकत रहा, तू शिकत रहा खूप – खूप मोठा हो असे भाऊराव उदगार काढीत. पुढे महाविद्यालयीन शिक्षणासाठी भाऊरावांनी डेक्कन कॉलेज, पुणे येथे प्रवेश मिळवून दिला अर्थशास्त्र व इतिहास विषयासह त्यांनी पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर भाऊराव पाटील यांच्या सल्ल्यानुसार पुना लॉ कॉलेज मध्ये कायद्याचा अभ्यास पूर्ण करण्यासाठी प्रवेश घेतला. त्यावेळी भाऊराव पाटील यांनी पुणे येथील पांडवनगर, वडार वाडी येथे सुरू केलेल्या वसतिगृहात प्रवेश दिला त्यावेळी बऱ्याच वेळा आर्थिक अडचण येत. त्यावेळी मुल्ला साहेब खाजगी शिकवणी घेत व त्यातून शिक्षणखर्च भागवित. खरे तर मुल्ला साहेबांना भारतीय सैन्य दलात जाण्याची मनापासून इच्छा होती. पण भाऊराव पाटील यांचे शैक्षणिक व सामाजिक कार्य पाहून त्यांनी भाऊरावांना त्यांच्या कार्यात वाहून घेण्याचे ठरविले.

1937 मध्ये मुल्ला साहेब एल. एल.बी. ची अंतिम परिक्षेवेळी आईचे निधन झाले. पण परीक्षेवर परिणाम होईल म्हणून आईचे  निधन झाले हे सांगितले नाही. आपण आईच्या अंत्यविधीस उपस्थित राहू शकलो नाही, आईला चांगले दिवस दाखवू शकलो नाही ही गोष्ट
अगदी शेवटपर्यंत मनाला लागून राहिली. पुढे भाऊराव पाटील यांनी प्रत्येक वेळी स्वतः जातीने लक्ष देऊन त्यांना आधार दिला. आपल्या शिक्षणाचा उपयोग वंचित समाज व रयत शिक्षण संस्थेला व्हावा यासाठी मुल्ला साहेब प्रयत्न करू लागले. पुढे एल.एल.बी. चे शिक्षण सुद्धा
उत्तम गुण मिळवून पास झाले. त्यानंतर 1937 मध्ये एका कार्यक्रमात महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली भाऊराव पाटील यांच्या उपस्थितीत  12 विद्यार्थ्यांनी  बहुजनांच्या शिक्षणासाठी कार्य करणाऱ्या रयत शिक्षण संस्थेच्या शैक्षणिक व सामाजिक कार्यासाठी, सेवेसाठी आजन्म वाहून घेईन अशी शपथ घेतली. त्यावेळी पहिली प्रतिज्ञा (शपथ) मुल्ला साहेबांनी घेतली. पुढे 1951 पासून 1973
पर्यंत ऑनररी (विनावेतन) रयत शिक्षण संस्थेचे सचिव म्हणून काम निरपेक्ष व निस्वार्थ भावनेने केले. 40 वर्षे रयत शिक्षण संस्थेचे काम करीत राहिले. मुल्ला साहेबांनी ठरविले असते तर त्या काळात एवढे उच्च शिक्षण घेऊन लाखो रुपये कमवू शकले असते. त्यावेळी 1928
मध्ये मुल्ला साहेब मॅट्रिक परीक्षा उत्तम गुण मिळवून पास झाले होते. त्यावेळी ब्रिटीश राजवटीत महसूल विभागात पाहिजे ते पद व किमान 300 रुपये प्रति महिना नोकरी मिळाली असती. त्यावेळी सोन्याचा भाव 25 रुपये तोळे  होता. पाहिजे ते पद, प्रतिष्ठा, मानसन्मान,
संपत्ती मिळविता आली असती. अनेकांनी स्वार्थ समोर ठेवून मिळविली सुद्धा. पण मुल्ला साहेबांनी अडचणीच्या काळात रयत शिक्षण संस्थेची मदत, कर्मवीर भाऊराव पाटील व सौ.लक्ष्मीवहिनी यांचा त्याग व प्रेरणादायी कार्य व संस्थेला आजन्म वाहून घेण्याची शपथ
यामुळे आपले वचन व दिलेला शब्द अगदी शेवटपर्यंत पाळला. निष्ठा म्हणजे काय हे मुल्ला साहेबांचे विचार व कार्य पाहून समजते.

मुल्ला साहेब सचिव असताना (1951 ते 1973) खऱ्या अर्थाने वटवृक्ष बहरत गेला. भूख, तहान, स्वतःचे कुटुंब यांची तमा न बाळगता रयत शिक्षण संस्थेचे प्रश्न सोडविण्यासाठी अथक परिश्रम घेतले. कोणतीही संस्था निर्लोभी, चारित्र्यसंपन्न, त्यागी, निर्भीड, अभ्यासू कार्यकर्ते
असल्याने ती संस्था  सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात  पर्यायाने देशहिताच्या दृष्टीने सर्वोच्च स्थान प्राप्त करू शकते. मुल्ला साहेब यांनी उक्ती आणि कृती यात कधीही फारकत होऊ दिली नाही. रयत शिक्षण संस्थेत आजन्म निस्वार्थ कार्य करीत राहिले याचे एक उदाहरण
नमूद करावेसे वाटते मुल्लासाहेबांची मुलगी नजीमा  यांनी एम.ए. इंग्रजी विषयात उत्तम गुण मिळविले. त्यावेळी मुल्लासाहेब रयत शिक्षण संस्थेचे सचिव म्हणून काम करीत होते. छत्रपती शिवाजी कॉलेज मध्ये इंग्रजी विषयाची जागा असून सुद्धा त्यांनी स्वतःच्या मुलीसाठी प्रयत्न
केला नाही, अधिकाराचा वापर केला नाही. त्यामागे एकच दूरदृष्टी होती , निस्वार्थ भाव होता तो असा की आपण चुकलो तर आपणास इतरांना बोट दाखविण्याचा नैतिक अधिकार राहणार नाही. ही नैतिकतेची झालर आजन्म मुल्ला साहेबांनी कायम ठेवली.

रयत शिक्षण संस्थेच्या दृष्टीने  पै. इस्माईल मुल्ला साहेब त्याचबरोबर रामभाऊ नलावडे साहेब, बंडो गोपाळा मुकादम तात्या, तात्यासाहेब तडसरकर , बाळकृष्ण रावजी मोहिते, बाळासाहेब देसाई, दादासाहेब जगताप, बॅरिस्टर पी.जी.पाटील, सुमतीबाई पाटील, आप्पासाहेब
पाटील, प्रा.ग. प्र.प्रधान,  क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी, जी.डी.बापू लाड विठ्ठलराव देशमुख, माजी आमदार देशभक्त दत्ताजीराव देशमुख, केशवराव पवार, बाबुरावजी सणस, दि.बा.पाटील, भाई गणपतरावजी देशमुख, नामदेवराव मते, क्रांतिअग्रणी जी.डी. बापू लाड, कॉम्रेड पी.बी.कडू पाटील, भाऊसाहेब थोरात, स्वातंत्र्य सैनिक रामभाऊ तुपे, दादा पाटील, गणपतराव शेडगे, बाबूराव सणस, गनी अत्तार, आप्पालाल शेख, नाना माने, ज्ञानदेव घोलप, शंकररावजी काळेसाहेब, स्वातंत्र्य सैनिक बाळकृष्णरावजी मोहिते, नामदेवराव मते, डॉ.मोहन धारिया, रामचंद्र मनोहर नलावडे, शंकरराव खरात, प्रा.डॉ.एन.डी.पाटील इ. यासारखे अनेक रयत सेवक, कार्यकर्ते यांच्यामुळे रयत शिक्षण संस्थेने देशहिताच्या दृष्टीने, समाजोपयोगी , हिताचे काम करून नावलौकिक मिळविला आहे. मुल्ला साहेब यांच्याप्रमाणेच वरील सर्व रयत कार्यकर्ते यांनी आपल्या कर्तृत्ववाने, निस्वार्थ भाव आजन्म ठेवून समाजाच्या मनपटलावर आरूढ झाले. आज त्यांच्या कार्य व कीर्तीचा, निस्वार्थ भावाचा सुगंध चहुबाजूंनी दरवळत आहे. त्यांच्या निस्वार्थी व निर्लोभी भाव व कार्यकर्तृत्वाने बहुजनांचे अस्तित्व मंगलमय झाले आहे. सतत नावीन्याचा शोध, वंचितांना न्याय व  गुणात्मक शिक्षण देण्याचा ध्यास यामुळे मुल्ला साहेब सर्वांचेच लोकप्रिय होते. साहजिकच भाऊराव पाटील यांचे ते निकटचे, विश्वासू रयत सेवक म्हणून ओळखले जाऊ लागले. संस्थेच्या कामाला अनेक शाखा व देणगीदार व हितचिंतक यांच्याकडे जात असताना स्वतः आर्थिक झळ सोसून संस्था हित अखेरपर्यंत जपले.

अखेर 17 डिसेंबर 1973 रोजी पहाटे 5.00 वाजता वयाच्या 65 व्या वर्षी हार्ट अटॅक (रक्तदाब) यामुळे त्यांचे निधन झाले. रयत शिक्षण संस्थेने त्यांच्या त्याग, रयतनिष्ठा व प्रामाणिकपणा या सद्गुणांची दखल घेऊन  सातारा जिल्ह्यात कर्मवीर समाधी परिसराजवळ 1968 मध्ये पै.इस्माईलसाहेब मुल्ला लॉ कॉलेज या पवित्र ज्ञान मंदीराची स्थापना केली. आज मुल्ला साहेब यांच्या नावाने लॉ कॉलेज त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ चिरंतन स्मारक आहे, अविरत ज्ञानदानाचे पवित्र काम करीत आहे. आज हे स्मारक सेवाभावीवृत्ती, स्वच्छ चारित्र्य, निर्लोभी, निर्भीड, निष्काम सेवा व त्यागाचे प्रतीक म्हणून ओळखले जाते. आज मुल्ला साहेबांची पुण्यतिथी. या निमित्ताने सर्व रयत सेवक यांच्या वतीने मुल्ला साहेब यांच्या प्रती आजीवन कृतार्थ भाव अर्पित करतो. त्यांच्या पवित्र स्मृतिस सहृदय वंदन…!

प्रा. प्रदीप बबन हिवरकर
रयत शिक्षण संस्थेचे,
महात्मा फुले अध्यापक विद्यालय, सातारा 
७७४८९६६३२


Back to top button
Don`t copy text!