कर्मवीर भाऊराव पाटील शिक्षण क्षेत्रातील दीपस्तंभ – डॉ. अनिल दडस

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. २9 सप्टेंबर २०२४| फलटण |
महाराष्ट्र ही गुणवंतांची भूमी, या भूमीत अनेक थोर रत्ने जन्माला आली अन् त्यांनी आपल्या कार्याने महाराष्ट्राला आकार व दिशा दिली. स्वतःचे कमी शिक्षण असताना कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शिक्षणाचे जाळे निर्माण केले. यातून महाराष्ट्राची जडणघडण झाली. बहुजनांच्या मुलांसाठी शिक्षणाची दारे खुली केली. अंधकार, रुढी, परंपरा, अज्ञान यामध्ये खितपत पडलेल्या समाजाला यातून बाहेर काढायचे असेल तर शिक्षणाला पर्याय नाही, हे कर्मवीर भाऊराव पाटील यांनी ओळखले होते. यातून रयत शिक्षण संस्था आकारास आली. रयतेच्या वटवृक्षाखाली घडलेला विद्यार्थी कधीच वाया जाणार नाही याची दक्षता घेवून नवसमाज निर्माण केला जात आहे. याचे सारे श्रेय कर्मवीर अण्णांकडे जाते. त्यामुळे कर्मवीर भाऊराव पाटील शिक्षण क्षेत्रातील दीपस्तंभ आहेत, असे रयत शिक्षण संस्थेचे लाईफ वर्कर व प्रमुख पाहुणे डॉ. अनिल दडस यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३७ व्या जयंतीनिमित्त श्री जितोबा विद्यालय, जिंती (तालुका फलटण) येथे मत व्यक्त केले.

यावेळी अध्यक्षस्थानी स्कूल कमिटीचे ज्येष्ठ सदस्य राजेंद्र रणवरे होते. तसेच प्रभारी मुख्याध्यापक ताराचंद्र आवळे, स्कूल कमिटी सदस्य प्रकाश रणवरे, महादेवराव रणवरे, नवनाथ रणवरे, सरपंच सौ. पल्लवी लोखंडे, जगदेवराव रणवरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. दडस पुढे म्हणाले की, जिंती येथील या शाळेची योग्य जडणघडण व्हायची असेल तर शाळेला स्वतंत्र जागा व इमारत असणे आवश्यक आहे. ५७ वर्षे जुनी शाळा आज नवी आव्हाने स्विकारत असून योग्य दिशेने काम होण्यासाठी भौतिक सुविधा व सुसज्ज इमारतीची नितांत गरज आहे. त्यासाठी ग्रामस्थांनी सामूहिक प्रयत्न करून हा प्रश्न कायमचा मिटवावा.

प्रमुख वक्ते प्रा. प्रदीप हिवरकर म्हणाले की, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रभाव कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यावर होता. शिक्षणाशिवाय पर्याय नाही हे त्यांनी ओळखले होते. त्यामुळेच त्यांनी स्वावलंबी शिक्षणाची बिजे रोवली. ‘कमवा आणि शिका’ हा महान मूलमंत्र त्यांनी दिला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरात आल्यावर रयत शिक्षण संस्थेने हक्काचे शिक्षण, निवारा व गरजेनुसार हाताला काम दिले, त्यामुळेच स्वावलंबनाची आवड निर्माण झाली. सत्यशोधक विचारांची पाळेमुळे खोल रोवून विचार बदलाला सुरुवात केली. यातून रयत संस्कृती निर्माण झाली.

विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक ताराचंद्र आवळे यांनी प्रास्ताविक, स्वागत, पाहुण्यांचा परिचय व अहवाल वाचन केले. त्यांनी रयत शिक्षण संस्थेचे ध्येयधोरण, सध्याची शासकीय धोरणे याचा विचार करता विद्यालयात प्रभावी विविध उपक्रम राबविण्यात येतात, स्पर्धा परीक्षा, पालक व विद्यार्थीहित यांची जोपासना करून शाळा उत्कृष्टेकडे वाटचाल करीत आहे. शाळेला स्वतंत्र जागा व इमारत याची गरज आहे, असे सांगीतले.

यावेळी प्रकाश रणवरे, महादेव रणवरे, शरद रणवरे, उपशिक्षक प्रदीप माने तसेच अंशुमन रणवरे, तनवी जगताप यांचीही भाषणे झाली.
वक्तृत्व, निबंध, चित्रकला, रांगोळी, हस्ताक्षर, वाचन तसेच क्रीडा स्पर्धांमध्ये यशस्वी विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच रोख बक्षिसे देण्यात आली.

सूत्रसंचालन सौ. गौरी जगदाळे, सौ. पौर्णिमा जगताप यांनी केले तर सौ. विद्या जमदाडे यांनी आभार मानले.

कार्यक्रमास जिंती पंचक्रोशीतील ग्रामस्थ, आजी-माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!