स्थैर्य, कऱ्हाड (जि. सातारा), दि.६ : भारतीय सैन्यदलाने बांगलामुक्ती संग्रामात मिळवलेल्या विजयाप्रीत्यर्थ निवृत्त कर्नल संभाजीराव पाटील यांच्या संकल्पनेतून गेली 22 वर्षे येथे विजय दिवस मोठ्या दिमाखात साजरा करण्यात येतो. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम स्थगित करण्यात येत असल्याची माहिती कर्नल पाटील यांनी दिली.
भारतीय सैन्यदलाच्या विजयाचे साक्षीदार असलेल्या कर्नल पाटील यांच्या पुढाकारातून येथील छत्रपती शिवाजी स्टेडियम व परिसरात दरवर्षी विजय दिवस समारोह समितीच्या वतीने भारतीय सैन्यदलाच्या सहकार्याने 13 ते 16 डिसेंबर दरम्यान विजय दिवस समारोहाचे आयोजन करण्यात येते. देशात दिल्लीनंतर फक्त तो कऱ्हाडमध्ये साजरा केला जातो. त्यामुळे त्याला मोठे महत्त्व आहे. विजय दिवस समारोहासाठी दरवर्षी लष्करी शस्त्रास्त्र, जवान, बॅण्डपथक, श्वानपथक आदींच्या चित्तथरारक कसरतींचेही आयोजन केले जाते. त्याला सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांतील हजारो आबालवृध्द उपस्थित राहतात.
विजय दिवस हा कऱ्हाडची ओळख बनला आहे. दरवर्षी वेगवेगळ्या कसरतींनी आणि कार्यक्रमांनी गेली 22 वर्षे हा विजय दिवसचा सोहळा अविस्मरणीय ठरतो. त्यामुळेच त्याची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. मात्र, यंदा कोरोनाचे मोठे संकट उभे आहे. त्यावर सध्यातरी सोशल डिस्टन्सिंग एवढाच पर्याय आहे. त्याचा विचार करून विजय दिवस समारोह समितीच्या वतीने यंदाचा विजय दिवस समारोहाचा कार्यक्रम स्थगित करण्यात आला आहे, असेही श्री. पाटील यांनी सांगितले.