स्वच्छ सर्व्हेक्षण-2020 स्पर्धेत कराड नगरपालिका देशात प्रथम

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, कराड, दि. 20 : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वाकांक्षी उपक्रम असणार्‍या स्वच्छ सर्व्हेक्षण 2020 स्पर्धेत एक लाख लोकसंख्येच्या आतील नगरपालिका गटात कराड नगरपालिकेने देशात प्रथम क्रमांक पटकावला  आहे. या स्पर्धेचा निकाल गुरुवारी दिल्ली येथे केंद्रीय नगरविकास मंत्री हरदीप सिंग पुरी जाहीर केला. गेल्यावर्षीही या स्पर्धेत कराड नगरपालिकेने प्रथम क्रमांक प्राप्त करून बाजी मारली होती.

कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर या वर्षीचे पारितोषिक वितरण व्हर्च्युअल पद्धतीने झाले. मुंबई येथे कराडच्या नगराध्यक्षा सौ. रोहिणी शिंदे, तत्कालीन मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी राज्याचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, महेश पाठक, नगरविकास विभागाच्या तत्कालीन सचिव मनीषा म्हैसकर यांची उपस्थिती होती.

या सर्व्हेक्षण 2020 मध्ये एक लाख लोकसंख्येच्या आतील शहरांमध्ये महाराष्ट्राने बाजी मारली आहे. देशात प्रथम क्रमांकावर कराड असून सासवड दुसर्‍या क्रमांकावर तर लोणावळा नगरपालिका तिसर्‍या क्रमांकावर आहे. एक लाखावरील लोकसंख्येच्या शहरात इंदूर (मध्य प्रदेश) महानगरपालिकेने सलग चौथ्या वर्षी देशात प्रथम क्रमांक मिळवला. सूरत (गुजरात) महानगरपालिकेने दुसरा तर नवी मुंबई (महाराष्ट्र) महानगरपालिकेने तिसरा क्रमांक पटकावला.

कराड शहरात कचरा संकलन, विलगीकरण व त्यावर प्रक्रिया करण्यात नगरपालिका 100 टक्के यशस्वी झाली आहे. त्यामुळे पालिकेस कचरामुक्त शहराचे थ्री स्टार मानांकन आहे. कृष्णा नदीचे सौंदर्यीकरण, भूमिगत गटारे, सांडपाण्यावर प्रक्रिया, शेतीसाठी त्याचा पुनर्वापर, सार्वजनिक शौचालये, ओल्या कचर्‍यावरील प्रक्रिया, बारा डबरे येथे स्वच्छता उद्यान अशा विविध पातळ्यांवर कराड नगरपालिकेने चांगल्या पद्धतीने काम केले होते तसेच विविध नावीन्यपूर्ण उपक्रमही नगरपालिकेने राबवले होते.

तर महाराष्ट्र नागरी विकास अभियान  संचालनालयाने स्वच्छ सर्व्हेक्षण अभियानात कराडला देशपातळीवर मिळालेले यश व घनकचरा व्यवस्थापनाचे नियोजन यामुळे कराडला ‘घनकचरा व्यवस्थापन मॉडेल सिटी’ म्हणून घोषित केले  होते. महाराष्ट्र शासन पर्यावरण विभाग आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्याकडून दिला जाणारा राज्यस्तरीय प्रतिष्ठेचा ‘वसुंधरा पुरस्कार’ही नगरपालिकेस जाहीर झाला आहे.

स्वच्छ सर्व्हेक्षण 2019 स्पर्धेमध्ये देशात प्रथम क्रमांक मिळाल्यानंतर 2020 मध्ये प्रथम क्रमांक कायम राखणे आव्हानात्मक होते. देशभरातील विविध पालिकांनी चांगली तयारी करत यंदा स्पर्धेत भाग घेतला होता. या परिस्थितीत कराड पालिकेने 2020 मध्ये आणखी जोमाने काम केले होते. या स्पर्धेतील सर्व निकष पार केल्यामुळेच 1 लाख लोकसंख्येच्या आतील शहरांमध्ये कराडला देशात प्रथम क्रमांक मिळाला आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!