स्थैर्य, मुंबई, दि.२३: अभिनेत्री कंगना रनोट
हिच्याविरोधात मुंबईत आणखी एक एफआयआर दाखल झाला आहे. मुंबईतील वकील अली
काशिफ खान यांनी अंधेरी काेर्टात तिच्याविरोधात गुन्हेगारी तक्रार दाखल
केली आहे. कंगनाने वांद्रे मॅजिस्ट्रेट काेर्टाकडून तिच्याविरुद्ध एफआयआर
दाखल करण्याच्या आदेशानंतर साेशल मीडियावर न्यायपालिकेविरुद्ध आक्षेपार्ह
टिप्पणी केल्याचे खान यांनी मुंबईच्या अंधेरी काेर्टात दाखल केलेल्या
अर्जात म्हटले आहे. कंगनावर देशद्राेह आणि समाजात द्वेष पसरवण्याचाही आरोप
करत त्यांनी ती सोशल मीडियाचा गैरवापर करत असल्याचे सांगितले.
आपल्या तक्रारीत काय म्हणाले खान
कंगना
समाज, कायदा, तपास यंत्रणा व न्यायपालिकेची थट्टा करत आहे, असे खान
म्हणाले आहेत. काेर्ट या प्रकरणात 10 नोव्हेंबरला सुनावणी करणार आहे.
वांद्रे कोर्टाच्या आदेशावरून मुंबई पोलिसांनी कंगनावर गुन्हा दाखल केला.
तिला 26-27 ऑक्टोबरला पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले आहे.
10 दिवसांत कंगनाविरोधात ही तिसरी तक्रार
मागील
10 दिवसांत कंगनाविरोधात दाखल झालेली ही तिसरी तक्रार आहे. 10
दिवसांपूर्वी शेतक-यांचा अपमान केल्याप्रकरणी तुमकुर (कर्नाटक) येथील
क्याथासांद्रा पोलिस ठाण्यात तिच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला होता.
कंगनाने सीएए विरुद्ध झालेल्या आंदोलनाचा संदर्भ देत कृषी विषयक
विधेयकांविरुद्ध आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर निशाणा साधला त्यांना
दहशतवादी म्हटले होते. तिच्या या वक्तव्यावरुन तिच्याविरोधात वकील एल. रमेश
नाइक यांनी तक्रार दाखल केली होती.
पाच
दिवसांपूर्वी कास्टिंग डायरेक्टर आणि फिटनेस ट्रेनर साहिल अशरफ अली सैय्यद
यांच्या याचिकेवर सुनावणी देताना वांद्रे कोर्टाने कंगनाविरोधात एफआयआर
दाखल करण्याचे आदेश दिले होते. हिंदू आणि मुस्लीम या दोन समुदायांमध्ये
परस्परांविषयी द्वेष निर्माण होईल आणि जातीय सलोखा बिघडेल, अशा हेतुने
वारंवार ट्विट करत असल्याच्या आरोप कंगना आणि तिची बहीण रंगोली चंडेल
यांच्यावर आहे. वांद्रे न्यायदंडाधिकारी न्यायालयाच्या आदेशानुसार कंगना व
तिच्या बहिणीविरोधात वांद्रे पोलिस ठाण्यात एफआयआर नोंदवण्यात आला आहे. 124
अ (राजद्रोह) यासह विविध कलमांखाली हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.