दैनिक स्थैर्य । दि. 29 ऑगस्ट 2021 । फलटण । फलटण तालुक्यातील बरड येथील विशाल धनंजय चव्हाण या शेतकर्याने ड्रॅगन फळाची लावगड केली आहे. परंपारिक पीक पद्धतीऐवजी मिश्र पीकपद्धतीचा वापर करत सोबत ठिबक सिंचनाची जोड, जैविक खतांचा तसेच बाजारभाव या सर्वांचा विचार करत ड्रॅगन फळ लागवडीचा प्रयोग त्यांनी आपल्या शेतात यशस्वीपणे केला आहे. या यशोगाथेचा आढावा छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालय, कोल्हापूरच्या विद्यार्थीनी कु.प्रणोती रामदास शेळके हिने ग्रामीण कृषी जागरुकता आणि औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमाअंतर्गत महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ.यु.बी.होले आणि कार्यक्रम समन्वयक बी.टी.कोलगणे यांच्या मार्गदर्शनाखाली घेतला.
विशाल धनंजय चव्हाण यांनी वडिलोपार्जित शेतीमध्ये ड्रॅगन फ्रुटचा यशस्वीपणे प्रयोग करुन अनेक शेतकर्यांसाठी कमी पाण्यामध्ये तसेच जैविक खतांचा वापर करुन यामधून नफा मिळवून एक उत्तम उदाहरण ठेवले आहे. विशाल चव्हाण यांनी 5 एकर जमिनीवर ड्रॅगन फळांची लागवड केली आहे. यासाठी त्यांनी अनंत शरदचंद्र काळे यांच्याकडून मार्गदर्शन घेतले. काळे यांनी मागील 10 ते 12 वर्षे ड्रॅगन फळावर संशोधन केले आहे. बाजारात असलेली मागणी तसेच कॅन्सर सारख्या आजारावर रोगप्रतिकारक ठरणारे फळ तसेच इतर फळांपेक्षा कमी भांडवल, कमी मजूर, कमी पाणी, लवकर फळधारणा या सर्वांचा विचार करत एक नवीन प्रयोग म्हणून त्यांनी सन 2018 मध्ये 4050 रोपे आणली व 2 एकर जमिनीवर पीक उभारले आणि उत्तम बाग बहरली. लागवडीनंतर 18 महिन्यांनी बहर येतो आणि 45 व्या दिवसात फळे तयार होतात. सेंद्रिय खते, ठिबक सिंचन यांचा वापर करुन साधारण 20-22 टन उत्पन्न घेत एकूण खर्च वजा करता 15-16 लाख वार्षिक नफा त्यांना 2020 साली झाला. आता 5 एकर जमीन चव्हाण यांनी लागवडीखाली घेतली आहे. तसेच इतर मिश्र पिकेही त्यांनी घेतली आहेत. मागील वर्षी त्यांनी ड्रॅगन फ्रुटची विक्री दुबईला केली आहे. तसेच मुंबई, पुणे येथूनही त्यांच्या ड्रॅगन फ्रुटला चांगली मागणी आहे. कोणत्याही प्रकारचा पूर्व अनुभव नसताना त्यांनी आधुनिक पद्धतीचा वापर करुन यशस्वीपणे ड्रॅगन फळबाग बहरवली आहे.