येथील कुटीर रूग्णालयातील अंतररूग्ण विभागाची पाहणी करताना खटाव तालुका सोशल फाऊंडेशनचे पदाधिकारी.
स्थैर्य, कातरखटाव, दि. ३० : खटाव तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना संसर्गजन्य आजाराचा विळखा वाढत चालला आहे. सद्या तालुक्यात कार्यरत असणारी कोविड सेंटर अपुरी पडत आहेत. अशा परिस्थितीत कलेढोण येथील कुटीर रूग्णालयाचा कोविड सेंटरसाठी प्रशासनाने विचार करावा अशी मागणी खटाव तालुका सोशल फाऊंडेशनसह अन्य सामाजिक संस्था, घटना व प्रतिष्ठीत नागरिकांनी केली आहे.
सध्या मायणी येथील मेडीकल कॉलेज, पुसेगाव प्राथमिक आरोग्य केंद्र या दोन ठिकाणी कोविड सेंटर सुरू आहे. याशिवाय खटाव प्राथमिक आरोग्य केंद्रात सेंटर सुरू करण्यासंदर्भात प्रक्रिया सुरू आहे. तर अन्य काही खासगी हॉस्पिटल कोरोना सेंटरसाठी घेण्या संदर्भात हालचाली सुरू आहेत. मात्र त्याऐवजी प्रशासनाने कलेढोण येथील कुटीर रूग्णालयाचा विचार करावा. कलेढोण येथील कुटीर रूग्णालय गावापासून सुमारे एक किलो मीटर अंतरावर दूर आहे. हे रूग्णालय अंदाजे १४ एकर परिसरात आहे. या रूग्णालयात ३० बेडची मंजूरी आहे. त्यापैकी सद्या १५ बेड कार्यरत आहेत. या रूग्णालयाची ओपीडी ही जेमतेमच असते. तसेच प्रसुती व्यतिरीक्त इतर रूग्ण सहसा ॲडमीट होत नसल्याची चर्चा आहे. मध्यंतरी या रूग्णालयात १०० बेड कार्यन्वीत करणे तसेच अन्य भौतिक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्या संदर्भात प्रस्तावही प्रलंबीत आहे. अशा परिस्थितीत सदरचे रूग्णालय कोविड सेंटर म्हणून घेतल्यास रूग्णालयाच्या भव्य इमारतीचा चांगला उपयोग होण्या बरोबरच प्रलंबीत कामेही मार्गी लागतील.