
स्थैर्य, फलटण दि.१०: के.बी.उद्योग समूहाचे संचालक सचिन यादव यांच्या संकल्पनेतून सुरु करण्यात आलेल्या के.बी.फौंडेशनच्या अंतर्गत के.बी.स्पोर्टस् क्लबची स्थापना करण्यात आली असून या क्लबच्या माध्यमातून फलटण तालुक्यातील खेळाडूंचा क्रिकेट संघ निवडण्यात आला आहे.
या निवड झालेल्या खेळाडूंचा सत्कार नुकताच सचिन यादव यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी संघातील खेळाडूंना क्रिकेट कीटचे वाटप करण्यात आले. अनेक दिवसांचा खेळाडूंचा शोध आणि अनेक प्रकारच्या चाचण्यानंतर के.बी.क्रिकेट टीमसाठी फलटण तालुक्यातील खेळाडूंची निवड करण्यात आली आहे.
के.बी.हा क्रिकेट संघ राज्यात विविध ठिकाणी भरवण्यात येणार्या क्रिकेट स्पर्धांमध्ये सहभागी होणार असून संघात निवड झालेल्या खेळाडूंना के.बी.उद्योग समूहाच्यावतीने प्रति महिना मानधन, प्रोटिन्स, स्पर्धेवेळीचा संपूर्ण खर्च, उच्च सुख सुविधा, संपूर्ण कीट याबरोबरच खेळात सातत्य ठेवल्यास के.बी.उद्योग समूहात काम करण्याची संधी देण्यात येणार आहे. यानिमित्ताने या खेळाडूंना आर्थिक स्थैर्य लाभेल, असा विश्वास सचिन यादव यांनी व्यक्त करुन आगामी काळात के.बी.स्पोर्टस् क्लबच्या माध्यमातून इतरही क्रीडा प्रकाराचे संघ बनवण्यात येणार असल्याचे सचिन यादव यांनी सांगीतले.