

नव्या ठेक्यांसाठी ठेकेदारांना सोमवारी आमंत्रण : व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या सर्वसाधारण सभेवरून संभ्रम
स्थैर्य, सातारा दि 4 : खासदार उदयनराजे भोसले यांनी शनिवारी बोलावलेल्या सातारा विकास आघाडीच्या बैठकीत अनेक विषयांवर नुसतीच चर्चा झाली . मात्र कोणताही ठोस निर्णय झाला नाही . लक्ष्मी टेकडी येथे बीव्हीजीने घरकुलाची अर्धवट सोडलेली कामे, करंजे येथील पाण्याच्या टाकीच्या जागेचा वाद या अर्धवट रखडलेल्या कामांचा उदयनराजे यांनी आढावा घेतला . तर जोरदार स्पर्धा झालेल्या रस्त्यांच्या कामाचे ठेक्यांचे कसे वाटप करता येईल याकरिता ठेकेदारांना सोमवारी पालिकेत बोलावून त्याचे नियोजन करण्याच्या सूचना उदयनराजे यांनी दिल्या .
खासदार उदयनराजे भोसले यांच्या जलमंदिर या निवासस्थानी सोशल डिस्टन्सिंग पाळत सातारा विकास आघाडीच्या नगरसेवकांची दीड तास बैठक झाली . नगरसेवक वसंत लेवे व विशाल जाधव यांची बैठकीस अनुपस्थिती होती . सविता फरांदे प्रकृती अस्वास्थामुळे बैठकीला हजर नव्हत्या . या बैठकीत उदयनराजे भोसले यांनी 2016चा आघाडीचा जाहीरनाम्यातील उल्लेखित अर्धवट विकास कामांचा आढावा घेतला . लक्ष्मी टेकडी येथील बीव्हीजी कंपनीने घरकुलांची कामे पूर्ण केली मात्र त्यात अनेक त्रुटी राहून गेल्या, या विषयावर उदयनराजे यांनी पदाधिकाऱ्यांना ही कामे तत्काळ पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या . गेल्या साडेतीन वर्षात आपण शहरात मोठे प्रकल्प सातारकरांच्या हितासाठी उभे केले आहेत . कोणतीही विकास कामे अर्धवट राहता कामा नये, करंजे येथील पाण्याच्या टाकीच्या जागेचा विषय तांत्रिक बाजू तपासून सामंजस्याने सोडवण्याची सूचना उदयनराजे यांनी केली . रस्ते निविदांमध्ये संबधित ठेकेदारांना कामे हस्तांतरित करण्यासाठी त्यांना सोमवारी पालिकेत बोलावून त्यांच्याशी चर्चा करण्यात यावी असे आदेश उदयनराजे यांनी पालिका प्रशासनाला दिल्या . येत्या 10 जुलै रोजी पालिकेची सर्वसाधारण सभा होत आहे मात्र ही सभा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्याच्या सूचना नगरविकास विभागाच्या वतीने घेण्यात आल्या आहेत . ती व्यवस्था कशी असणार याची माहिती घेण्याचा उदयनराजे यांनी प्रयत्न केला . मात्र बैठकीत पुरेशा माहितीअभावी सविस्तर चर्चा होऊ शकली नाही . सातारकरांना घरपट्टी माफ करण्यात यावी असा विषय सर्वसाधारण सभेच्या अजेंडयावर घेण्यात आला आहे . मात्र हा विषय च 1965 नगरपालिका अधिनियमाच्या विरोधात असल्याने हा विषय नामंजूर होण्याची चिन्हे आहेत . घरपट्टी माफी च्या प्रस्तावामुळे पालिकेत आर्थिक चणचण वाढून दैनंदिन खर्च आणि देयके या कामांमध्ये अडचणी येऊ शकतात अशी स्पष्ट भूमिका नगरसेविका सुजाता राजे महाडिक यांनी मांडली . मात्र या विषयामागे मोठी राजकीय भूमिका आहे असा खुलासा माजी पक्ष प्रतोद अॅड दत्ता बनकर यांनी करून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला . सातारकरांच्या हितासाठी पालिकेचा कारभार गतिमान ठेवा अशा सूचना उदयनराजे यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या . अनेक विषयांचा आढावा घेत उदयनराजे यांनी दीड तासात बैठक संपवली.

