
दैनिक स्थैर्य । दि. ३० जून २०२२ । फलटण । फलटण एज्युकेशन सोसायटीच्या दालवडी येथील श्रीमंत सगुणामाता विद्यालय येथे आगामी काही दिवसांत ज्युनिअर कॉलेज सुरू होईल व त्याला पंचक्रोशीतुन प्रतिसाद सुध्दा चांगला प्रतिसाद मिळेल, असा विश्वास फलटण एज्युकेशन सोसायटीचे सचिव श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केला.
फलटण एज्युकेशन सोसायटीच्या दालवडी येथील श्रीमंत सगुणामाता विद्यालयातील शिक्षक बाबासाहेब सोनवलकर यांच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमात श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर बोलत होते. यावेळी फलटण एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष रमणशेठ दोशी, शाला व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नितीनशेठ गांधी, सदस्य संजय उर्फ शिरिष भोसले, कोळकीचे माजी सरपंच दत्तोपंत शिंदे, श्रीराम कारखान्याचे संचालक महादेव माने, युवा उद्योजक तुषार नाईक निंबाळकर, श्रीमंत सगुणामाता विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. सावळकर यांच्यासह प्रशालेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना श्रीमंत संजीवराजे म्हणाले की, बाबासाहेब सोनवलकर यांनी फलटण एज्युकेशन सोसायटीसाठी जे योगदान दिलेले आहे. त्या बद्दल सोसायटीच्या माध्यमातून त्यांचे ऋण उतरवणे गरजेचे आहे. अंत्यंत चांगल्याप्रकारे काम करणारे सोनवलकर सर हे आज सेवानिवृत्त होत आहेत. शासनाला विनंती करून सेवानिवृत्तीचे वय आता वाढवण्याची गरज आहे. ५८ हे वय सेवानिवृत्तीचे वय आहे, असे वाटत नाही. अजुन काही वर्षे तरी नक्कीच आपण काम करू शकतो.
अंत्यंत हलाखीच्या परिस्थितीत सोनवलकर सरांनी ही सेवा सुरू ठेवली. त्यांनी अनेक काळ विनाअनुदानित तत्वावर सेवा बजावली. त्यांनी कधीही कसलीही तक्रार संस्थेच्या पर्यंत आणली नाही. दालवडीला प्रशालेची अशी इमारत उभी राहील, असे मला सुध्दा वाटले नव्हते. पालखे सरांनी ही जागा देवुन ही दालवडी येथे प्रशाला उभी राहिली. सगुणामाता उद्योग समुहाचे शिल्पकार स्व. योगेश पाटील यांनी या प्रशालेसाठी विशेष प्रयत्न केले आहेत. स्पर्धा परिक्षेत आपला विद्यार्थी बाजुला राहू नये याची काळजी प्रशालेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी घेत आहेत, असेही यावेळी श्रीमंत संजीवराजे यांनी स्पष्ट केले.
यावेळी बाबासाहेब सोनवलकर यांनी आपला जीवनप्रवासाची माहिती दिली. प्रास्ताविक व आभार प्रशालेचे शिक्षक संतोष जाधव यांनी मानले.