मंत्री जयकुमार गोरे व माजी खासदार रणजितसिंहांच्या प्रमुख उपस्थितीत जोशी हॉस्पिटलच्या रौप्यमहोत्सवी सोहळ्यास दिमाखदार सुरुवात; दिग्गजांची मांदियाळी


जोशी हॉस्पिटल (फलटण) च्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित भव्य सोहळ्यास मंत्री जयकुमार गोरे आणि माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत दिमाखात सुरुवात झाली आहे. या सोहळ्याला अनेक दिग्गज मान्यवरांची उपस्थिती लाभली आहे.

स्थैर्य, फलटण, दि. ५ एप्रिल : फलटण येथील वैद्यकीय क्षेत्रातील नामांकित ‘जोशी हॉस्पिटल प्रा. लि.’ च्या रौप्यमहोत्सवी (२५ वर्षे) वर्षपूर्तीनिमित्त आयोजित भव्य सोहळ्यास राज्याचे ग्रामविकास मंत्री ना. जयकुमार गोरे आणि माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आज (रविवारी) दिमाखात सुरुवात झाली आहे. सजाई गार्डन येथे सुरू असलेल्या या सोहळ्यात ‘मॅजिकल आरडी’ (Magical RD) ही सांगीतिक मैफील आणि ‘उषा-वैभव पुरस्कार २०२५’ वितरण असा दुग्धशर्करा योग जुळून आला आहे.

मान्यवरांच्या उपस्थितीत सोहळ्याला प्रारंभ:

या भव्य सोहळ्याची सुरुवात ना. जयकुमार गोरे आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. यानंतर ज्येष्ठ पत्रकार प्रसन्न जोशी यांनी मंत्री जयकुमार गोरे यांचे स्वागत केले. तसेच, प्रसन्न जोशी यांच्या हस्ते ना. जयकुमार गोरे आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. या सत्कार समारंभानंतर डॉ. प्रसाद जोशी यांनी ज्येष्ठ पत्रकार प्रसन्न जोशी यांचा यथोचित सन्मान केला. या सुरुवातीच्या सत्राचे सूत्रसंचालन माजी प्राचार्य रवींद्र येवले यांनी केले.

या विशेष सांगीतिक आणि पुरस्कार वितरण सोहळ्यास फलटणमधील अनेक दिग्गज मान्यवरांची विशेष उपस्थिती लाभली आहे. यामध्ये ज्येष्ठ नेते प्रल्हाद साळुंखे-पाटील, सद्गुरू व महाराजा उद्योग समूहाचे शिल्पकार दिलीपसिंह भोसले, स्वयंसिद्धा महिला उद्योग समूहाच्या संस्थापिका सौ. मधुबाला भोसले, सद्गुरू पतसंस्थेचे चेअरमन तेजसिंह भोसले, फलटणच्या उपनगराध्यक्षा सौ. प्रियदर्शनी रणजितसिंह भोसले, ज्येष्ठ पत्रकार रवींद्र बेडकिहाळ आणि श्रीराम शिक्षण संस्थेचे मानद सचिव सचिन सूर्यवंशी-बेडके आदी मान्यवर उपस्थित आहेत.

डॉ. प्रसाद जोशी यांना ‘उषा-वैभव पुरस्कार’:

वैद्यकीय क्षेत्रात सलग २५ वर्षे अत्यंत यशस्वी व उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल, ऑर्थोपेडिक सर्जन मा. डॉ. प्रसाद जोशी यांना विद्या-वैभव प्रकाशन (पुणे) यांच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘उषा-वैभव पुरस्कार २०२५’ जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण भारताच्या ज्येष्ठ आणि आदरणीय पार्श्वगायिका उषाताई मंगेशकर यांच्या शुभहस्ते डॉ. प्रसाद जोशी यांना करण्यात येत आहे. या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी ज्येष्ठ अभिनेत्री मा. पद्मिनी कोल्हापुरे आणि ज्येष्ठ पत्रकार मा. प्रसन्न जोशी यांची प्रमुख उपस्थिती लाभली आहे.

‘मॅजिकल आरडी’ सांगीतिक मैफिलीची पर्वणी:

या पुरस्कार सोहळ्यासोबतच संगीतप्रेमींसाठी ‘मॅजिकल आरडी’ (Magical RD) या विशेष सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सौरभ दप्तरदार प्रस्तुत या कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायक प्रशांत नासेरी, सौरभ दप्तरदार, स्वरदा गोडबोले आणि प्रीती जोशी हे आर. डी. बर्मन यांची अजरामर गाणी सादर करत आहेत.

या सांगीतिक मैफिलीचे निवेदन संदीप पंचवाटकर करत असून, ज्येष्ठ हार्मोनियम वादक सचिन जांभेकर यांचा ‘स्पेशल परफॉर्मन्स’ या कार्यक्रमाचे खास आकर्षण आहे. अमृता ठाकूरदेसाई, मिहीर भडकमकर, अभिजित भदे आदी नामवंत वादक या मैफिलीला साथसंगत करत आहेत. राजकीय, सामाजिक, वैद्यकीय आणि कला क्षेत्रातील दिग्गजांच्या उपस्थितीत सजाई गार्डन येथे हा सोहळा अत्यंत उत्साहात पार पडत आहे.


Back to top button
Don`t copy text!