कर्तृत्वाची उंची आणि माणुसकीचा ओलावा! रणजितदादांच्या यशामागील खंबीर आधारस्तंभ ॲड. सौ. जिजामाला वहिनीसाहेब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या यशातील खंबीर आधारस्तंभ आणि स्वराज उद्योग समूहाच्या प्रमुख ॲड. सौ. जिजामाला नाईक निंबाळकर यांचा आज वाढदिवस; त्यानिमित्त त्यांच्या कार्याचा घेतलेला आढावा…

राजकारणात यश मिळवणे सोपे नसते, पण त्या यशामागे जेव्हा एक खंबीर आणि दूरदृष्टी असलेली साथ असते, तेव्हा ते यश अधिक उजळून निघते. माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार, भाजपचे ‘फायर ब्रँड’ नेते आणि सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे नवनिर्वाचित संचालक रणजितसिंह नाईक निंबाळकर (दादा) यांच्या प्रत्येक राजकीय आणि सामाजिक प्रवासात त्यांच्यासोबत ताकतीने उभ्या असणाऱ्या ॲड. सौ. जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर (वहिनीसाहेब) यांचा आज वाढदिवस. एकाच वेळी कुटुंब, राजकारण, उद्योग आणि समाजकारण अशा सर्वच आघाड्यांवर अत्यंत लिलया वावरणारे हे नेतृत्व आज फलटण तालुक्यासाठी एक मोठा आदर्श बनले आहे.

प्रत्येकाची आपुलकीने चौकशी अन् माणुसकीचा झरा

रणजितदादांच्या ‘राजभवन’ या निवासस्थानी दररोज शेकडो लोक आपल्या अडीअडचणी घेऊन येत असतात. घरी आलेला प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या कामासाठी आणि आशेने आलेला असतो, त्यामुळे त्याचे काम होण्याआधी त्याला किमान आपुलकीची वागणूक मिळाली पाहिजे, ही वहिनीसाहेबांची ठाम धारणा आहे. म्हणूनच, घरी येणाऱ्या प्रत्येकाला “चहापाणी झाले का?” असे स्वतः जातीने विचारल्याशिवाय त्या पुढे जात नाहीत. चहापाणी देणे ही वरवर साधी गोष्ट वाटत असली, तरी त्यामागील त्यांचा माणुसकीचा आणि आदराचा दृष्टिकोन त्यांच्या मोठ्या मनाची प्रचिती देतो.

विकासाचा पाठपुरावा आणि महिलांचे भक्कम जाळे

जिजामाला वहिनीसाहेब या केवळ घरच्या जबाबदाऱ्यांपुरत्या मर्यादित नाहीत. रणजितदादांच्या व्यस्त दौऱ्यांच्या वेळी, फलटण शहर आणि तालुक्यात सुरू असणाऱ्या विकासकामांचा त्या अत्यंत बारकाईने आढावा घेत असतात. कार्यकर्त्यांना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी त्या नेहमीच त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या असतात. यासोबतच, त्यांनी फलटण तालुक्यात राजकारणविरहित महिलांची एक अतिशय मोठी आणि भक्कम मोट बांधली आहे. “राजकारण फक्त निवडणुकीपुरते, एरवी समाजकारण आणि विकासकामेच झाली पाहिजेत,” हा त्यांचा विचार आहे.

पुरुष मंडळी कामानिमित्त किंवा मित्रांसोबत बाहेर जाऊन आपला विरंगुळा शोधतात, पण चूल आणि मूल यात अडकलेल्या गृहिणींना कोणताही विरंगुळा मिळत नाही. या महिलांनाही एक माणूस म्हणून हसण्या-खेळण्याचा आणि तणावमुक्त होण्याचा अधिकार आहे, या शुद्ध हेतूने त्यांनी तालुक्याच्या प्रत्येक पंचक्रोशीत आणि गावात ‘होम मिनिस्टर’सारखे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करून महिलांचे एक मोठे जाळे उभे केले आहे.

‘स्वराज’ची यशस्वी धुरा अन् अजितदादांकडूनही कौतुकाची थाप

माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या ‘स्वराज ग्रीन पॉवर अँड फ्युएल लिमिटेड’ या कारखान्याची आणि स्वराज उद्योग समूहाची संपूर्ण धुरा ॲड. सौ. जिजामाला वहिनीसाहेब अत्यंत यशस्वीपणे सांभाळत आहेत. त्यांच्या अचूक आणि शिस्तबद्ध व्यवस्थापनामुळे ‘स्वराज’ने आजवर अनेक राष्ट्रीय पुरस्कार पटकावले आहेत. साखरवाडी येथे झालेल्या एका जाहीर सभेत स्वर्गीय अजितदादा पवार यांनीही वहिनीसाहेबांच्या या सक्षम कामकाजाचे आणि कारखान्याच्या उत्तम व्यवस्थापनाचे जाहीर कौतुक केले होते. आता हाच वारसा आणि कारखान्याची धुरा यशस्वीपणे पुढे नेण्यासाठी त्यांच्या सुकन्या कु. ताराराजे यादेखील त्यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तम कामकाज करत आहेत.

कुटुंबवत्सल आई आणि कार्यकर्त्यांच्या पाठीराख्या

राजकारण आणि उद्योगाच्या या धावपळीतही जिजामाता वहिनीसाहेब कौटुंबिक जबाबदाऱ्यांना सर्वोच्च प्राधान्य देतात. रणजितदादांना त्यांच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ मिळतोच असे नाही, मात्र वहिनीसाहेब त्यांच्या दोन्ही मुलींकडे – ताराराजे आणि इंदिराराजे यांच्याकडे अत्यंत जातीने लक्ष देतात. त्यांच्या अगदी बारीक-सारीक गोष्टींकडेही त्या एका जागृत आईसारख्या लक्ष ठेवून असतात. कुटुंबाप्रमाणेच आपल्यासोबत काम करणाऱ्या सहकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची त्या अगदी घरगुती पद्धतीने काळजी घेतात.

या त्यांच्या काळजीवाहू स्वभावाचा मला स्वतःला आलेला एक प्रत्यक्ष अनुभव खूप बोलका आहे. बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया, फलटण सेंटरचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद निंबाळकर यांचा माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वात, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत प्रवेशाचा कार्यक्रम होता. मी पत्रकार म्हणून या दौऱ्यात सोबत होतो. कार्यालयात जाताना मंत्री महोदय आणि दादा एका लिफ्टने गेले, तर मी, पीए आणि फोटोग्राफर दुसऱ्या लिफ्टने निघालो. अचानक लिफ्ट बंद पडली, तिची साखळी सुटली आणि ती थेट दुसऱ्या मजल्यावरून तळमजल्यावर दोन-तीन वेळा उड्या मारल्यासारखी वेगाने आदळली. आम्ही सर्वजण प्रचंड घाबरलो होतो आणि काहींना किरकोळ दुखापतही झाली होती. ही बातमी वहिनीसाहेबांना समजताच त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता स्वतः प्रत्येकाची अत्यंत आपुलकीने चौकशी केली आणि ज्यांना गरज होती त्यांच्यासाठी तातडीने वैद्यकीय उपचारांची व्यवस्था केली. सोबत काम करणाऱ्या प्रत्येकाला त्या किती आदराने आणि कुटुंबातील सदस्याप्रमाणे जपतात, हे यावरून स्पष्ट होते.

अशी ही कर्तृत्वाची उंची आणि माणुसकीचा ओलावा जपणारी, रणजितदादांच्या यशामागील खंबीर ताकद असणाऱ्या ॲड. सौ. जिजामाला वहिनीसाहेब यांना वाढदिवसानिमित्त उदंड आणि निरोगी आयुष्याच्या अनंत शुभेच्छा!

– प्रसन्न दिलीप रुद्रभटे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!