दैनिक स्थैर्य । दि. १५ जानेवारी २०२२ । फलटण । स्व. लक्ष्मणराव इनामदार जिहेकठापूर जलसिंचन योजनेचा समावेश प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत करावा अशी मागणी माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि माण – खटाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार जयकुमार गोरे यांच्या शिष्टमंडळाने केली. केंद्रीय जलशक्ती मंत्री ना. गजेंद्र सिंग शेखावत यांची दिल्लीत भेट घेतली. याबाबत या मंत्रालयाला तसे पत्रही त्यांनी दिले. या पुर्वी केंद्रीय बांधकाम मंत्री ना. नितीन गडकरी आणि केंद्रीय अर्थराज्यमंत्री ना. भागवत कराड यांना भेटून योजना संपूर्ण पूर्णत्वाला जाण्यासाठी लागणारा निधी मिळण्यासाठी प्रयत्न व पाठपुरावा करावा अशी विनंतीही त्यांनी केलेली होती.
नवी दिल्ली येथे खासदार निंबाळकर आणि आमदार गोरे यांनी जिहेकठापूर योजनेच्या अनुषंगाने केंद्रीय जलशक्ती मंत्रालयासह विविध मंत्र्यांची भेट घेतली. मंत्री गजेंदरसिंह शेखावत यांना दिलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे कि ३.१७ टीएमसी पाणी उचलून माण व खटाव या दुष्काळी तालुक्यातील ६७ गावांमधील २७०० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणणाऱ्या जिहेकठापूर योजनेसाठी जानेवारी २०२१ पर्यंत सुमारे ५८८ कोटींचा निधी खर्च करण्यात आला आहे. बॅरेज आणि रायझिंग मेन्सची कामे झाली आहेत. २०२१ मध्ये योजनेचा पहिला टप्पा सुरु करुन ७९०० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणण्याचे नियोजन सुरु करण्यात आले आहे. उरलेले १९६०० हेक्टर क्षेत्र आगामी तीन वर्षात ओलिताखाली आणण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी राज्य सरकारकडून अपेक्षित निधी मिळत नाही. प्रकल्पाचे संपूर्ण काम निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रधानमंत्री किसान सिंचन योजनेतून लागणारा सर्व निधी मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी या प्रकल्पाचा समावेश पीएमकेएसवाय मध्ये त्वरित समावेश करावा अशी मागणी जलशक्ती मंत्रालयाकडे करण्यात आली आहे.
आमचे नेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिहेकठापूरच्या वाढीव खर्चाला दोन वेळा सुधारित प्रशासकीय मान्यता दिल्याने ही योजना मार्गी लागत आहे. आता प्रधानमंत्री किसान सिंचन योजनेत जिहेकठापूरचा समावेश होवून लागणारा उर्वरित निधी केंद्राकडून उपलब्ध होणार आहे. नाबार्डमधून आणखी निधी मिळण्यासाठी केंद्रीय अर्थराज्यमंत्री ना. भागवत कराड यांच्याबरोबरही चर्चा केली आहे. निर्धारित वेळेत प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत. शेतकऱ्यांचे बांधावर यामुळे पाणी लवकरच पोहचेल असा विश्वास खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार जयकुमार गोरे यांनी यावेळी व्यक्त केला.