स्थैर्य, सातारा, दि. 07 : दोन वर्षांपूर्वी अपशिंगे (मि.) येथे झालेल्या एका गुन्हात बोरगाव पोलिसांना हवा असलेला जेसीबी नागठाणे (ता.सातारा) येथून जप्त केला. याबाबत बोरगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोन वर्षांपूर्वी अपशिंगे (मि.) येथील तात्यासो मच्छिंद्र निकम (वय.५८) यांच्या राहत्या घरासमोर बेकायदेशीररीत्या जमाव जमवून घराची जागा खाली कर नाहीतर तुम्हाला जीवे ठार मारू अशी धमकी देत त्यांच्या घराकडे जाणारा रस्ता जेसीबी मशीनच्या साहाय्याने बंद केला होता. यावेळी त्यांचे शेजारील इंदूबाई निकम व सचिन ताटे यांच्या घराचे जाळीचे कंपाउंड मशीनच्या साहाय्याने उखडून टाकून सुमारे २ लाख रुपयांचे नुकसान केले होते. या प्रकरणी बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन शंकर किसन निकम,गजानन रामचंद्र निकम,राहुल श्रीमंत निकम,प्रकाश मारुती भोसले व राजेश दत्तू पवार या संशयितांना अटक केली होती.मात्र या घटनेत वापरण्यात आलेला जेसीबी मिळून येत न्हवता.
अखेर पोलिसांना या गुन्ह्यातील जेसीबीचा नंबर ट्रेस करण्यात दोन वर्षांनी यश आले. सदर जेसीबी नागठाणे (ता.सातारा) येथील हरिभाऊ पांडुरंग साळुंखे यांच्या मालकीचा असल्याचे निष्पन्न झाल्यावर नागठाणे येथील मळवी नावाच्या शिवारातून सुमारे १५ लाख रुपये किंमतीचा जेसीबी पोलिसांनी जप्त केला. सपोनि डॉ.सागर वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय वर्षा डाळींबकर व कर्मचाऱ्यांनी या मध्ये सहभाग घेतला.