स्थैर्य, कोरेगाव, दि.१२ : कोरेगाव तालुका बाजार संघटनेच्या अध्यक्षपदी जयवंत पवार तर उपाध्यक्षपदी मुकुंदराज काकडे यांची बिनविरोध निवड करण्यात आलेली आहे. यावेळी ही निवडप्रक्रिया कोरेगाव तालुक्यातील आठवडा बाजार व्यापारी यांच्या माध्यमातून एकमुखाने केली गेली.
कोरेगाव येथील मार्केट यार्ड येथे कार्यक्रमप्रसंगी ही निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
या बाबत अधिक माहिती अशी की, आठवडा बाजार करणाऱ्या लोकांना आजपर्यंत झालेल्या अन्यायाच्या विरोधात वाचा फोडण्यासाठी ठाम असे कोणीही पाठीशी नाही. बऱ्याच आठवडा बाजारच्या ठिकाणी विविध प्रकारे वेगवेगळ्या मार्गाद्वारे अन्याय होत असतात. या अन्यायाच्या विरोधात वाचा फोडण्यासाठी कोरेगाव तालुका बाजार संघटनेची स्थापना करण्यात आलेली आहे.
यावेळी तालुक्यातील आठवडा बाजार करणारे व्यापारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या संघटनेच्या विविध पदाधिकारी निवडी जाहीर झाल्या असुन यामध्ये अध्यक्षपदी कोरेगावचे माजी उपनगराध्यक्ष जयवंत पवार तर उपाध्यक्षपदी धडाडीचे पत्रकार मुकुंदराज काकडे यांची निवड करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे संचालक मंडळाचीही कार्यकारणी जाहीर करण्यात आली.
कार्यक्रमादरम्यान विविध मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली. या कार्यक्रमाला आठवडा बाजार करणारे व्यापारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले होते. यावेळी संघटनेची ध्येय व धोरणे संघटनेची पुढील वाटचाल याविषयी सविस्तर चर्चा पार पडली.