दैनिक स्थैर्य । दि. १३ जून २०२२ । सातारा । जयराम स्वामी विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेजमध्ये आसपासच्या गावांमधून विद्यार्थी शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात येत आहे. येथील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी आवश्यक सर्व शैक्षणिक सोयी-सुविधा देण्यासाठी नेहमीच सहकार्य राहील, अशी ग्वाही पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली.
वडगाव (ज स्वा.) येथील जयराम स्वामी विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेजला इन्फोसिस संस्थेने 40 संगणक दिले आहेत. या संगणक कक्षाचे उद्घाटन पालकमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास खटावचे गटविकास अधिकारी उदयसिंह साळुंखे, नायब तहसील रविराज जाधव, हुतात्मा मंडळाचे अध्यक्ष डॉ. विकास घार्गे, प्राचार्य जी.आर. काळे,इन्फोसिसचे मिलिंद इंगूळकर, अरुण जगताप, अंकुश घार्गे आदी उपस्थित होते.
श्री. पाटील म्हणाले, जयराम स्वामी विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेजमध्ये शिक्षण घेतलेले विद्यार्थी चांगल्या पदावर काम करीत आहेत. संगणक ज्ञान ही काळाची गरज आहे. संगणकाचा वापर दैनंदिन जीवनात पदोपदी होत असलेला दिसून येतो. संगणक ज्ञानामध्ये झालेल्या प्रचंड वाढीमुळे संगणक शिक्षणक्षेत्रात देखील वेगवेगळ्या कार्यासाठी उपयुक्त साधन आहे. त्यासाठी संगणकीय शिक्षण आवश्यक आहे. या कॉलेजमध्ये सुसज्ज अशी संगणक कक्ष निर्माण करण्यात आला आहे. यामुळे येथील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणार आहे.
शाळेला चांगले क्रीडागण आहे. याचा विकास करावा. इन्फोसिसचा अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये नेहमीच सहभाग घेतला आहे. यापुढेही सामाजिक उपक्रमांमध्ये पुढाकार घ्यावा. कोरोना संसर्ग जरी कमी झाला असला तरी विद्यार्थ्यांनी मास्कचा वापर, वेळोवेळी हाताची स्वच्छता आणि सुरक्षीत अंतर ठेवले पाहिजे, असेही पालकमंत्री श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.
या कार्यक्रमास शिक्षक, शिक्षिका, विविध संस्थांचे पदाधिकारी, नागरिक, विद्यार्थींनी, विद्यार्थी उपस्थित होते.