दैनिक स्थैर्य । दि.०४ एप्रिल २०२२ । आटपाडी । महिला आणि युवकांसाठी आटपाडी – खानापूर तालुक्यात विविध उद्योगधंदे निर्माण व्हावेत म्हणून आम्ही ना . जयंतराव पाटील यांच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत , असे उदगार राष्ट्रवादी काँग्रेसचे खानापूर आटपाडी विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष सुशांत देवकर आणि राष्ट्रवादीचे मतदार संघाचे माजी अध्यक्ष आनंदरावबापू पाटील यांनी काढले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ना . जयंतरावजी पाटील साहेब यांच्या सूचनेनुसार एक तास राष्ट्रवादी साठी” या उपक्रमाच्या माध्यमातून आज आटपाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश महासचिव सादिक खाटीक यांच्या पुढाकाराने त्यांच्या निवासस्थानी गाव / प्रभाग भेट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . त्यावेळी हे मान्यवर बोलत होते.
यावेळी सांगोलेचे नेते प्रतापराव कोळेकर, शिवाजीराव गुजर, सामाजीक कार्यकर्ते शंकररावआबा हाके, सामाजीक कार्यकर्ते अनिस खाटीक, असिफ उर्फ बाबू खाटीक, आप्पासाहेब ऐवळे,इन्नुस खाटीक, दस्तगीर शेख, रियाज शेख, अमीर खाटीक, रॉमी शेख, समीर मुलाणी, कुर्बानहुसेन खाटीक, बाळासाहेब ढगे, रहिमान खाटीक, इम्रान शेख, सोहेल खाटीक, नदिम खाटीक, याशीन शेख, जमीर मुलाणी, सोमनाथ जाधव, मुमताज खाटीक, शमा खाटीक, शाबेरा बेपारी, पारुमावशी जाधव, शांताबाई लांडगे, बेबी शेख, रशिदा खाटीक, राबीयाँबसरी खाटीक, रशिदा शेख, इशरतजहाँ खाटीक, फरहीन खाटीक, नंदा मेटकरी इत्यादी अनेक जण उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय खासदार शरद पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील यांनी या अनोख्या उपक्रमाची घोषणा केली होती. असे स्पष्ट करून सुशांत देवकर यांनी, मुख्यमंत्री पदापासून दोन पावले मागे असलेले आणि जिल्ह्यातील प्रत्येक गाव वाडी वस्तीचा पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकालात काढण्याचा ध्यास घेतलेले, आटपाडी खानापूर सारख्या उपेक्षित वंचित तालुक्यावर विशेष प्रेम असणारे ना . जयंतराव पाटील साहेब, आपले नेते आहेत, हे आपणा सर्वांच्या भाग्याचे आहे . त्यांच्या नेतृत्वा खाली हा जिल्हा सर्वात राज्यात अग्रेसर होणार आहे. अशा गतिशील नेतृत्वाच्या पाठीमागे ताकद एकवटणे आपणा सर्वांचे कर्तव्य आहे . गाव प्रभाग भेटी बैठकीच्या माध्यमातून राज्याला ही दिशा देईल अशा विधायक सुचना विचार पुढे येवू शकतात त्याहष्टीने अशा बैठकांना अनन्य साधारण महत्व असल्याचे सुशांत देवकर यांनी स्पष्ट केले.
ना . जयंतराव पाटील साहेबांच्या वर मोठ्या श्रध्देने प्रेम करणाऱ्या सादिक खाटीक यांच्या अंतःकरणात डोकावल्यास तिथे जयंत पाटीलच दिसतील, इतके निस्वार्थ, निरागस प्रेम सादिक खाटीक यांनी केले आहे . आणि जयंत पाटील साहेबांनी ही भाबड्या सच्च्या कार्यकर्त्याला अतिशय आपुलकीने जोपासल्याचा प्रत्यय अनेक वेळच्या भेटीत आम्ही अनुभवला आहे . हा उत्कट चांगुलपणाचा फायदा आपण तालुक्याच्या विकासासाठी करून घेऊ या अशा भावना आनंदरावबापू पाटील यांनी व्यक्त केल्या . महिला आणि युवकांना रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून विविध उद्योग उभारण्यासाठी सर्वांनी सुचना कराव्यात . ना जयंतराव पाटील साहेबांच्या मार्गदर्शना खाली उद्योग व्यवसाय उभारण्याचा प्रयत्न करू . यासाठीची व्यापक बैठक आपण कल्लेश्वर मंदिरात घेण्याचा प्रयत्न करू. अशा विधायक उपक्रमासाठी जयंतराव पाटील आपण आटपाडीत आणू असे ही आनंदरावबापू पाटील म्हणाले.
कार्यकर्त्यांना वैचारिक मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक गाव आणि प्रभागामध्ये प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी राष्ट्रवादीच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी एकत्र यावे. शनिवारच्या या बैठकीत स्थानिक पदाधिकारी त्यांच्या गावातील किंवा प्रभागातील लोकांसोबत प्रासंगिक विषय, प्रश्न, समस्या राजकीय बदलांची चर्चा करावी. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी पदाधिकाऱ्यांनी आपल्या गावात जाऊन संवाद साधावा, असे आवाहन ना . जयंतराव पाटील यांनी केले होते . त्याला अनुसरूनच राज्यातली चौथी आणि आटपाडीतील तिसरी गाव – प्रभाग भेटीची ही बैठक असल्याचे सादिक खाटीक यांनी स्पष्ट केले.
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर स्मारकाच्या, राष्ट्रीय नेते खा. शरदचंद्रजी पवार यांच्या हस्ते लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने मोठ्या संख्येने सांगलीला शनिवारी जावे लागल्याने आज रविवारी आम्ही ही बैठक घेतल्याचे सादिक खाटीक यांनी सांगीतले . पुरुषांच्या बरोबरीने महिलांची संख्या असून महिला आणि युवकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणाऱ्या उद्योगांची उभारणी तालुक्यात व्हावी, अशी अपेक्षा यावेळी अनेकांनी व्यक्त केली.
पश्चिम महाराष्ट्रात सर्वात मोठा, लहान जनावरांचा बाजार म्हणून आटपाडीचा शनिवारचा आठवडा बाजार प्रसिद्ध आहे . राज्यातल्या अनेक जिल्हयातील व्यापारी जनावरे खरेदी साठी येथे येत असतात . त्यांच्या मोठ्या रकमांच्या सुरक्षिततेसह आदल्या दिवशी मुक्कामी राहता यावे म्हणून व्यापारी शेतकरी यांच्यासाठी आटपाडी येथे सर्व संपन्न विश्रामग्रह उभारले जावे . अशी मागणी करून असिफ ( बाबू ) खाटीक यांनी, आटपाडी तालुक्याचे मुख्यालय असलेल्या जि.प शाळा नं.१ येथील शाळेत झाडलोट स्वच्छतेच्या कामां पासून अन्य छोटी छोटी कामे विद्यार्थीच करत असतात . येथे तातडीने शिपाई नेमला गेल्यास विद्यार्थ्यांच्या दृष्टीने ते सोयीचे होईल याकडेही असिफ ( बाबू ) खाटीक यांनी सर्वांचे लक्ष वेधले.