वसंतगड येथील जवान शंकर उकलीकर यांना वीरमरण


दैनिक स्थैर्य | दि. ११ ऑक्टोबर २०२३ | सातारा |
भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेले वसंतगड (ता. कराड, जि. सातारा) येथील शंकर बसाप्पा उकलीकर (वय ३८) यांना लेहमध्ये बर्फाळ भागात एका दुर्घटनेत वीरमरण आले.  ही घटना सोमवार, दि. ९ रोजी घडली. ते शहीद झाल्याचे समजताच वसंतगड परिसरात शोककळा पसरली आहे. ते नायब सुभेदार पदावर कार्यरत होते.

२००१ मध्ये शंकर उकलीकर हे सैन्यदलात भरती झाले होते. वसंतगड येथे जिल्हा परिषद आणि माध्यमिक शिक्षण वि. ग. माने हायस्कूल येथे पूर्ण केल्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण कर्‍हाड येथील सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालयात घेतले. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीचा सामना करत जवान शंकर उकलीकर यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर ते सैन्य दलात भरती झाले होते. सैन्य दलात त्यांनी २२ वर्षे सेवा बजावली होती.

त्यांच्या पश्चात आई, भाऊ – भावजय, पत्नी, सहा वर्षांची मुलगी आर्या असा परिवार आहे. वसंतगड येथील डोंगराच्या पायथ्याशी अंत्यसंस्कार करण्याची तयारी ग्रामस्थांनी सुरू केली आहे.

जवान शंकर उकलीकर हे गावी वसंतगडला दरवर्षी गणपतीला येत असत. परंतु, यंदा लेहमध्ये बर्फाळ प्रदेशात ड्युटीला असल्याने त्यांना सुटी मिळाली नव्हती. सहा महिन्यांपूर्वी ते वसंतगड येथे गावी सुटीला आले होते. हीच कुटुंबीयांशी आणि गावकर्‍यांशी त्यांची शेवटची भेट ठरली.


Back to top button
Don`t copy text!