दैनिक स्थैर्य | दि. २० सप्टेंबर २०२४ | आंतरवली सराटी |
मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे. सगेसोयरे अधिसूचना लागू करण्यासह सरकारने हैदराबाद, सातारा आणि बॉम्बे गॅझेट तत्काळ लागू करावे, अशी त्यांची मागणी आहे. सध्याच त्यांची प्रकृती खालावल्यामुळे काळजी वाढली आहे.
मनोज जरांगे पाटील यांची डॉक्टरांच्या पथकाने त्यांची काल दिवसभरात तीन वेळा तपासणी केली. यावेळी त्यांनी उपचार घेण्यास नकार दिला. काल जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकार्यांच्या पथकाने जरांगे यांची भेट घेऊन त्यांची तपासणी करत उपचार घेण्यासाठी विनंती केली. पण जरांगे पाटील यांनी नकार दिला. मनोज जरांगे यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकार्यांनी दिलीय. जरांगे यांची शुगर लेव्हल ७० वर आली असून बिपी कमी झाल्याचं डॉक्टरांनी म्हटले आहे.