स्थैर्य, सातारा, दि. ११ : सातारा जिल्ह्यात श्रावण कृष्ण अष्टमी ही भगवान श्रीकृष्णाच्या जन्मदिनानिमित्त जन्माष्टमी रूपात दरवर्षी मोठ्या प्रमाणात साजरी होते. मात्र यावर्षी करोना संकटाचे आणि करोना संसर्गाचे आवाहन रोखणे यासाठी जन्माष्टमीचा कार्यक्रम शहरासह जिल्ह्यातील विविध मंदिरात मोठ्या भक्तीपूर्ण वातावरणात मात्र सामाजिक आंतर राखत साजरा झाला. दरवर्षी या उत्सवासाठी तीन दिवसाची असणारी धामधूम मात्र कृष्ण भक्तांना अनुभवता आलीच नाही.
सातारा शहरातील यादोगोपाळ पेठेतील दिवशीकर बंधू यांच्या मुरलीधर मंदिरात जन्माष्टमीनिमित्त आज सकाळी सात ते नऊ या वेळेत वेदमूर्ती माधवशास्त्री भिडे गुरुजी ,विजय वारुंजीकर गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली श्री मुरलीधर विशेष पूजा, पवमान पंचसूक्त, महाभिषेक, आरती ,नैवेद्य संपन्न झाला.रात्री बारा वाजता श्रीकृष्णाचे जन्म काळाचे औचित्य साधून श्री विष्णू सहस्त्रनाम पठण 1000 तुलसी दलाचे कृष्णाला अर्पण करून महाआरती करण्यात आली .यावेळी यजमान म्हणून बाळासाहेब दिवशीकर यांनी पूजा संपन्न केली. दिवशीकर बंधूंचे वतीने श्रीकांत दिवशीकर सुरेश दिवशीकर, संदीप दिवशीकर ,आणि दिवशीकर परिवारातील सदस्यांनी यावेळी सामाजिक अंतर राखून दर्शन घेतले समस्त भक्तांसाठी मंदिराचे बाहेर दर्शन व्यवस्था करण्यात आली होती. सध्या करोना मुळे मंदिरे बंद असल्यामुळे भाविकांनी दारा बाहेरूनच तोंडाला मास्क लावून दर्शन घेतले .दरवर्षीप्रमाणे श्री रामकृष्ण आश्रमातील भक्तांचे शाम नामसंकीर्तन,वेदपाठशाळेतील वेद मूर्तींचे वेदपठण , महिलांची भगवदगीता पठण, शेकडो भाविकांचे उपस्थितीत जन्मोत्सव आणि काल्याचे किर्तन असे कार्यक्रम मात्र यावर्षी रद्द करण्यात आले होते.
जन्माष्टमीनिमित्त मुरलीधर मंदिरात विशेष विद्युत रोषणाई तसेच फुलांची सजावट करण्यात आली होती. भाविकांनी दिवसभर मंदिराबाहेरूनच दर्शन घेण्यासाठी उपस्थिती लावली होती.
सातारा शहरातील करंजे परिसरातील श्री महानुभाव मठातील कृष्ण मंदिर ,उत्तर चिदंबरम नटराज मंदिरातील राधाकृष्ण मंदिर, मारवाड पेठेतील राधाकृष्ण मंदिर,कासट परिवाराचे सत्य नारायण मंदिर, सातारा तालुक्यातील जरेवाडी येथील श्री चक्रधर स्वामी मंदिर यासह श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकरांचे समाधी मंदिरावरील श्रीकृष्ण मंदिर, फलटण तालुक्यातील गिरवी येथील श्री देशपांडे कृष्ण मंदिर, फलटण येथील श्री महानुभाव कृष्ण मंदिर यासह सज्जनगड, कराड ,वाई ,श्रीक्षेत्र महाबळेश्वर येथील पंचगंगा मंदिरातील कृष्ण मंदिर याठिकाणी जन्मोत्सव मोठ्या भक्ती युक्त अंतकरणाने मंदिराचे पुजारी व विश्वस्तांनी साजरा केला.
सातारा जिल्ह्यात टाळेबंदी साठी विशेष सूट देण्यात आली असली तरी बुधवारी सार्वजनिक स्वरूपात होणारे दहीहंडी चे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.