स्थैर्य, मुंबई, दि. १४: मुंबईसह महाराष्ट्रात कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. राज्यात कोरोना रुग्णांची झपाट्याने वाढ होत आहे. कोरोनाची ही वाढणारी साखळी तोडण्यासाठी राज्यातील काही जिल्ह्यात कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे काही जिल्ह्यात लॉकडाऊनही करण्यात आला आहे. मात्र याचा फटका सोन्याच्या व्यवसायावर झालेला दिसून येत आहे. जळगाव जिल्हा हा सोन्यासाठी प्रसिद्ध आहे. जळगावात दररोज सोन्याच्या कोट्यावधी रुपयांचा आर्थिक व्यवहार होत असतो. मात्र जळगावातही कोरोनाची वाढत्या रुग्णसंख्या पाहता तिथेही जनता कर्फ्यू लावण्यात आला आहे. जळगावातील व्यापारांनीही पुढाकार घेत कर्फ्यूला पाठिंबा देत सलग दुसऱ्या दिवशी दुकाने बंद ठेवली. मात्र यामुळे बाजारापेठेत १०० ते १२५ कोटींचा सोन्याचा व्यवसाय ठप्प पडला.
अमरावती, नाशिक, अकोला यासारख्या जिल्ह्यानंतर जळगावातही कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने १२ ते १४ मार्चपर्यंत जनता कर्फ्यू घोषित करण्यात आला असून १५ मार्चला सकाळी ८ वाजेपर्यंत हा कर्फ्यू असणार आहे. जळगावात दररोज सोने चांदी, धान्य ,डाळींचे मोठ्या प्रमाणात व्यापार होतात. शहरातील बाजारपेठांमध्ये जळगावातून कोट्यावधी रुपयांची आर्थिक उलाढाल होत असते. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी तिथल्या व्यापारांनी नुकसानाचा विचार न करता जनता कर्फ्यूला पाठिंबा दिला.
राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ही १५ हजारांच्या पुढे गेली आहे. त्यामुळे राज्यात विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. राज्यातील ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या सर्वाधिक आहे त्या जिल्ह्यांमध्ये ३१ मार्चपर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. लॉकडाऊन टाळायचा असेल तर कोरोनाच्या नियमांचे पालन करा असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.