दैनिक स्थैर्य । दि.११ फेब्रुवारी २०२१ । मुंबई । मराठी भाषा दिनापूर्वी (२७ फेब्रुवारी) मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी जनरेटा लावून धरण्याचे आवाहन मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी पत्रकार परिषदेत केले.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागाने विविध उपक्रम राबविले आहेत. नाशिक येथील अखिल भारतीय साहित्य संमेलनात शांतता ‘मराठीचे कोर्ट चालु आहे’ हा लघुपट दाखविला, त्याचप्रमाणे प्राचिन पुरावे सांगणारे प्रदर्शन भरविण्यात आले. महामहिम राष्ट्रपतींना यासंदर्भात सुमारे २५ हजार पत्रे पाठविण्यात आली आहेत. दरम्यान, येत्या २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा दिन असून त्यापूर्वी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे श्री. देसाई यांनी स्पष्ट केले. यावेळी साहित्यिक रंगनाथ पठारे, भाषा विभागाचे सचिव भूषण गगराणी आदी उपस्थित होते.