स्थैर्य ,मुंबई, दि, २८: रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन आणि प्रख्यात उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील अँटिलिया घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी पार्क केल्याची जबाबदारी दहशतवादी संघटना ‘जैश-उल-हिंद’ने घेतली आहे. या दहशतवादी संघटनेने यासंदर्भातील एक पोस्ट सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. काही दिवसांपूर्वी याच संघटनेने दिल्लीतील इस्रायल दूतावासाबाहेर ब्लास्ट केल्याची जबाबदारी घेतली होती. परंतु मुंबई पोलिसांनी या दाव्याची पुष्टी केलेली नाही. मीडिया रिपोर्ट्समध्ये, याला दहशतवादी संघटनेचा पिब्लिसिटी स्टंट सांगण्यात येत आहे.
या दहशतवादी संघटनेने आपल्या पोस्टमध्ये तपास यंत्रणेला चॅलेंज केले असून पैशांची मागणी केली आहे. पोस्टमध्ये लिहिले आहे की, “हा फक्त एक ट्रेलर असून पिक्चर बाकी आहे. थांबवू शकत असाल तर थांबवून दाखवा. आम्ही तुमची नाकाखाली दिल्लीत जे केले, त्यानंतर तुम्ही मोसादसोबत (इस्रायल गुप्तचर यंत्रणा) हातमिळवणी केली परंतु काहीही झाले नाही. तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला काय करायचे आहे. फक्त पैसे ट्रान्स्फर करा, जे तुम्हाला पहिलेच सांगितले आहे.”