स्थैर्य, श्रीनगर, दि. ७: जम्मूच्या कुंजवानी भागात शनिवारी सुरक्षा दलाने जैश-ए-मुस्तफाच्या दहशवाद्याला जिवंत पकडले. हिदयातुल्लाह मलिक असे या जिवंत पकडलेल्या दहशवाद्याचे नाव आहे. जैश-ए-मुस्तफा ही दहशतवादी संघटना काश्मीर घाटीमधील पाकिस्तानी दहशतवादी समूह जैश-ए-मोहम्मदची प्रमुख संघटना आहे.
जम्मूच्या पोलिस महासंचालकांनी ट्विटरद्वारे माहिती दिली आहे. मलिकला अटक केल्यानंतर कायदेशीर कारवाई सुरु करण्यात आली आहे आणि पुढील तपास सुरु असल्याचं त्यांनी सांगितलं. प्राथमिक तपासात हिदायतुल्ला मलिक हा जम्मूमध्ये दहशतवादी हल्ला घडवण्याचा कट रचत होता.
पिस्तुल आणि ग्रेनेड केले जप्त
जम्मू-काश्मीर पोलिसांनी सांगितले की, विशेष इनपुटनंतर जम्मू आणि अनंतनाग पोलिसांनी संयुक्त कारवाई केली. या दरम्यान दहशतवाद्याने पोलिसांवर गोळीबार केला. प्रत्युत्तरातील कारवाईनंतर मलिकला अटक करण्यात आली. या कारवाईनंतर मलिककडून एक पिस्तुल आणि एक ग्रेनेड जप्त केल्याचे जम्मूचे SSP श्रीधर पाटील यांनी सांगितले.
चांपोरामध्ये दहशतवादी हल्ला
दुसरीकडे श्रीनगरच्या चांपोरा भागात दहशतवाद्यांनी केंद्रीय राखीव पोलिस दलावर हल्ला केला. या हल्ल्यात मनोज कुमार हा जवान जखमी झाला. काश्मीर पोलिस IG विजय कुमार यांनी ही माहिती दिली. दहशतवाद्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. परिसरात घेराबंदी करून शोध मोहीम राबविली जात आहे.
गेल्या वर्षी 221 दहशतवाद्यांना घातले कंठस्नान
याआधी 2 फेब्रुवारी रोजी सरकारने संसदेत सांगितले की, जम्मू-काश्मीरमध्ये मागील वर्षी 221 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. याआधी 2019 मध्ये सुरक्षा दलांनी 157 आणि 2018 मध्ये 257 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते. हा आकडा मागील 3 वर्षांतील सर्वाधिक आहे.