महिलांच्या कार्याला सत्काराने मिळते मोठे प्रोत्साहन! फलटणमध्ये जैन सोशल ग्रुपच्या वतीने ‘रणरागिणींचा’ सन्मान; जागतिक महिला दिन उत्साहात साजरा


फलटण येथे जैन सोशल ग्रुपच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त महिला पदाधिकाऱ्यांचा भव्य सत्कार सोहळा पार पडला. या कार्यक्रमात अध्यक्ष अरिंजयकाका शहा यांनी महिलांच्या सामाजिक कार्याचे कौतुक करत त्यांना प्रोत्साहन दिले.

स्थैर्य, फलटण, दि. १८ मार्च : फलटण शहरात ‘जैन सोशल ग्रुप’ गेली पंधरा-वीस वर्षे सामाजिक क्षेत्रात नेहमीच आघाडीवर राहून उल्लेखनीय कार्य करत आहे. याच जैन सोशल ग्रुपमधील महिला पदाधिकाऱ्यांचा सत्कार करणे हा एक अत्यंत स्तुत्य उपक्रम असून, अशा सत्कारांमुळे महिलांच्या सामाजिक कार्याला आणि त्यांच्यातील नेतृत्वाला मोठे प्रोत्साहन मिळते, असे महत्त्वपूर्ण प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. अरिंजयकाका शहा यांनी केले. ते फलटण येथे ‘जैन सोशल ग्रुप’ आयोजित जागतिक महिला दिन सत्कार कार्यक्रमात अध्यक्षपदावरून बोलत होते.

या विशेष आणि प्रेरणादायी सत्कार कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून फलटणचे ज्येष्ठ पत्रकार मा. श्री. अरविंदभाई मेहता, श्री १००८ चंद्रप्रभू दिगंबर जैन मंदिराचे अध्यक्ष मा. श्री. अनिलकाका शहा (सराफ), MARC महिला सबलीकरण कमिटीच्या कन्वेनर सौ. स्मिता शहा, MaRC योगा व मेडिटेशन कमिटीच्या कन्वेनर सौ. सविता दोशी, जैन सोशल ग्रुपचे अध्यक्ष श्री. श्रीपाल जैन, इव्हेंट चेअरमन श्री. तुषार शहा, संचालक डॉ. श्री. मिलिंद दोशी उपस्थित होते. तसेच संगिनी फोरमच्या माजी अध्यक्षा सौ. अपर्णा जैन, JSG सदस्य श्री. चेतन घडिया, श्री. नंदकुमार दोशी सर, सौ. मयुरी शहा, संगिनी सदस्या सौ. राजश्री महाजन, सौ. नीलम डुडू यांच्यासह मोठ्या संख्येने श्रावक-श्राविका या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित होते.

या दिमाखदार सोहळ्यात जैन सोशल ग्रुप फलटण परिवारातील कर्तृत्ववान ‘रणरागिणींचा’ सन्मानचिन्ह व श्रीफळ देऊन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. यामध्ये सौ. सविता दोशी, सौ. स्मिता शहा, JSG सचिव सौ. निना कोठारी, संचालिका सौ. मनीषा घडिया, संगिनी फोरमच्या अध्यक्षा सौ. मनीषा व्होरा, सचिव सौ. वृषाली गांधी, खजिनदार सौ. विनयश्री दोशी आणि निवेदिका सौ. दीप्ती राजवैद्य यांचा सन्मान करत त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाची मंगलमय सुरुवात सौ. अपर्णा जैन आणि सौ. विनयश्री दोशी यांनी गायलेल्या मंगलाचरणाने झाली. यानंतर JSG संचालिका सौ. मनीषा घडिया यांनी फेडरेशन सूत्र सर्वांसमोर सादर केले. या महिला सत्कार सोहळ्याचे प्रास्ताविक जैन सोशल ग्रुपचे अध्यक्ष श्रीपाल जैन यांनी केले, तर संपूर्ण कार्यक्रमाचे अत्यंत उत्कृष्ट व बहारदार सूत्रसंचालन सौ. दीप्ती राजवैद्य यांनी केले. अतिशय उत्साही आणि आनंददायी वातावरणात हा महिला दिनाचा कार्यक्रम संपन्न झाला.


Back to top button
Don`t copy text!