
स्थैर्य, 18 फेब्रुवारी, सातारा : माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनानिमित्त 19 फेब्रुवारी रोजी संपूर्ण राज्यभरात माय भारत, युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय भारत सरकार अंतर्गत जय शिवाजी जय भारत मेगा पदयात्रा आयोजित करण्यात आली आहे. गतवर्षी या पदयात्रेचा प्रमुख कार्यक्रम पुणे येथे झाला होता तो यावर्षी स्वराज्याची चौथी राजधानी असणार्या ऐतिहासिक सातारा नगरीमध्ये होत आहे. या कार्यक्रमात 10 हजाराहून अधिक शिवप्रेमी सहभागी होणार आहेत. जिल्ह्याच्या दृष्टीने हा कार्यक्रम अत्यंत अभिमानास्पद असून सर्व यंत्रणांनी काटेकोर दक्षता घेत हा कार्यक्रम अत्यंत भव्य दिव्य स्वरुपात संपन्न करावा, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.
शिवजयंतीदिनी राजवाडा गांधी मैदान ते शिवतीर्थ पोवई नाका या मार्गावर राजपथावरुन जय शिवाजी जय भारत मेगा पदयात्रा निघणार आहे. याबाबत झालेल्या नियोजनाचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. या बैठकीला दुरदृश्यप्रणालीद्वारे जिल्हाधिकारी संतोष पाटील व पोलीस अधीक्षक तुषार दोशी उपस्थित होते. तसेच जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, अपर जिल्हाधिकारी मल्लिकार्जून माने, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, माय भारत युवा कार्यक्रमाचे राज्य निदेशक कालीदास घाटवळ, एनएसएसचे क्षेत्रिय निर्देशक अजय शिंदे, जिल्हा युवा अधिकारी स्वप्नील देशमुख, नगर प्रशासन अधिकारी अभिजीत बापट आदी बैठकीला उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, खासदार नितीन पाटील यांच्यासह राज्याच्या मंत्रिमंडळातील सन्माननीय मंत्री महोदय, लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
या मेघा पदयात्रेमध्ये जिल्ह्यातून जवळपास दहा हजार शिवप्रेमी सहभागी होणार आहेत. विविध ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम, मर्दानी खेळ, पोवाडे यांचे नियोजन करण्यात येणार आहेत. पदयात्रा मार्गावर ठिक ठिकाणी पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. पदयात्रा मार्गावर रांगोळी, विद्यूत रोषणाई, सजावट करण्यात आली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर असणार आहे. यासाठी स्वच्छ पाण्याचा पुरवठा करावा, वैद्यकीय सुविधा उपलब्ध ठेवा, पार्कींगची चांगली व्यवस्था उपलब्ध ठेवा, पोलीस विभागातर्फे शासकीय मानवंदनेसाठी चोख नियोजन असावे, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

