
दैनिक स्थैर्य । 11 मार्च 2025 । सातारा ।आई असताना तिची किंमत कळत नाही, मात्र आई गेल्यावर कशालाच किंमत राहत नाही. आज गोडबोले कुटुंबीय आणि परिवाराने आयोजित केलेला हा कृतज्ञतेचा आणि संस्कारांचा संयुक्तिक सोहळा आहे. आईला अशी मुले मिळाली व अशा मुलांना अशी संस्कार करणारी आई मिळाली हे भाग्यच आहे ,असे उद्गार शिवचरित्र व्याख्याते प्रा. नितीन बानुगडे पाटील यांनी काढले.
स्व.सौ. मालतीबाई रामकृष्ण गोडबोले यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या सांगता सोहळा कार्यक्रमात बानुगडे पाटील बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जेष्ठ प्राचार्य पुरुषोत्तम शेठ, वेदमूर्ती विवेक शास्त्री गोडबोले,अशोक गोडबोले, कार्यक्रमाचे संयोजक डॉ.अच्युत गोडबोले यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचा प्रारंभ स्व. मालतीबाई गोडबोले यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पांजली व अभिवादन करून झाल्यावर स्वागत पर कविता वाचन सौ.विभावरी गोडबोले यांनी केले. याप्रसंगी या सर्व मान्यवरांचा सत्कार गोडबोले कुटुंबीयांच्या वतीने अशोक गोडबोले, उदयन गोडबोले, डॉ. चैतन्य गोडबोले यांच्या हस्ते करण्यात आला.
प्रा. नितीन बानगुडे पाटील म्हणाले, परमेश्वराला जे स्वतःला साध्य करता येत नाही ते साध्य करण्यासाठी आईच्या रूपातून आपणापुढे देव एक माध्यम ठेवतो. आईमुळे आपणाला दृष्टी, भावना, जाणीव आणि जगण्याचे सार मिळते .आईचे मोल व्यक्त करता येत नाही हीच मोठी वास्तवता आहे .संस्कारांना शब्दरूप देणार्या आणि साध्या सोप्या शब्दातील आपल्या भावना संत बहिणाबाईंनी लोकांपुढे मांडल्या आणि त्यातूनच ही नवीन पिढी आणि संस्कारक्षम अशी पिढी निर्माण झाली .
मातृत्वासाठी मोठे तप करावे लागतात. यशोदेठाई मातृत्व असले तरी मातृत्वाचे खरे पण देवकीनेच अनुभवले आहे .ज्ञानेश्वरांना दहा वर्षाच्या संत मुक्ताबाईंनी खड्या बोलात योग्य ते सुनावण्याचे काम करून ताटी उघडायला लावली आणि त्यातूनच ज्ञानेश्वर जन्मासाठी त्यांना विठ्ठलपंत आणि रुक्मिणी सारखे आई वडील व्हावे लागते. आपण कुणाचे मूल व्हायचे हे आपल्या हातात नसते ,मात्र आपण कोणाचे आईबाप व्हायचे हे आपल्या हातात असते .आपल्या मुलांवर विचार ,आचार, सवयी चांगल्या लावत त्यातून चरित्र आणि त्यातून चारित्र्य घडवण्याचे काम आई करते .आई ही पहिली शाळा असून जो आईकडे शिकतो तोच घडतो आणि मोठा होतो .अनेक महापुरुष व मोठी माणसे ही मातृभक्तच होती .खर्या अर्थाने मी म्हणतो जे मातृभक्त होते तेच महापुरुष म्हणून पुढे झाले. छत्रपती शिवाजी महाराजांना जिजामाता मासाहेबांनी न्याय मिळवण्यासाठी घडवले आणि त्या संस्कारातूनच शिवबा घडले स्वराज्य स्थापनेचा स्थापनेचे स्वप्न हे मासाहेबांनी पाहिले होते जे शिवरायांकडून त्यांनी पूर्ण करून घेतले .तुम्ही कितीही मोठे व्हा, पण आईला तुम्ही लहानच असता. स्वामी विवेकानंदांनी शिकागो धर्म परिषद जिंकल्यानंतर कलकत्ता येथे मोठ्या मिरवणुकीने जाताना आईचे आशीर्वाद घेतले .आणि आई, तुझ्यामुळेच मी मोठा झालो असे सांगितले.
आज सर्वजण आपण असण्यापेक्षा दिसण्यावर जास्त लक्ष केंद्रित करत आहोत. आज हे जग ब्युटी पार्लरचे झाले आहे. आई-वडिलांबद्दल संवेदना आपण जाग्या ठेवा .बदलत्या तंत्रज्ञानाने जग जरी जवळ आले असले तरी आपलेपणा आपण दुरावतो आहे. त्यामुळे आईच्या संस्काराला धरून राहिला तरच आपल्याला योग्य दिशा व उज्वल भविष्य मिळेल असे सांगितले.
डॉ.अच्युत गोडबोले यांनी स्वर्गीय रामकृष्ण गोडबोले म्हणजेच आमच्या वडिलांची 25 वी पुण्यतिथी आणि मातोश्री स्वर्गीय मालतीबाई गोडबोले यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त गोडबोले परिवाराने विविध सामाजिक उपक्रम राबवले. या कार्यक्रमांना योग्य पद्धतीने लिखित स्वरूपात प्रसिद्धी द्यावी या हेतूने हे पुस्तक प्रसिद्ध करत आहोत. यामध्ये घरातील परिवार सदस्यांसह अनेक ज्ञात, अज्ञात यांचे सहकार्य लाभले. अनेक प्रेरणादायी लेख, मान्यवरांच्या कविता यांचे संकलन करून हे पुस्तक आपल्या सर्वांपुढे सादर करताना मला एक विशेष आनंद होत आहे .आईच्या हस्ताक्षरातील लेखन या पुस्तकात समावेश केले असून वेदमूर्ती विवेक शास्त्री गोडबोले यांच्या मिळालेल्या प्रस्तावनेमुळे या पुस्तकाला अधिकच उंची प्राप्त झाली आहे असे सांगितले.
सौ.अंजली गोडबोले यांनी स्नेहभावाने भरलेले असे सासु -सुनेचे नाते मी खूप वर्ष अनुभवले. अनेक स्मृतींना या कार्यक्रमांमध्ये उजाळा देताना तत्कालीन मातृवंदना कार्यक्रमात ज्या काही आठवणी सांगण्याच्या राहिल्या होत्या, सासूबाईंचा मिळालेला प्रदीर्घ सहवास त्यांचे चांगले व्यक्तिमत्व असंख्य आठवणींचा खजिना हा सोबत आहे .त्यांच्या कामाचा आवाका कामातील विविध रूपे आणि सात्विक, धार्मिक व विनम्र असे त्यांचे अलौकिक व्यक्तिमत्व हे खरोखरच एक आगळे वेगळे प्रेमळ वात्सल्य आणि मायेचा ओलावा देणारे आश्वासक भाव असणारे असे तेजोबुद्धीचे प्रतीकच होते. निरहंकाराने चित्त ठेवत त्यांनी साक्षीभावाचे वैराग्यपूर्ण आणि वैभवशाली असे हे लक्ष्मीचे रूप आणि अनुभवले आणि अशीच सासू सर्वांना मिळो अशीच अपेक्षा मी यावेळी व्यक्त करते असे सांगितले.
यावेळी सौ.स्नेहल शिंत्रे- पटवर्धन यांनीही आपल्या आजीच्या अनेक आठवणींना उजाळा आपल्या मनोगतातून दिला .
वेदमूर्ती विवेकशास्त्री गोडबोले म्हणाले की, आपण जगात पहिले दैवत हे माता मानतो. सर्व देवांची अदिती ही माता असून मातृत्व पाहताना तिच्यात सत्व, रज,तम हे गुण पाहायला मिळतात. स्वर्गीय मालतीबाई यांचे हे पुस्तक प्रकाशित होत असताना यात सामावलेले अनेक लेख मी वाचले आणि ते वाचल्यावर एकाच व्यक्तिमत्त्वात अनेक गुण कशा पद्धतीने भरलेले आहेत. जणूकाही पृथ्वी सारखे अनेक गुण सामावलेले असे हे त्यांचे आदर्श व्यक्तिमत्व होते आत्म्याला ईश्वराचे दर्शन करून देते ती आई. कर्मयोगी हातानी अनेक उत्कृष्ट कामे करणारी माता, अन्नपूर्णा रूपातील आई ही खरोखरच वेदांमध्ये देवत्वाचे वर्णन केल्याप्रमाणे ..मातृदेवो भव.. असेच आहे. आईचे चिंतन गर्भावर होऊन पुढे अपत्यावर त्याचा योग्य परिणाम आपल्याला अनुभवता येतो .जे स्वतः करता आले नाही ते या आईने आपल्या तिन्ही मुलांकडून करून दाखवले असे हे मालतीबाई यांचे तपस्वी व्यक्तिमत्व साहित्य, काव्य रूपात आपण तिन्ही भावंडांमध्ये पाहत आहोत. आता सध्या युगात आई-वडिलांची भीती वाटते. मात्र ही भीती घालन आपण त्यांच्याशी प्रेम साधले पाहिजे. आई नावाने हाक मारण्यातच मोठी प्रेरणा आहे. दोन मिनिटात मॅगी बनवणारे हात हे आईचे नसून ते मम्मा किंवा मम्मीचे असतात .आज प्रसिद्ध झालेले हे पुस्तक खर्या अर्थाने बिघाडातून चांगला बदल घडवणारे आणि आदर्श असे ठरेल आणि या पुस्तकाची प्रेरणा खरोखरच आई-वडिलांनीच या कुटुंबीयांना दिली असावी आणि सर्वांचीच घरे गोडबोले कुटुंबीयांसारखी आदर्श ठरोत ,अशा शब्दात शुभेच्छा दिल्या.
प्राचार्य पुरुषोत्तम शेठ म्हणाले, स्वर्गीय मालतीबाई आणि बन्याबापू गोडबोले यांचे हे जोडपे अनेकांचे मित्र, मार्गदर्शक व सहकारी असे होते. वयाने ज्येष्ठ म्हणून मी या तीनही भावंडांचे कौतुक करतो. मालतीबाई संस्काराच्या व्यासपीठ होत्या. आपल्या नातवंडांवरही त्यांनी मुले आणि सुनांकडून संस्कार पोहोचवले. मृत्यूनंतर ही कृतार्थतेचा आनंद मिळवून दिला. श्यामच्या आईचे पुस्तक वाचल्यानंतर आज आईचा हा पुस्तक रुपी संस्कार संग्रह म्हणजे मातृस्तोत्र डॉ.अच्युत यांनी आपल्या हवाली केले आहे. आणि प्रत्येकाला आपली आई यात भेटेल असे सांगून गोडबोले परिवाराचे कौतुक केले.
या कार्यक्रमात पुस्तक प्रकाशन सोहळ्यानंतर या पुस्तकाच्या करिता विशेष योगदान देणारे प्रशांत गुजर, सौ.जयश्री मुंद्रावळे व चिंतामणी हॉस्पिटलच्या श्रीमती शेख सिस्टर आणि सौ.विभावरी गोडबोले यांचा सत्कार आर्यन गोडबोले, डॉ.सौ.अनुराधा गोडबोले, डॉ.सौ.स्नेहा गोडबोले, सौ.संजीवनी गोडबोले, व सौ.प्रियंवदा,गोडबोले यांच्याहस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रद्युम्न गोडबोले यांनी केले. देव्यापराधक्षमास्तोत्राच्या पठणाने या रंगलेल्या कार्यक्रमाची सांगता झाली.
कार्यक्रमास अनिल काटदरे, श्रीराम नानल ,प्रकाश बडेकर, श्रीकांत शेटे, गौतम भोसले, अॅड. जयवंतराव केंजळे, गजानन बोबडे, पद्माकर पाठकजी, दिलीप पाठक सौ विद्या आगाशे,श्रीमती स्मिता साठे, अभय गोडबोले, प्रदीप भट्टड, अविनाश लेवे यांचेसह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.