दैनिक स्थैर्य । दि. २३ जून २०२२ । मुंबई । एकनाथ शिंदे गटात आमदार का निघालेत हे लवकरच समजेल. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेना पक्ष मजबूत आहे. अजूनही आमच्या संपर्कात सेनेचे बरेच आमदार आहेत. भाजपने आमदारांना डांबून ठेवले असून 17 ते 18 आमदार भाजपच्या गटात ताब्यात आहेत, असा हल्लाबोल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
यावेळी माध्यमांशी संवाद साधताना खासदार राऊत म्हणाले, शिवसेना स्वतंत्र्य पक्ष आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली पक्ष मजबूत आहे. चार आमदार, दोन खासदार, नगरसेवक गेले म्हणजे पक्ष गेला असे होत नाही. हे आमदार का गेले याची कारणे लवकरच समोर येतील. आज सेनेच्या दोन आमदारांची म्हणजे नितीन देशमुख आणि कैलाश पाटील पत्रकार परिषद होणार आहे, यात ते सर्व कहाणी सांगतील. आमदार अमिषाला बळी पडले आहेत, असंही ते म्हणाले आहेत.
पुढे ते म्हणाले की, भाजपच्या कारस्थानाशिवाय भाजपशासित प्रदेशात आमदारांना डांबून ठेवण शक्य नाही. मुख्यमंत्र्यांच्या आजच्या बैठकीसंदर्भात ते म्हणाले, उद्धव ठाकरे आज कोणतीही बैठक घेणार नाहीत. मुख्यमंत्र्यांनी आमदारांना आवाहन केलेलं नाही, त्यांनी परत येऊन लढून दाखवावं, असा इशाराही राऊतांनी दिला आहे. आजही अनेक कार्यकर्ते शिवसेनेशी जोडले आहेत. कोणत्या परिस्थितीत हे आमदार शिवसेना सोडून गेले आणि का गेले? याचा खुलासा लवकच होईल, असंही राऊतांनी स्पष्ट केलं आहे.
मी या आमदारांना बंडखोर मानत नाही. आमच्या संपर्कात वीस आमदार आहेत. ते जेव्हा मुंबईत येतील तेव्हाच या सगळ्याबाबत खुलासा होईल. बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत आम्ही काम केले आहे, त्यामुळे अशा संकटांचा अनुभव आहे. काल रस्त्यावर उतरली ती खरी शिवसेना होती. माझ्यावरही ईडीचा दबाव आहे, मात्र आम्ही पक्ष सोडलेला नाही. शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही शिवसेनेसोबत राहू असंही राऊतांनी स्पष्ट केलं आहे.