दैनिक स्थैर्य । दि. १६ ऑक्टोबर २०२२ । सातारा । अनेक अडचणींवर मात करून मेडिकल कॉलेजचा प्रकल्प मार्गी लागला आहे. संपूर्ण जिल्ह्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्वाचा आहे. त्यामुळे मेडिकल कोलेज उभारणीला विरोध करून या प्रकल्पाला खो घालण्याचे प्रकार चुकीचे आहेत. स्थानिकांचे जे काही प्रश्न असतील ते जिल्हा प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि पालकमंत्री यांच्या माध्यमातून निश्चित सुटतील. त्यामुळे एका चांगल्या प्रकल्पाला विरोध करून हा प्रकल्प रखडवण्याचा प्रयत्न कोणीही करू नये, असे आवाहन आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले आहे.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात शिवेंद्रसिंहराजे यांनी म्हटले आहे की, जिल्ह्यातील मुलांना वैद्यकीय शिक्षण जिल्ह्यातच उपलब्ध व्हावे, जिल्हावासीयांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावी आणि जिल्ह्यात सुसज्ज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असावे, हे उद्देश डोळ्यासमोर ठेवून आणि अनेक अडचणींवर मात करून सातारा मेडिकल कॉलेजचा प्रकल्प मार्गी लागला आहे. शासनाच्या जागेवर मेडिकल कॉलेज उभे रहात असून या प्रकल्पाला काही लोक विरोध करत आहेत. ही बाब अत्यंत चुकीची आहे. विरोध करून हा प्रकल्प रखडवल्यास हा प्रकल्प वेळेत पूर्ण होणार नाही आणि त्यामुळे प्रकल्पासाठीचा खर्च वाढणार आहे. त्यामुळे जिल्हावासीयांचे आणि वैद्यकीय शिक्षण घेवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे, याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे.
स्थानिक लोकांचे पुनर्वसन, रस्ते आदी प्रश्न आहेत ते सुटलेच पाहिजेत पण, त्यासाठी प्रकल्पाचे काम बंद पडणे हा पर्याय मुळीच नाही, हे प्रत्येकाने समजून घेतले पाहिजे. स्थानिकांचे प्रश्न जिल्हा प्रशासन, संबंधित लोकप्रतिनिधी, पालकमंत्री यांच्याकडून सोडवून घेतले पाहिजेत. सर्व प्रश्न सोडविण्यासाठी शासन, संबंधित लोकप्रतिनिधी, पालकमंत्री सगळेच अनुकूल आहेत. यासाठी मदत करण्याची भूमिका सर्वांचीच आहे. त्यामुळे जिल्ह्यासाठी अत्यंत महत्वाच्या असलेल्या प्रकल्पाचे काम बंद पडण्याचे प्रकार कोणीही करू नयेत. आणि प्रशासनानेही प्रकल्पाचे काम जर कोणी बंद पाडत असतील तर, त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे, असेही आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी म्हटले आहे.