सुशिक्षितांचेच आई-वडील वृद्धाश्रमात राहत असल्याचे दुर्दैव – समृद्धी जाधव

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. १९ जून २०२४ | फलटण |
सध्या गुन्हेगारी वाढत असल्याचं वाईट वाटत असून सुशिक्षितांचेच आई-वडील वृद्धाश्रमात राहत असल्याचे दुर्दैव वाटत असल्याची खंत सामाजिक कार्यकर्ते सिनेअभिनेते समृद्धी जाधव यांनी व्यक्त केली.

दुधेबावी, ता. फलटण येथील दुधेबावी ग्रामविकास प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित संत गाडगेबाबा व्याख्यानमालेत समृद्धी जाधव बोलत होते. अध्यक्षस्थानी मुंबईचे पोलीस उपनिरीक्षक सागर नाळे होते.

समृद्धी जाधव म्हणाले, पोपटपंची करण्यापेक्षा कसं जगायचं हे कळणं आवश्यक असून कौशल्यपूर्ण, जीवनात उपयुक्त असणारे शिक्षण काळाची गरज असून सध्याच्या शिक्षण व्यवस्थेवर विचार करून कौशल्य दृष्टीत, जीवन समृद्ध करण्याच्या दृष्टीने बदल करणे गरजेचे आहे. प्रत्येक विद्यार्थ्यात दिव्यत्वाचा अंश असतो. प्रत्येकाने स्वतःला ओळखायला शिकले पाहिजे. ‘हातातली खेळणी आणि ओठातली गाणी’ ही घरातली संस्कृती सांगत असते. बुध्दीवंत आणि बलवंत पिढी झाली तरच राष्ट्राची प्रगती होईल. जर योग्य संस्कार नसले तर जीवनाचा अंत व्हायला वेळ लागणार नाही. चांगुलपणाचा संस्कार गरजेचा असून वेदनेला साधना म्हणून प्रतिकूल परिस्थितीवर मात करणे गरजेचे असल्याचे समृद्धी जाधव यांनी स्पष्ट केले.

मुंबईचे पोलीस उपनिरीक्षक सागर नाळे म्हणाले, दुधेबावी ग्रामविकास प्रतिष्ठानची व्याख्यानमाला आम्हाला प्रेरणादायी ठरली असून सातत्यपूर्ण चालणारी व्याख्यानमाला समाजाला दिशादर्शक ठरत असून नवयुवकांना निश्चितच मार्गदर्शक ठरत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. गेली २४ वर्षे सातत्याने होत असलेली व्याख्यानमाला अधिकारी बनण्यासाठी समाजातला चांगला नागरिक घडण्यासाठी निश्चित फायदेशीर ठरत असल्याचे सागर नाळे यांनी स्पष्ट केले.

चांडाळ चौकडीच्या करामती फेम, गणा पैलवान वेबसिरीज फेम, अभिनेते तुषार घोरपडे उर्फ गणा पैलवान म्हणाले, ग्रामीण भागात होत असलेले प्रबोधन सकारात्मक परिवर्तनाला कारणीभूत ठरत असून सद्य:परिस्थितीत धकाधकीच्या युगात निश्चित मार्गदर्शक ठरत आहे. चांगले कार्य करणार्‍यांना प्रोत्साहन देण्याची प्रतिष्ठानची संकल्पना निश्चितच प्रेरणादायी ठरत आहे. यावेळी राज्यस्तरीय कलारत्न पुरस्काराने प्रसिद्ध अभिनेते तुषार महादेव घोरपडे उर्फ गणा पैलवान यांना सन्मानित करण्यात आले.

मान्यवरांचे स्वागत प्रतिष्ठानचे अध्यक्ष शशिकांत सोनवलकर यांनी केले. प्रास्ताविक संत गाडगेबाबा व्याख्यानमाला कमिटीचे अध्यक्ष सागर कारंडे यांनी केले. सूत्रसंचालन सांस्कृतिक कमिटीचे अध्यक्ष सचिन सोनवलकर व प्रतिष्ठानचे सचिव विठ्ठल सोनवलकर यांनी केले. उपस्थितांचे आभार प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष विजयकुमार नाळे यांनी मानले.

महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष हनुमंतराव सोनवलकर, सामाजिक कार्यकर्त्या कल्पनाताई गिड्डे, प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष संतोष भांड, खजिनदार डॉ. युवराज एकळ, अ‍ॅड. ऋषिकेश बिचुकले, भानुदास सोनवलकर, पोपटराव सोनवलकर भीमराव नाळे, कृषीमित्र संजय सोनवलकर, तात्याबा सोनवलकर, सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय दडस, फलटण तालुका ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष सुभाषराव सोनवलकर, अण्णासाहेब भुंजे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!