स्थैर्य, मुंबई, दि. १७ : निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाजे यांच्यासाठी रात्रंदिवस बैठका घेणारे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे जनतेच्या प्रश्नांसाठी सुद्धा बैठकाचा धडाका कधी लावणार असा सवाल भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आ. डॉ. संजय कुटे यांनी बुधवारी उपस्थित केला .
भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजीत केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यावेळी उपस्थित होते.
श्री. कुटे म्हणाले की, दुपारनंतर शासकीय कामकाजाला सुरूवात करणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गेल्या तीन दिवसांपासून बैठकामागून बैठका घेत आहेत, ही एक आश्चर्यजनक बाब आहे. वाजे यांच्यासाठी एवढ्या तत्परतेने ज्या बैठका घेतल्या जात आहेत तशा बैठका सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी कधी घेतल्या जाणार असा प्रश्न सामान्य माणसाला पडला आहे.
श्री. कुटे म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारने सत्तेत आल्यावर पीक विमा योजनेचे निकष बदलल्यामुळे राज्यातील शेतकरी पीक विमा योजनेच्या लाभापासून वंचित राहिलेले आहेत. नैसर्गिक संकटामुळे सोयाबिन, उडीद, कापूस उत्पादक शेतकरी जेरीस आलेला आहे. त्यात सक्तीच्या वीज बिल वसूलीचे सुलतानी संकटही शेतकऱ्यांवर कोसळले आहे. विधानसभेत वीज बील वसुलीस स्थगिती दिल्याचे आश्वासन दिल्यानंतर विधिमंडळ अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी ही स्थगिती उठवण्यात आली. महाविकास आघाडी सरकार किती दुटप्पी आहे हे यातूनच स्पष्ट होते. कोरोनाच्या नावाखाली सर्व प्रश्नांपासून पळ काढणारे हे सरकार प्रत्यक्षात कोरोना परिस्थितीही आटोक्यात ठेवण्यात अपयशी ठरलेले आहे अशी टीका आ. कुटे यांनी केली.