
आ. शिवेंद्रसिंहराजे; तृतीयपंथी लोकांना केली अन्नधान्याची मदत
स्थैर्य, सातारा, दि. ०३ : कोरोना महामारीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून समाजातील अनेक घटकांवर त्याचा फारमोठा विपरीत परिणाम झाला आहे. हातावर पोट असणाऱ्या, रोजंदारी करणाऱ्या आणि विशेषकरून तृतीयपंथी लोकांवर उपासमारीची दुर्देवी वेळ आली आहे. बिकट परिस्थितीत समाजातील कोणताही घटक उपाशी राहू नये, हि प्रत्येकाची जबाबदारी असून सामाजिक बांधिलकी म्हणून प्रत्येकाने गरजवंतांना मदत करावी, असे आवाहन आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले आहे.
कोरोना महामारीमुळे अडचणीत सापडलेल्या असंख्य गोर- गरीब, मजूर आणि गरजवंतांना आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी मदतीचा हात दिला आहे. कोरोना आणि लॉक डाऊन यामुळे तृतीयपंथी लोकांवरही उपासमारीची वेळ आली. याबाबत जाणीव तृतीयपंथी विकास सामाजिक संस्थेचे आर. डी. भोसले यांच्याकडून आ. शिवेंद्रसिंहराजे यांना समजले. यानंतर आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी तात्काळ जीवनावश्यक वस्तूंची मदत दिली. या मदतीचे वाटप प्रातिनिधिक स्वरूपात करण्यात आले. यावेळी आ. शिवेंद्रसिंहराजे बोलत होते. याप्रसंगी श्रीमंत सौ. वेदांतिकाराजे भोसले, आर. डी. भोसले आदी उपस्थित होते.
सुमारे ३० कुटुंबांना गहू, तांदूळ, खाद्यतेल, डाळ, साखर, मसाला आदी धान्याची पॅकेट्स दिली असून ही मदत नाही तर सामाजिक बांधिलकी म्हणून बजावलेले कर्तव्य आहे, असे सौ. वेदांतिकाराजे भोसले यावेळी म्हणाल्या. मदतीबद्दल दोघांचेही जाणीव संस्था आणि सर्व तृतीयपंथीयांनी आभार मानले.