मनुष्याच्या जीवनात त्याच्या कार्यकर्तृत्वाच्या बहराचा सर्वोत्तम कालखंड तथा वयोगट कोणता असतो, यावर अनेक मतमतांतरे पाहावयास मिळतात. साधारणत: पंचवीस ते चाळीस या कालावधीत मनुष्य अत्यंत उत्साही व अधिक कष्टाळू असल्याचा अनेकांचा दावा आहे. काहींना हा कालावधी चाळीस ते साठ यादरम्यान असतो, असे वाटते. तर अगदी थोडकेच जण साठीनंतरच कार्यकर्तृत्वाला खरी बहारी अन् झळाळी येते, या मताचे दिसतात. तथापि, कार्यकर्तृत्वाचा सर्वोत्तम कालावधी हा व्यक्तीपरत्वे व परिस्थितीपरत्वे भिन्न भिन्न असतो. हा निष्कर्ष सर्वमान्य आहेच, तरीही काही घटना, परिस्थिती यांचा विचार करता साठीनंतरचा कालावधी हा कोणत्याही कार्यासाठी अधिक उत्साही असल्याचे जाणवते. कारण या कालावधीत मनुष्य अनेक व्यापा-तापातून तावून-सुलाखून बाहेर आलेला असतो. संकटाशी झुंजण्याची त्याची क्षमता व उमेद अधिक बळावलेली असते. शिवाय व्यक्तिगत वा कौटुंबिक जबाबदारी व कर्तव्यातून तो काहीसा मुक्त तथा अलिप्त झालेला असतो. त्यामुळे आपल्या उर्वरित इच्छा-आकांक्षा व स्वप्ने तथा संकल्प पूर्तीसाठी आपल्यातील सर्वोत्तम क्षमता, कौशल्य व बुध्दिमत्ता यांचा वापर करण्यासाठी तो सज्ज असू शकतो. अर्थात हे अपवादात्मक असल्याचे मान्य केले तरी वस्तुस्थितीनुरूप यातील सत्यता तपासली असता आपणास हा विचार मान्यच करावा लागेल. कारण या कालावधीत हाती घेतलेले संकल्प, प्रकल्प पूर्णत्वाला नेण्यासाठी स्वत:ला झोकून देऊन यशस्वी होणार्या व्यक्ती संख्येने अधिक नसल्या तरी अगदीच नगण्य आहेत असेही नव्हे. जगातील अनेक विविध क्षेत्रातील कर्तृत्वसंपन्न यशस्वी व्यक्तींची यादी केल्यास निश्चितपणे आपण अचंबित होऊ शकतो. प्राचार्य विश्वासराव देशमुख हे यातीलच एक नाव आहे, असे मला वाटते.
आज प्राचार्य देशमुख सर आपल्या जीवनाची चौर्याऐंशी वर्षे पूर्ण करून पंच्याऐंशीत पदार्पण करत आहेत. मात्र, त्यांचा उत्साह आजही चाळीसीतला असल्याचे जाणवते. चालू वा संकल्पित कामाची आवश्यक कच्ची सामग्री संकलन, कामाची वेळेनुसार विभागणी, कार्यपूर्तीसाठी करावयाचा सातत्यपूर्ण पाठपुरावा ही त्यांची कार्यशैली आहे. थोडक्यात, काळ, काम आणि वेगाचे अचूक गणित सोडविण्याची कला त्यांच्याकडे असल्याकारणाने हाती घेतलेल्या कोणत्याही कामात यशस्वी होणे, हा त्यांचा हातखंडा असल्याचे दिसते. विशेषत: १९९९ म्हणजे प्राचार्य पदावरून निवृत्त झाल्यापासून ते आपल्या कामात अधिक व्यग्र आणि व्यस्त झालेले दिसून येतात. ‘देशमुख सर, आपण निवृत्त झाल्यावर अधिक प्रवृत्त होतो, आपल्याला खरं कळू लागतं ते निवृत्त झाल्यावरच!’ निवृत्तीच्या वेळी प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी केलेल्या या विधानाने ते अधिक दक्ष झाले. या विधानाचा अर्थ सार्थ करण्याचा प्रयत्न त्यांनी पुढील कालावधीत केलेला दिसतो. निवृत्तीनंतरची सरांची कार्यव्याप्ती पाहिली तर ‘प्रवृत्त’ होणे म्हणजे काय, याची प्रचिती आपणास येईल.
तसे पाहता बालपणापासूनच त्यांचे व्यक्तिमत्त्व उत्तम कलागुणांनी संपन्न व समृद्ध असलेले दिसते. वडील शिक्षक असल्यामुळे संस्कारांचे अनेक बाळकडू त्यांना घरातच मिळालेले दिसते. नियमित अभ्यास, खेळातील कौशल्यप्राप्ती, वागण्या-बोलण्यातील शिस्त या सवयी त्यांना बालपणातच जडल्या होत्या. पुढे शैक्षणिक व व्यक्तिगत प्रगतीचा एक-एक टप्पा पूर्ण करताना या संस्कार-कौशल्यांचा त्यांना खूप उपयोग होतो. प्राथमिक, माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षणात त्यांची गती उत्तम होईल. शिवाय अभिनय व खेळातही त्यांनी विशेष प्राविण्य प्राप्त केलेले होते. पुढे प्राध्यापक (शिक्षक) या पदावर नोकरी मिळाल्याने त्यांच्या जीवनाला स्थिरता प्राप्त झाली. आपली क्षमता, कौशल्य व बुध्दिमत्तेनुसार त्यांनी या पदाला अत्यंत प्रामाणिकपणे न्याय दिला. याच काळात विवाह, संसार तथा प्रापंचिक जबाबदार्याही त्यांनी उत्तमपणे सांभाळल्या. आई-वडिलांचे कृपा-संस्कार, मेहनती वृत्ती, धाडसीपणा, नवनिर्माणाची आस यामुळे सरांचा हा उमेदीचा काळ अत्यंत समाधानकारकपणे व्यतित झालेला दिसतो. अर्थात आकस्मितपणे आपल्या ‘आनंद’ या तरुण मुलाचा अकाली मृत्यू त्यांना हेलावून टाकतो. मात्र, याचा परिणाम त्यांच्या सार्वजनिक जीवनावर ते फारसा होऊ देत नाहीत. संकटेच माणसाला धैर्य आणि साहसी बनवतात, याची अनुभूती आल्याने पुढील काळात सर अधिकच सक्षम व सतर्क बनतात. याची प्रचिती त्यांच्या प्राचार्य पदाचा कार्यकाळ जाणून घेताना येते. एक अभ्यासू विद्यार्थी, प्रतिभावान खेळाडू, गुणवान शिक्षक, जबाबदार कुटुंबप्रमुख आणि कुशल प्रशासक अशा विविध भूमिकांतून त्यांचे निवृत्तीपर्यंतचे जीवन साकारलेले दिसते.
निवृत्तीनंतर सरांनी आपल्या जीवनकार्याचा फार गांभीर्याने विचार केलेला दिसतो. कारण या काळात त्यांनी फलटण एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष, श्रीमंत निर्मलादेवी पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन, नाईक निंबाळकर देवस्थान ट्रस्टचे सदस्य आणि मालोजीराजे प्रतिष्ठानचे सचिव या महत्त्वपूर्ण संस्थांची महत्त्वाची पदे अत्यंत सक्षमपणे सांभाळलेली दिसतात. सरांच्या जीवनातील हा ‘बहारीचा व झळाळीचा काळ’ असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. फलटण एज्युकेशन सोसायटीच्या व्यवस्थापन मंडळात सरांचा मोठा सहयोग आहे. गेली एकोणीस वर्ष ते उपाध्यक्ष या नात्याने आपली जबाबदारी व कर्तव्य उत्तमपणे सांभाळत आहेत. विशेषत: मुधोजी महाविद्यालयाच्या प्रगतीकडे त्यांचे अधिक लक्ष असलेले जाणवते. नोकरीच्या सुरूवातीच्या काळापासूनच त्यांनी आपल्या स्वभाव व कामातून श्रीमंत मालोजीराजे, श्रीमंत शिवाजीराजे तथा नाईक निंबाळकर राजघराण्यातील इतर व्यक्तींचाही विश्वास संपादन केल्यामुळे आज श्रीमंत रामराजे, श्रीमंत रघुनाथराजे, श्रीमंत संजीवराजे यांच्यासमवेत काम करताना त्यांना कसलीही अडचण वा संकोच वाटत नाही. फलटण एज्युकेशन सोसायटीप्रमाणेच नाईक निंबाळकर देवस्थान ट्रस्टच्याही कार्यात सरांनी चांगला सहभाग व सहयोग दिलेला आहे. त्यामुळे राजघराण्यात त्यांना आदराचे व मानाचे स्थान असल्याचे दिसते.
श्रीमंत निर्मलादेवी पतसंस्थेची स्थापना व आजअखेर या संस्थेने केलेली प्रगती पाहता आर्थिक क्षेत्रातही सरांना उत्तम ज्ञान व अनुभव असल्याचे जाणवते. आजच्या काळात सरकारचे पतसंस्थांविषयक काटेकोर धोरण, मानसिकता यांचा विचार करता पतसंस्था चालवणे अत्यंत आव्हानात्मक असल्याचे दिसते. मात्र, या परिस्थितीतही या पतसंस्थेने मोठी मजल मारलेली दिसते. मी स्वत: या पतसंस्थेचा सभासद व गुंतवणूकदारदेखील आहे. सरांच्या शिस्त व सतर्कतेमुळे या संस्थेचा चांगला नावलौकीक वाढत असल्याचे मला दिसते आहे.
श्रीमंत मालोजीराजे स्मृती प्रतिष्ठानचे सचिव म्हणून सरांचा दीर्घ कालखंड विचारात घेता व या काळातील त्यांचे कार्य लक्षात घेता, त्यांच्या उत्साही व कार्यमग्नतेचा खरा परिचय घडतो. या प्रतिष्ठानला संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिष्ठा प्राप्त करून देण्यात सरांचे मोठे योगदान आहे. या प्रतिष्ठानच्या वतीने प्रतिवर्षी दि. १४ मे ते २५ मे या कालावधीत श्रीमंत मालोजीराजे व श्रीमंत शिवाजीराजे स्मृती महोत्सव आयोजित केला जातो. या महोत्सवाचे व तसेच राजघराण्यातील इतर व्यक्तींच्या स्मृतीप्रीत्यर्थ आयोजित केले जाणारे विविध कार्यक्रम व उपक्रमांचे अत्यंत नेमके व नेटके नियोजन करण्यात सरांचे विशेष परिश्रम असतात. या महोत्सवाच्या माध्यमातून महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरील अनेक विद्वान, प्रतिभावान, कलावंत अशा व्यक्तींचे सान्निध्य व सहवास सरांना मिळाला आहे. आर. आर. आबा ते शरद पवार, सिंधुताई सपकाळ ते प्रकाश आमटे, विश्वनाथ कराड ते अॅड. रावसाहेब शिंदे, अनिल काकोडकर ते विजय भटकर, शौनक अभिषेकी ते श्रीधर फडके आणि जयसिंगराव पवार ते सदानंद मोरे अशा राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, संशोधन कला व साहित्य क्षेत्रातील दिग्गज विभूतींशी सरांचा अगदी जवळून परिचय आहे. ही यादी खूप मोठी आहे. मात्र, लेख विस्तारभयास्तव काही मोजकीच मालिका येथे दिली आहे. या सर्व महान मान्यवर व्यक्तींच्या विचार, कार्य व स्वभावाचे सरांनी जवळून अवलोकन केले असल्याने त्याचा अनुकूल प्रभाव सरांच्या व्यक्तिमत्त्वावर होत गेल्याचे दिसते. त्यामुळे सरांच्या मूळच्या कार्यशैलीला आणखी झळाळी आणि गती प्राप्त झाल्याचे जाणवते.
या महोत्सव व इतर उपक्रमांत सरांचा कमालीचा उत्साह जाणवतो. प्रत्येक कार्यक्रमाचे सूत्रबध्द व सभासंकेतानुरूप नियोजन करण्याचा सरांचा आग्रह तथा अट्टाहास असतो. श्रीमंत मालोजीराजे यांच्या विचारांना व राजघराण्याच्या प्रतिष्ठेला शोभेल असे उत्तम कार्यक्रम व त्याकरीता आलेल्या मान्यवर अतिथींचा उचित आदरसत्कार तथा आदरातिथ्य यावर सरांचे विशेष लक्ष असते. नियोजित कार्यक्रम पूर्णत: यशस्वीपणे पार पडेपर्यंत आणि अतिथींचे भोजन व त्यांना निरोप देईपर्यंत सर विशेष परिश्रम घेताना दिसतात. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी या वयातील त्यांची धडपड व नियोजन वाखाणण्यासारखेच आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे दिवसेंदिवस या कामातील त्यांचा उत्साह वाढतानाच दिसतोय. यावर अनेकांचा विश्वास बसणार नाही, मात्र हे सत्य आहे. कारण गेली चार वर्षे मी प्रतिष्ठानचा सदस्य म्हणून त्यांच्यासोबत या कार्यक्रमामध्ये प्रत्यक्ष सहभागी आहे.
निवृत्तीच्या काळात सरांनी आणखी महत्त्वाचे एक कार्य साकारले, ते म्हणजे साहित्यनिर्मिती. यापूर्वी सेवेत असताना त्यांनी ‘माणदेशी कथा’ हा कथासंग्रह व काही वर्तमान पत्रातील लेख यांचे संपादन व लेखन केले होते. मात्र, निवृत्तीनंतर त्यांची प्रतिभा अधिक वेगाने बहरलेली दिसते. या काळात त्यांनी साकारलेल्या ‘श्रीमंत मालोजीराजे’, ‘श्रीमंत शिवाजीराजे’, ‘गोष्टी मालोजीराजांच्या’ व ‘आधुनिक भगिरथ’ या राजघराण्यातील प्रमुख व्यक्तींच्या चरित्रग्रंथांच्या रूपाने त्यांना नाईक निंबाळकर राजघराण्याचे ‘प्रमाणभूत चरित्रकार’ हा बहुमान प्राप्त करून दिला आहे. याशिवाय श्रीमंत योगी व इतर काही संपादनातून त्यांच्यातील सजग संपादकाची छाप उमटलेली दिसते. या सर्व चरित्र लेखनात त्यांनी कमालीची निष्ठा ओतली असल्याचे दिसते. अत्यंत अभ्यासपूर्ण व समतोलपणे त्यांनीही चरित्रे साकारलेली दिसतात. ‘माझे जीवन गाणे’ या आत्मचरित्रातून सरांनी स्वत:च्या जीवनाचा आलेख रेखाटलेला आहे. वस्तुनिष्ठता व सत्यप्रियता यामुळे हे आत्मचरित्र वाड्मयीनद़ृष्ट्या सकस अवतरलेले आहे.
आज ‘संतांचे जीवनकार्य’ या ग्रंथाच्या निर्मितीत सर गुंतलेले आहेत. महाराष्ट्राच्या समाजजीवनाला योग्य दिशा देणार्या संतांच्या कार्याचा नेमका व नेटका परिचय या ग्रंथातून साकारला जात आहे. ही सर्व ग्रंथसंपदा साकारताना सरांनी अत्यंत मेहनत व अभ्यास केलेला दिसतो. या वयातही तीन-तीन, चार-चार तास बैठक मारून सर लेखन करतात. या प्रत्येक कामात त्यांचा सदोदीत उत्साह व अपार मेहनत असलेली पाहावयास मिळते.
निवृत्तीच्या कालावधीतील आपल्या जीवनसहचरणीच्या वियोगाचा धक्का पचवताना त्यांना प्रचंड यातना झाल्या. मात्र, येथेही त्यांच्या स्थितप्रज्ञतेचे दर्शन पाहावयास मिळाले. पुन्हा अधिक जोमाने त्यांनी आपल्या नियोजित कार्यात झोकून दिले. आज सर आपल्या ‘आनंद’ भवनात मुले ज्ञानेश्वर व मिलिंद, स्नुषा सौ. नीलम व सौ. मानकुंवर आणि नातवंडे चि. अभिजित, रत्नजित, विश्वजित व वैदेही यांच्यासह समाधान व संतृप्तीचा अनुभव घेत आहेत. दोन्ही मुलांच्या संसाराची स्थिरता व नातवंडांची विविध क्षेत्रातील प्रगती पाहून ते अत्यंत प्रसन्न व आनंदी आहेत. तरी आजही त्यांचा उजाडलेल्या व उजाडणार्या प्रत्येक दिवसाच्या कामाचे नियोजन ठरलेलेच आहे. सकाळचा हलकासा व्यायाम, आहार-उपहार, लेखन-वाचन-चिंतन याबरोबरच इतर महत्त्वाच्या कामांचे काटेकोर नियोजन व वेळापत्रक तयार आहे. प्रत्येक कामात उत्साह भरून मग्न होऊन जाणे, हा त्यांच्या स्वभावाचा भाग बनलेला आहे. त्यांची ही सातत्यपूर्ण सदोत्साहितता व अविरत कार्यमग्नता त्यांना शतायुषी होईपर्यंत कायम सोबत राहो! त्यांना निरोगी आयुरारोग्य लाभो, हीच ईश्वराकडे प्रार्थना!
– प्रो. डॉ. अशोक शिंदे
प्राध्यापक, मराठी विभाग,
मुधोजी महाविद्यालय, फलटण.
मोबा. ९८६०८५०३४४, ९५११७४२०३०