
दैनिक स्थैर्य । दि. ०८ डिसेंबर २०२२ । फलटण । फलटण तालुक्यातील सोनगाव येथील गायरान जमिनीमध्ये गेले चार ते पाच पिढ्या वास्तव्य असलेली घरे आता शासनाच्या धोरणामुळे उध्वस्थ होण्याच्या मार्गावर आहेत. यामध्ये नोव्हेंबर महिन्यात गायरान जमिनीवरील वास्तव्यास असलेल्या नागरिकांना अतिक्रमण असलेली घरे काढून टाकावेत अश्या नोटीस प्राप्त झालेल्या आहेत. असे जर झाले तर सर्वसाधारण नागरिक हे रस्त्यावर येतील त्यामुळे यामध्ये शासनाने योग्य तो तोडगा काढावा, अशी मागणी सोनगाव ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आलेली आहे.
सोनगाव गावाच्या हद्दीमध्ये असणाऱ्या गायरान जमिनीमध्ये राहणारे बहुसंख्य नागरिक हे दारिद्र्य रेषेखालील व आर्थिक दुर्बल आहेत. शेती महामंडळातील निवृत्त कर्मचारी आहेत. सोनगाव मधील नागरिकांनी आयुष्यभर कमवून आपले घराचे स्वप्न पूर्ण केले आहे. गायरान जमिनीमधील जर घरे काढली तर सर्वसामान्य नागरिक हे बेघर झाल्याशिवाय राहणार नाहीत.
सोनगाव गायरान जमीनीवरील पिढ्यांपिढ्या असलेले अतिक्रमण नियमित करावे यासाठी राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते भीमदेव बुरुंगले व सोनगावचे सरपंच सौ. ज्योत्स्ना रमेश जगताप यांच्या नेतृत्वाखाली विविध अधिकाऱ्यांना लेखी स्वरूपात निवेदन देण्यात आले.