दैनिक स्थैर्य । दि. २३ नोव्हेंबर २०२२ । पुणे । पुण्यात नवले पूल परिसरातील अपघातांची मालिका थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. रविवारी सायंकाळी एका ट्रकने तब्बल ४८ वाहनांना ठोकरल्याने पुणेकरांच्या काळजाचा पुन्हा ठोका चुकला. हा अपघात पुण्यात झाला असला, तरी नियोजनशून्य विकास आणि प्रचंड वेगाने होत असलेले शहरीकरण यांचे कंगोरे त्याला आहेत; त्यामुळे त्याकडे व्यापक परिप्रेक्ष्यातून पहायला हवे. अपघात झाला तो परिसर मुंबई-बेंगळुरू महामार्गाचा एक भाग आहे. दोन दशकांपूर्वी बाह्यवळण म्हणून तो उभारला गेला; आज त्याच्या दोन्ही बाजूंना मोठ्या प्रमाणावर वस्ती वाढली आहे. त्यामुळे तो शहरांतर्गत रस्ता बनला असून, वाहतुकीच्या अखंड वर्दळीमुळे नवले पुलासह अनेक भाग अपघातप्रवण क्षेत्र बनले आहेत. शहरीकरणाच्या वेगाचा अंदाज न आल्याने काय होते, याचे हे उदाहरण. गेल्या पाच वर्षांत नवले पुलाच्या परिसरात ३८ अपघात झाले असून, त्यांत २२ प्राण गेले आहेत. बहुसंख्य अपघातांमध्ये एखाद्या नियंत्रण सुटलेल्या (बहुधा अवजड) वाहनाने एकाहून अधिक वाहनांना ठोकरल्याच्या या घटना आहेत. म्हणजे यात एक विशिष्ट ‘पॅटर्न’ आहे. साताऱ्याकडून महामार्गाने सुसाट वेगाने येणाऱ्या वाहनांना या परिसरात अचानक शहरातील गर्दीमुळे वेग कमी करणे अवघड होते. दुसरीकडे कात्रज भागातील या रस्त्याला तीव्र उतार आहे. त्यावरून अनेक वाहने इंजिन बंद करून येतात. त्यामुळे त्यांचा वेग नियंत्रित होत नाही. येथील अपघातांनंतर तज्ज्ञ समित्या नेमल्या गेल्या; त्यांचे अहवालही आले.
‘रम्बल स्ट्रीप’ टाकणे, मार्गदर्शक फलक लावणे, असे उपायही झाले. आता तीव्र उतार कमी करावा, असे अनेकांचे मत आहे. कोणत्याही परिस्थितीत येथील अपघातांची मालिका थांबविणे आणि त्यामध्ये हकनाक बळी जाणारे जीव वाचविणे, हे काम युद्धपातळीवर झाले पाहिजे. राज्यात अनेक शहरे जवळ आणणाऱ्या महामार्गांची कामे सुरू आहेत; त्याच महामार्गांवर सुसाट वेगाने जाणाऱ्या वाहनांचे अपघात आणि त्यातील बळींची संख्या हा चिंतेचा विषय आहे. एकीकडे सुसाट वेगाने वाहने हाकून कमी वेळात पोहोचण्याच्या घोषणा करण्यात येतात, तर दुसरीकडे त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी वेगमर्यादा घातली जाते, हा विरोधाभास दुर्लक्षित करता येत नाही. समृद्धी महामार्गासारख्या रस्त्यांची कामे वेगात सुरू आहेत. मात्र, मुंबई-बेंगळुरू महामार्ग, तसेच मुंबई-गोवा महामार्ग अशा काही महत्त्वाच्या रस्त्यांवरील खड्डे आणि अन्य आवश्यक कामांना होणारा वर्षानुवर्षांचा विलंब यांवर उपाययोजना झाल्या, तरच अपघातांचे सत्र थांबेल.