शालेय जीवनात गुणवत्तेबरोबरच मूल्यसंस्कारात वाढ होणे आवश्यक – प्रा. रवींद्र कोकरे


दैनिक स्थैर्य | दि. १५ जून २०२४ | फलटण |
पैसा, संपत्तीपेक्षा माणूसपण टिकवणे काळाची गरज असून शालेय जीवनात गुणवत्तेबरोबरच मूल्यसंस्कारात वाढ होणे आवश्यक असल्याचे प्राध्यापक रवींद्र कोकरे यांनी सांगितले.

दुधेबावी, ता. फलटण येथील ग्रामविकास प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित संत गाडगेबाबा व्याख्यानमालेत प्रा. रवींद्र कोकरे बोलत होते. अध्यक्षस्थानी पश्चिम महाराष्ट्र पोलीस पाटील संघटनेचे उपाध्यक्ष हनुमंतराव सोनवलकर होते.

प्रा. रवींद्र कोकरे म्हणाले, प्रत्येक पालक विद्यार्थ्याच्या शैक्षणिक गुणवत्तेसाठी खूप प्रयत्न करत असल्याचे निदर्शनास येत आहे. मुलांची गुणवत्ता वाढलीच पाहिजे याबद्दल शंका नाही. गुणवत्तेबरोबर मूल्यसंस्कार तेवढेच गरजेचे आहेत. मुलांना जीवनमूल्यांची रुजवणूक होण्यासाठी पालकांनी प्रयत्न करणं आवश्यक असल्याचे प्रा. कोकरे यांनी स्पष्ट केले.

समजूतदारपणा, वडीलधार्‍यांचा आदर, सकारात्मकता याचा स्वीकार आणि द्वेष, मत्सर, तिरस्कार, राग याचा त्याग करून जीवन जगल्यास निश्चितपणे आनंद मिळेल, असा विश्वास प्राध्यापक रवींद्र कोकरे यांनी व्यक्त केला.

पश्चिम महाराष्ट्र पोलीस पाटील संघटनेचे उपाध्यक्ष हनुमंतराव सोनवलकर म्हणाले, दुधेबावी ग्रामविकास प्रतिष्ठानची संत गाडगेबाबा व्याख्यानमाला निश्चितच जिल्ह्यात आदर्शदायी असून सातत्यपूर्ण २४ वर्षे व्याख्यानमाला चालवणं प्रेरणादायी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

एखादी चांगली गोष्ट सुरू करणं सोपं असतं, तथापि ती टिकवणे यातच खरी कसोटी असल्याचे हनुमंतराव सोनवलकर यांनी निदर्शनास आणले.

रवींद्र कोलवडकर म्हणाले, दुधेबावी ग्रामविकास प्रतिष्ठानची व्याख्यानमाला मी शिक्षण घेत असल्यापासून ऐकत होतो. प्रबोधनाने समाज परिवर्तन निश्चित होत असल्याचा विश्वास कोलवडकर यांनी व्यक्त केला.

स्वागत प्रतिष्ठानचे अध्यक्ष शशिकांत सोनवलकर यांनी केले. प्रास्ताविक व्याख्यानमाला कमिटीचे अध्यक्ष डॉ. सागर कराडे यांनी केले.

सूत्रसंचालन प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष विजयकुमार नाळे व सांस्कृतिक कमिटीचे अध्यक्ष सचिन सोनवलकर यांनी केले. उपस्थितांचे आभार प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष संतोष भांड यांनी मानले.

यावेळी प्रतिष्ठानचे खजिनदार डॉ. युवराज एकळ, भानुदास सोनवलकर, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र चांगण, सामाजिक कार्यकर्ते अण्णासाहेब भुंजे, तात्याबा सोनवलकर, प्राध्यापक नवनाथ लोखंडे, जयवंत तांबे, तानाजी वाघमोडे, देवराम जाधव, वीरकर सर, फलटण तालुका ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष सुभाषराव सोनवलकर, दत्तात्रय काळे, अंकुश शिंदे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!