पाणीपुरवठा योजना सुरळीत चालण्यासाठी पाणीपट्टी भरणे आवश्यक – पालकमंत्री जयंत पाटील


स्थैर्य, सांगली, दि.२३: पाणीपुरवठा योजना सुरळीत चालण्यासाठी वेळेत पाणीपट्टी भरणे आवश्यक आहे. अनाधिकृतपणे सिंचन योजनेच्या कालव्यातून पाणी उपसा करणाऱ्यांवर कारवाई करा, अशा सूचना जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात तासगाव व कवठेमहांकाळ तालुक्यातील प्रादेशिक नळ पाणीपुरवठा व उपसा सिंचन योजनांच्या कामाचा आढावा पालकमंत्री जयंत पाटील यांनी घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार सुमनताई पाटील, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, सांगली पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता मिलिंद नाईक, कार्यकारी अभियंता सर्वश्री सूर्यकांत नलवडे, सचिन पवार, अभिनंदन हरुगडे, श्रीमती ज्योती देवकर तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, उपसा सिंचन योजनेची कामे दर्जेदार करावीत. पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी पावसाळ्यातच पुराच्या पाण्याने तलाव, विहिरी भरून घेण्यासाठी व्यवस्था करावी. पिण्याचा पाण्याचा कायमस्वरूपी प्रश्न मिटण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगून ते म्हणाले, काही जास्त लोकसंख्या असलेली गावे पिण्याच्या पाण्याची स्वतंत्र योजना करून प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनेतून बाहेर पडली आहेत. त्यामुळे प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना बंद आहेत. इतर लहान गावांना पिण्याच्या पाण्यासाठी स्वतंत्र योजना राबविण्याकरिता शासनाच्या योजनांचा लाभ मिळण्यासाठी प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेतून नाव वगळल्याचा दाखला मिळण्यासाठी शासनस्तरावर सादर केलेल्या प्रस्तावांबाबत चर्चा करून प्रश्न सोडवू, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. यावेळी त्यांनी ताकारी, टेंभू, म्हैसाळ उपसा सिंचन योजनांचा सविस्तर आढावा घेतला.


Back to top button
Don`t copy text!