भारत-चीन वादावर चर्चेने कितपत तोडगा निघेल, सांगणं कठीण : राजनाथ सिंह


स्थैर्य, लेह, दि. 17 : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह शुक्रवारीआपल्या दोन दिवसांच्या लेह दौर्‍यावर आले आहेत. यावेळी त्यांनी चीन आणि भारत सीमा वादावर बोलताना ‘दोन्ही देशांदरम्यान वाद मिटवण्यासंबंधी चर्चा सुरू आहे. परंतु, चर्चेने कितपत प्रश्‍न मार्गी लागेल, हे आत्ताच सांगता येणे कठीण आहे, असे सांगितले. चिनी सैन्याची भारतीय सैनिकांसोबत झालेल्या हिंसक झडपेनंतर पहिल्यांदाच संरक्षण मंत्री या भागाच्या दौर्‍यावर आले आहेत.

भारतीय जवानांसोबत बोलताना संरक्षण मंत्री म्हणाले, ‘आत्तापर्यंत जी चर्चा झालीय, प्रकरण मार्गी निघायला हवं… परंतु, चर्चेने हा वाद कितपत मिटू शकेल, याची हमी आत्ताच देता येणे कठीण आहे. पण, आपल्या जमिनीचा एक इंच भागही जगातील कोणतीही शक्ती घेऊ शकणार नाही, याचा विश्‍वास मी तुम्हाला देऊ इच्छितो,’ असे म्हणत त्यांनी सैन्याला आपला पाठिंबा व्यक्त केला.

शुक्रवारी सकाळीच एका विशेष विमानाने राजनाथ सिंह दिल्लीहून सर्वात अगोदर स्ताकनाच्या एका बेसवर दाखल झाले. तेथे ते भारतीय सेनेच्या एका खास कार्यक्रमात सहभागी झाले होते. या दौर्‍यात त्यांच्यासोबत भारतीय सेनेचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते. यावेळी सेनेच्या उत्तरी कमांडचे अनेक ज्येष्ठ अधिकारी, संरक्षणप्रमुख जनरल बिपिन रावत आणि सैन्यप्रमुख मनोज मुकुंद नरवणे हेदेखील त्यांच्यासोबत उपस्थित होते. स्ताकनामध्ये भारतीय सेनेच्या खास कार्यक्रमात भारतीय जवानांनी पॅरा ड्रॉपिंग आणि इतर पराक्रमी शक्तीचे प्रदर्शन केले. स्ताकनामध्ये आयोजित या कार्यक्रमादरम्यान सेनेच्या जवानांनी आकाशातून पॅरा ड्रॉपिंग करून शक्तिप्रदर्शनही केले. यासाठी संरक्षणमंत्री आणि अधिकार्‍यांनी जवानांचे कौतुक केले. लेहच्या दुर्गम भागात जिथे श्‍वास घेणेही कठीण होऊन बसते तिथे जवानांनी करून दाखवलेले कर्तब वाटते तितके सोपे नाहीत. राजनाथ सिंह यांनी सेनेच्या या जवानांच्या मेहनतीला आणि अदम्य साहसाला सलाम केला. या दरम्यान सेनेचे ’टी-90 टँक’ आणि ‘बीएमपी इन्फन्ट्री कॉम्बॅट व्हेईकल’ही आपली शक्ती दाखवताना दिसले.

या दरम्यान सेनेच्या अधिकार्‍यांसोबत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हेदेखील रायफलने निशाणा लावताना दिसले. या दरम्यान सेनेच्या ‘पीका मशीन गन’ या शस्त्राविषयी संरक्षणमंत्र्यांनी अधिक माहिती जाणून घेतली.

आपल्या दोन दिवसांच्या दौर्‍यात राजनाथ सिंह लडाखमध्ये फॉरवर्ड लोकेशन्सचाही आढावा घेणार आहेत. शनिवारी ते श्रीनगरला जाणार आहेत. उल्लेखनीय म्हणजे, या अगोदर 2 जुलै रोजी संरक्षण मंत्री लडाखचा दौरा करणार होते. परंतु, त्यांचा हा दौरा रद्द झाला आणि 3 जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानक या ठिकाणी भेट देत सर्वांनाच आश्‍चर्याचा धक्का दिला.

पँगाँग सरोवराजवळ भारतीय लष्कराचा जोरदार युद्धसराव

चिनी घुसखोरीनंतर कळीचा मुद्दा बनलेल्या पँगाँग सरोवर परिसरातून माघार घेण्यास चिनी सैन्य चालढकल करत आहे. याच पँगाँग सरोवराजवळ असलेल्या स्टकना येथे आज भारतीय लष्कराने जोरदार युद्धसराव केला. या युद्धसरावामध्ये पॅरा कमांडोज सहभागी झाले होते. लडाखमधील चीनच्या घुसखोरीच्या प्रयत्नांची वार्ता समोर आल्यानंतर भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये सर्वप्रथम पँगाँग सरोवर परिसरातच झटापट झाली होती. दरम्यान, आज भारतीय जवानांनी त्याच ठिकाणाजवळ शक्तिप्रदर्शन केले.

दरम्यान, 13 हजार 800 फूट उंचीवर आज पॅरा कमांडो सराव करत आहेत तर हवाई दलाची हॅलिकॉप्टर पँगाँग सरोवराजवळ घिरट्या घालत आहेत. लष्कर आणि हवाई दलामध्ये योग्य ताळमेळ राखण्यासाठी हा युद्धसराव महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या माध्यमातून भारत हा चीनच्या प्रत्येक चालीला उत्तर देण्यासाठी सज्ज असल्याचा संदेश या युद्धसरावामधून देण्यात येत आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!