“श्रीराम”मध्ये भ्रष्टाचार आहे का ? हे आता प्रांतांना विचारावे; डॉ. बाळासाहेब शेंडे यांचा उपरोधिक टोला

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । 30 मार्च 2025। फलटण । श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या कारभार गत ७ दिवस प्रशासक म्हणून प्रांताधिकारी सौ. प्रियांका आंबेकर यांनी बघितलेला आहे. यामध्ये श्रीराम कारखान्यात भ्रष्टाचार केल्याचा आरोप जे आमच्यावर करत असतात, त्यांनी आता प्रांतांना विचारावे की, कारखान्यात भ्रष्टाचार आहे का ? असा उपरोधिक टोला श्रीराम कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे यांनी लगावला.

मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार श्रीराम कारखान्यावरून प्रशासकाला काढून कार्यभार हा संचालक मंडळाकडे देण्यात आला आहे. यामध्ये कारखान्याचा ताबा प्रशासकाकडून संचालक मंडळाकडे सुपूर्त करण्यात आला. पुन्हा कार्यभार स्वीकारल्यानंतर चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे बोलत होते. यावेळी व्हाईस चेअरमन नितीन शाहूराज भोसले यांच्यासह विविध संचालक उपस्थित होते.

यावेळी बोलताना चेअरमन डॉ. शेंडे म्हणाले की, आमचे विरोधक कायमच कारखान्यांमध्ये भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप आमच्यावर करत असतात. परंतु कारखान्यावर प्रशासकाचे नियुक्ती झाल्यानंतर प्रशासक यांनी कारखान्याचे सर्व बँक खाते सुद्धा सील केलेले होते. त्यानंतर सर्व खात्यांची स्टेटमेंट ही प्रशासक म्हणून प्रांताधिकारी यांनी तपासले आहे. त्यामुळे याबाबत प्रांतांना सर्व गोष्टी ज्ञात झालेल्या आहेत, जे विरोधक आमच्यावर कायम आरोप करत असतात, कि त्यांनी भ्रष्टाचार केला आहे का नाही ? हे प्रांताधिकारी यांना विचारावे.

मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश निर्गमित झाल्यानंतर प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांनी प्रशासक यांना आदेश दिले की तात्काळ कारखाना संचालक मंडळाच्या ताब्यात द्यावा, याबाबत आम्ही प्रशासक व शासकीय अधिकारी यांच्याशी फोनवरून संवाद साधल्यानंतर त्यांनी काल दि. २९ रोजी सायंकाळची वेळ दिलेली होती. त्या ठिकाणी आम्ही दीड ते दोन तास थांबून सुद्धा प्रशासक आले नाहीत व अचानक पणे आजच्या ऐवजी उद्या ताबा देतो असे स्पष्ट केले. यामध्ये नक्की तात्काळ ताबा द्यायला प्रशासक यांनी विलंब का लावला, हे समजू शकले नाही. त्यांनी जे अचानकपणे आजारी असल्याचे कारण सांगितले त्यामुळे आम्ही सुद्धा यामध्ये हरकत घेतली नाही.

संचालक मंडळाचा सत्कार प्रांताधिकारी यांनी नाकारला

श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या वतीने प्रांताधिकारी सौ. प्रियांका आंबेकर यांचा कारखान्याचे सील काढल्यानंतर सत्काराचे प्रयोजन करण्यात आलेले होते. याबाबत कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे यांनी प्रांताधिकारी यांना विनंती केली, परंतु सत्कारास नकार देत प्रांताधिकार्‍यांनी कारखाना कार्यालयाच्या येथून काढता पाय घेतला.

कारखाना निवडणुकीचा निर्णय उच्च न्यायालयात

श्रीराम सहकारी साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया रखडली असून याबाबत उच्च न्यायालयामध्ये विविध याचिका दाखल करण्यात आलेल्या आहेत. या सर्व याचिका एकत्रित करत उच्च न्यायालयाने सुनावणी घेतलेली आहे. पहिल्या झालेल्या सुनावणी मध्ये प्रशासकाची नियुक्ती रद्द करण्याचे आदेश देत पुढील होणाऱ्या सुनावणीमध्ये कारखाना निवडणुकीच्या बाबत उच्च न्यायालय जे निर्णय देतील त्या नुसार निवडणूक प्रक्रिया संपन्न होईल.


Back to top button
Don`t copy text!