यंदा आषाढी वारीसाठी पोषक वातावरण आहे का ?; पालखी मार्गावरील गावांना आळंदी संस्थानचे पत्र

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, अकलूज, दि. २६ (सूर्यकांत भिसे) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गतवर्षीपासून बंद असलेल्या आषाढी वारीला यंदा पोषक वातावरण आहे का ? गावात कोरोनाची परिस्थिती कशी आहे याबाबत श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे वतीने पालखी मार्गावरील गावांना पत्रव्यवहार करण्यात आला असून या गावांनी येत्या चार पाच दिवसात त्याचे उत्तर आळंदी संस्थानला द्यावे असे पत्र श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे अध्यक्ष डॉ. अभय टिळक यांच्या सहीने पालखी मार्गावरील गावांचे सरपंच व नगरपालिकांचे नगराध्यक्ष यांना पाठविण्यात आलेले आहे.

डॉ अभय टिळक यांनी बोलताना सांगितले की, आषाढी वारीपुर्वी चैत्री वारीच्या निमित्ताने पालखी मार्गावरील गावांचा पाहणी दौरा व्हायचा. या दौऱ्यात मुक्कामाची ठिकाणे, रस्त्याची परिस्थिती, आरोग्य, पाणी पुरवठा, विज आदींचा आढावा घेतला जात असे. तसेच चैत्र शुध्द दशमीला पंढरपूर येथे आळंदी संस्थान, मानकरी, दिंडी समाज व फडकरी यांची बैठक होत असे व या बैठकीत वारीच्या वाटचाली बाबत विचार विनीमय व्हायचा. तिथीची वृध्दी किंवा क्षय झाला तर मुक्कामाची ठिकाणे, वाढीव मुक्काम यावर चर्चा व्हायची. परंतु गेल्यावर्षी कोरोनाच्या महामारीमुळे आषाढी पायी वारी झाली नाही. मागील वर्षी पंढरपूर येथील आषाढीवारी साठी सर्व संतांच्या पालख्या राज्य शासनाने विशेष बसने पंढरपूरला आणल्या होत्या आणि आषाढी वारी साजरी झालेली होती. त्यावेळी कोरोनाची शहरात भयावह स्थिती होती. राज्यातील शहरात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून यायचे. आता गेल्या वर्षभरातील कोरोनाची स्थिती पाहिली तर कोरोना आता शहरात कमी आणि ग्रामीणमध्ये अधिक वाढू लागला आहे. त्यामुळे यंदा पायी वारी करायची की गतवर्षी प्रमाणे यंदाही सर्व संतांच्या पालख्या विशेष बस द्वारे थेट पंढरपुरला न्यायच्या या बाबत अद्याप निर्णय झालेला नाही. प्रत्येक गावची कोरोना परिस्थिती जाणून घेण्यासाठीच हा पत्रव्यवहार केल्याचे टिळक म्हणाले.

पालखी सोहळ्याच्या वेळापत्रकानुसार यंदा २ जुलै रोजी श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचे श्री क्षेत्र पंढरीच्या दिशेने प्रस्थान होईल. तथापि कोरोना संदर्भात सध्या चालू असलेले लसीकरण, कोरोना बाबत समाजामध्ये झालेली जागृती, प्रतिबंधात्मक उपाय योजना संदर्भात दिली जाणारी माहिती या नुसार सदर परिस्थितीचा विचार करता यंदाच्या पालखी सोहळ्या संदर्भात गावचे प़तिनिधी या नात्याने आपली भूमिका जाणून घेणे संस्थान कमिटीस अगत्याचे वाटत असल्याने हे पत्र आपणास लिहित असल्याचे आळंदी संस्थानने पत्रात म्हटले आहे. आषाढी पायी वारी दरम्यान श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचा आपल्या गावात मुक्काम असतो. आपण व समस्त ग्रामस्थ यांचा भक्तिभाव व उदंड सहकार्य यामुळे सर्व प्रकारच्या सोयीसुविधा उत्तमपणे सोहळ्यास उपलब्ध होतात. त्या बद्दल आम्ही आपले सदैव ऋणी आहोत. कोरोनाच्या फैलावा संदर्भातील सध्याची परिस्थिती व सोहळयाचा मुक्काम आपल्या गावी असेल त्यावेळेची व संभाव्य परिस्थिती याचा साधक – बाधक विचार करता आषाढी वारीचे स्वरूप यंदा कसे असावे. या संदर्भात आपले मत व भूमिका आपण संस्थान कमिटीस कृपया तात्काळ कळवावे. ही विनंती करण्यासाठी हे पत्र आपणास लिहित आहोत. या संदर्भात पुढील मुद्द्याबाबत आपण आपले मत लेखी कळवावे असे पत्रात नमूद केले आहे.

त्यामध्ये कोरोनाच्या प्रादुर्भावा संदर्भात आपल्या कार्यक्षेत्रातील आजची परिस्थिती नेमकी काय आहे ?, यंदाचा आषाढी सोहळा पायी वारीच्या स्वरूपात असावा का ?, सोहळया मधील वारकरी भाविकांची संख्या किती असावी ?, किती संख्ये पर्यंत वारकरी आपल्या गावाच्या कार्यक्षेत्रात येणे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपणास योग्य व सुरक्षित वाटते ?, मुक्कामाच्या तळावर आपण कोण कोणत्या सुविधा उपलब्ध करून देऊ शकता ? यासंदर्भातील मत व भूमिका आपण आपल्या सहकाऱ्यांबरोबर आवश्यकती चर्चा करून येत्या चार ते पाच दिवसात संस्थान कमिटीस पत्राद्वारे कळविल्यास त्यानुसार संस्थांनला सर्व संबंधितांशी चर्चा विचारविनिमय करून योग्य तो निर्णय घेणे, तसेच या संदर्भातील शासन संस्थेची संवाद साधणे शक्य होईल. तरी लवकरात लवकर पत्राचे उत्तर द्यावे असे श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या वतीने कळविण्यात आले आहे. पालखी मार्गावरील गावे, नगरपालिका, महानगरपालिका यांच्याकडून माहिती आल्यानंतरच आषाढी वारीबाबत निर्णय घेतला जाईल असे डॉ. टिळक म्हणाले.


Back to top button
Don`t copy text!