स्थैर्य, दि. 20 : सध्या करोना च्या महामारीमध्ये देशभर विखुरलेल्या प्रत्येक व्यक्तीला आपल्या घरट्याची ओढ लागली आहे. अश्यातच खासकरून सातारा, सांगली व पुणे जिल्ह्यातील गलाई बांधवांसाठी अमृतसर पंजाबचे मराठमोळे आयपीएस अधिकारी केतन पाटील यांनी मोलाची मदत केली आहे.
विमान, ट्रेनसेवा व रस्ते वाहतुक लॉकडाऊनच्या काळात पूर्णपणे बंद आहेत. अश्यातच प्रत्येकाला आपल्या मायभूमीची ओढ लागली आहे. देशभर विखुरलेला गलाई बांधव हा मिळेल त्या प्रकारे आपल्या गावी येत आहे. सध्या सरकारी यंत्रणा पुर्ण पणे हतबल आहेत. अश्या परिस्थितीमध्ये काही प्रायव्हेट टॅक्सी व बसेस तब्बल लाखाच्या रक्कमा घेऊन लोकांना बाहेर राज्यातून घेऊन येत आहेत. अशातच पंजाबच्या गलाई बांधवाना देवदुत म्हणून भेटले ते आपले मराठमोळे आयपीएस अधिकारी केतन पाटील.
अमृतसरचे यशस्वी गलाई बांधव संदीप पाटील, राजु यादव, सुरज पाटील यांच्या सततच्या पाठपुराव्याला मान्यता देत आयपीएस डॉ. केतन पाटील यांनी थेट रेल्वे खात्यात साकडे घातले. आपल्या मराठी बांधवांसाठी अमृतसर ते सांगली अशी स्पेशल ट्रेनला मंजुरी मिळवुन दिली. आज डबघाईला आलेला हा गलाई व्यवसाय त्यात ही करोना महामारी यात लाखाची भाडी देऊन प्रत्येकाला गावी येण शक्य नव्हते. अशा प्रत्येक गलाई बांधवांसाठी देवदुत बनुन आलेल्या केतन पाटील सरांचे मराठा स्वर्णकार संघ पंजाब यांनी त्यांचे आभार मानले. ही ट्रेन दि.19 रोजी दुपारी 2.00 ला अमृतसर मधुन निघणार आहे. ट्रेन नॉनस्टॉप अमृतसर ते सांगली असणार आहे. सुमारे 1200 मराठी बांधवाना या ट्रेनचा लाभ होणार आहे. ही ट्रेन महाराष्ट्रात अहमदनगर, पुणे, सातारा व सांगली या स्टेशन वर थांबणार आहे. या ट्रेन मध्ये पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद, बुलढाणा या जिल्ह्यातील मराठी बांधव महाराष्ट्रात परत येत आहे. विशेषता सांगली, सातारा, कोल्हापूर भागातील गलाई व्यवसायिक कामगार आपल्या घरी सुखरूप पोहचु शकतील. सांगली जिल्ह्यातील 500 ते 600 सातारा जिल्ह्यातील 200, पुणे जिल्ह्यातील 250 ते 300 मराठी बांधव आपल्या घरी सुखरूप पोहचतील, असे त्यांनी सांगितले.