सासकल ग्रामपंचायतीमधील आर्थिक व्यवहाराची त्रयस्थ यंत्रणेमार्फत चौकशी करा; दोषींवर कारवाई न झाल्यास १५ ग्रामस्थांचा आमरण उपोषणाचा इशारा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. ०८ ऑगस्ट २०२२ । फलटण । मोजे सासकल ता.फलटण येथील सासकल ग्रामपंचायत च्या वतीने तत्कालीन सरपंच व ग्रामसेवक यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची प्रकरणे याबाबत चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी सासकल ग्रामस्थांनी मा.जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, गट विकास अधिकारी, तहसीलदार फलटण व उपविभागीय अधिकारी फलटण यांच्याकडे उपोषण करण्याची परवानगी मागितली असून कारवाई न झाल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.

गेली दीड वर्षे सासकल जन आंदोलन समिती व ग्रामस्थांच्या वतीने दोषींवर कारवाई करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.येत्या १५ ऑगस्ट ला बरोबर १ वर्ष होईल.गेल्या १५ ऑगस्ट २०२१ ला सासकल जन आंदोलन समितीच्या वतीने आत्मदहनाचा व उपोषणाचा इशारा देण्यात आला होता. तेव्हा प्रशासनाने कारवाई करतो असे सांगून प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला होता.पोलीस प्रशासन व गट विकास अधिकारी यांनी कारवाईचे लेखी आश्वासन दिले. लोकांचा रोष लक्षात घेऊन गटविकास अधिकारी अमिता गावडे यांनी तत्कालीन ग्रामसेवक अंगराज खाशाबा जाधव यांची एक वर्षासाठी वेतन वाढ रोखण्याचे आदेश देण्यात आले होते. परंतु कोणत्याही स्वरूपाची ठोस कारवाई केली नव्हती.

या प्रकरणानंतर सासकल ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सन २०१५ ते सन २०२२ कालावधीत करण्यात आलेल्या कामाची चौकशी केली असता प्रचंड भ्रष्टाचार झाल्याचे माहिती अधिकारात प्राप्त कागदपत्रावरून स्पष्ट झाले आहे. यासंबंधी विनायक नारायण मदने व इतर ३५ ग्रामस्थांनी मा. जिल्हाधिकारी यांचेकडे दि.३/६/२०२२ रोजीचा मान. जिल्हाधिकारी यांना प्राप्त अर्ज तारीख ६/६/२०२२ रोजी तक्रार करण्यात आली. यावर मान उप जिल्हाधिकारी (महसूल) यांनी क्र.मह/३/अभि/का/१५४७/२०२२ दि.६/६/२०२२ रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सातारा यांच्याकडे पुढील कार्यवाहीसाठी प्रकरण पाठवण्यात आले होते. सदर पत्रामध्ये अर्जदार यांचे संदर्भीय अर्जातील मागणीचे अनुषंगाने नियमानुसार उचित कारवाई करावी व केलेल्या कारवाईबाबत अर्जदार यांना आपल्या कार्यालयाचे स्तरावरून परस्पर अवगत करण्यात यावे अशी आदेश देण्यात आले होते. त्यानंतर १ महिन्याहून अधिक काळ उलटला तरी कोणतीही कारवाई केल्याचे दिसून येत नाही.

याच संबंधात मान. उप आयुक्त (आस्थापना) पुणे विभाग पुणे यांच्याकडे २७/०६/२०२२ रोजी तक्रार करण्यात आली होती. त्यांनी ही मान.जिल्हाधिकारी यांना दिनांक २८/६/२०२२ रोजी क्र.विकास/आस्था/ग्रा.पं.-२/कावि-४५०/२०२२ दि.२८/६/२०२२ रोजी पत्र देण्यात आले.या आदेशात मान.जिल्हाधिकारी यांना सांगण्यात आले आहे की सदर अर्जात नमूद विषयाबाबत सविस्तर चौकशी करून नियमानुसार तात्काळ उचित कारवाई करावी व केलेल्या कारवाईबाबत संबंधित अर्जदार यांना परस्पर कळवण्यात यावे. यावरही १ महिन्याहून अधिक काळ उलटला तरी कोणतेही कारवाई झाली नसल्याचे लक्षात येत आहे.

त्यामुळे येत्या १५ ऑगस्ट २०२२ ला तहसीलदार कार्यालय, पंचायत समिती फलटण कार्यालय, ग्रामपंचायत सासकल येथे आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे..सदर अर्जामध्ये देण्यात आलेले पुरावे स्पष्ट व वास्तवता दर्शवणारे असताना जाणीवपूर्वक प्रशासन चौकशी कामे दिरंगाई करत आहे.सबळ पुरावे तक्रारदारांकडे असल्यामुळे तत्कालीन सरपंच विभूती मोहन मुळीक, लता विकास मुळीक व ग्रामसेवक अंगराज खशाबा जाधव यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी सदर अर्जात करण्यात आली आहे.तक्रारीतील मुद्द्यांच्या स्पष्टीकरण देण्यासाठी माहिती अधिकारात दिलेली कागदपत्रे चौकशी वेळी सादर करू असे तक्रारदारांनी अर्जात म्हटले आहे.सदर कागदपत्रे ही सासकल ग्रामपंचायतीने माहिती अधिकारात दिलेली आहेत. तरी संबंधितांवर कडक कारवाई करावी अन्यथा १५ ऑगस्ट २०२२ रोजी सनदशीर मार्गाने उपोषण करण्यात येईल असा इशारा अर्जात देण्यात आला आहे..


Back to top button
Don`t copy text!