दैनिक स्थैर्य | दि. २३ जून २०२३ | फलटण |
गुणवरे, ता. फलटण येथील ब्लूम इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज या विद्यालयात आंतरराष्ट्रीय योगा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री. ईश्वर गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचार्य श्री. गिरीधर गावडे यांनी विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व सांगितले. दररोज योगासने, प्राणायाम केल्याने शरीराला कोणते फायदे होतात, याचे स्पष्टीकरण केले.
यावेळी प्रार्थना योगासने व प्राणायाम सादर केली. क्रीडा प्रशिक्षक तेजस फाळके, रमेश सस्ते, वर्षा दोशी या शिक्षकांनी योगाची प्रात्यक्षिके करून दाखवली. यामध्ये विद्यार्थ्यांनी पूरक हालचाली, ताडासन, वृक्षासन, त्रिकोणासन, वज्रासन, चक्रासन, उष्ट्रासन, सर्वांगासन, हलासन, सूर्यनमस्कार, इत्यादी योगासने केली. तसेच कपालभाती, अनुलोम-विलोम प्राणायाम केले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाच्या शेवटी रमेश सस्ते यांनी आभार मानले.