
स्थैर्य, 19 जानेवारी, सातारा : पुढील दोन दिवसांत सातारा नगरपालिकेत उपनगराध्यक्षांची निवड करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर अनुभवी नगरसेवक मनोज शेंडे यांचे नाव आघाडीवर असून ड. दत्तात्रय बनकर आणि निशांत पाटील यांनीही शड्डू ठोकला आहे.या तिघांमध्ये उपनगराध्यक्ष पदासाठी जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे.बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांनी दोन दिवसापूर्वीच पत्रकारांशी बोलताना उपनगराध्यक्ष पदासाठी खासदार उदयनराजे जे नाव सुचवतील तोच नगरसेवक उपनगराध्यक्ष पदावर बसेल असे सांगितले होते. त्यामुळे खासदार उदयनराजे यांची मर्जी कोणावर बसणार याकडे सातारकरांचे लक्ष लागून राहिले आहे.
सातारा नगरपालिकेत अमोल मोहिते नगराध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर सातारकरांमध्ये आता उपनगराध्यक्षपदावर कोण विराजमान यामध्ये चर्चा सुरू झाल्या आहेत.येत्या दोनच दिवसात उपनगराध्यक्ष पदाची निवड होणार आहे. प्रथमच लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांच्या विचारांचे अमोल मोहिते हे भाजपचा चिन्हावर निवडून आले आहेत. अमोल मोहिते हे नवखे नाहीत ते सलग तीन वेळा नगरसेवक म्हणून सातारा नगरपालिकेत कार्यरत होते. त्यांच्याकडे प्रशासकीय यंत्रणेचा दांडगा अनुभव आहे. सातारा नगरपालिकेत खासदार उदयनराजे यांच्या विचारांचा नगरसेवक उपनगराध्यक्ष पदावर बसणार असल्याने नगरसेवक मनोज शेंडे,ड. दत्तात्रय बनकर आणि माजी नगराध्यक्ष निशांत पाटील यांचे नाव चर्चेत आहे. या तिघांपैकी उपनगराध्यक्षपदावर मनोज शेंडे यांच्या नावावर शिक्का मोर्तब होण्याची शक्यता आहे. मनोज शेंडे यांनी 2016 ते 2026 अशी दहा वर्ष खा.उदयनराजे यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा नगरपालिका त्यांनी चालवली. उपनगराध्यक्ष पदावर असताना त्यांनी सातार्यात अनेक लोकोपयोगी कामे मार्गी लावली.
नगराध्यक्ष अमोल मोहिते यांच्याकडे जसा प्रशासनाचा अनुभव आहे तसाच अनुभव मनोज शेंडे यांच्याकडेही असून गेले दहा वर्ष ते नगरपालिकेत कार्यरत असल्यामुळे प्रशासनावर त्यांची चांगली पकड आहे. त्यामुळे सातारा विकास आघाडीला ताकद देण्यासाठी मनोज शेंडे यांची गरज आहे.त्याचबरोबर ड.दत्तात्रय बनकर ही अनुभवी नगरसेवक आहेत.त्यांनी सातार्याचे उपनगराध्यक्षपद भोगले आहे. त्यांच्याकडेही प्रशासनाचा चांगला अनुभव आहे. सातारा विकास आघाडीचे कायदेशीर सल्लागार म्हणून ते कार्यरत आहेत. आतापर्यंत खासदार उदयनराजे यांच्या राजकीय भूमिकेत बनकर यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे.त्यामुळे उदयनराजे यांची मर्जी कोणावर बसणार यावर सातारकरांचे लक्ष लागून राहिले आहे.
निशांत पाटील वरच्या वर्गातून खालच्या वर्गात.. विद्यार्थी जसा नववीतून दहावीत जातो दहावीतून अकरावीत जातो. निशांत पाटील यांचा प्रवास उलटा चालला आहे. नगराधक्ष्यातून नगरसेवक आणि पुन्हा आता नगराध्यक्षातून उपनगराध्यक्ष असा प्रवास सुरू असल्याने निशांत पाटील वरच्या वर्गातून खालच्या वर्गात येण्याच्या तयारीत असल्याने सातारकरांमध्ये उपनगराध्यक्ष पदासाठी त्यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे.
