दैनिक स्थैर्य । दि. १५ जून २०२२ । सातारा । भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देहू येथील शिळा मंदीर लोकार्पण सोहळ्यात जगद्गुरू तुकोबारायांचा अनेक राजकीय प्रस्तावनानंतर ओझरता उल्लेख करून त्यांचा अपमान केला आहे. याशिवाय देहूचे धार्मिक आणि सुधारणावादी व्यासपीठ त्यांनी भाजपच्या प्रचारासाठी वापरले आहे हे वारकरी संप्रदाय यासाठी अपमानकारक आहे, अशी सणसणीत टीका विठोबा रखुमाई मुक्ती आंदोलनाचे निमंत्रित आणि धरणग्रस्तांचे नेते डॉक्टर भारत पाटणकर यांनी साताऱ्यात पत्रकार परिषदेत केली.
ते पुढे म्हणाले, जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचे देहू येथील शिळा मंदिर पुरोगामी विचारांचा आणि जाती धर्माच्या पलीकडे जाणाऱ्या समतेच्या विचारांचा वारसा सांगणारे केंद्र आहे. तुकोबाराय कधीच जातिभेद मानत नव्हते. यातायाती धर्म नाही असा स्पष्ट उल्लेख यांच्या अभंगांमध्ये आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या प्रस्तावनेत सुरुवातीला ज्ञानेश्वर माऊलींचा उल्लेख केला. त्यानंतर अनेक राजकीय मान्यवरांचा उल्लेख करून त्यानंतर सर्वात शेवटी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा ओझरता उल्लेख केला. ही गोष्ट महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदाय यासाठी आणि परंपरेसाठी अत्यंत अपमानजनक आहे. हा अपमान महाराष्ट्राची जनता कधीही सहन करणार नाही. विठोबा-रखुमाई मुक्ती आंदोलनाचा निमंत्रक म्हणून या प्रकरणाचा मी निषेध करत आहे. विठोबा रखुमाई मुक्ती आंदोलनाच्या वतीने देहू येथे लवकरच वारकरी आणि कीर्तनकार यांची परिषद होणार असून या परिषदेमध्ये हा निषेधाचा ठराव ठेवला जाणार आहे. या निषेधाची थेट माहिती पत्राद्वारे राष्ट्रपती यांना कळवली जाईल. या पत्राला जर अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही तर व्यापक आंदोलन उभा करण्याचा इशारा डॉक्टर भारत पाटणकर यांनी दिला.
संत तुकाराम महाराजांनी समतेवर आणि धर्माच्या पलीकडे जाऊन विविध अभंगाच्या द्वारे प्रबोधन केले आहे. मात्र, पंतप्रधानांनी तुकोबारायांच्या शेती पर्यावरण या विषयांचे अभंग सोडून इतर अभंगांचा उल्लेख केला. तुकोबारायांच्या शिष्या बहिणाबाई यांचे सुद्धा नाव घेतले नाही. तसेच देहू येथील धार्मिक कार्यक्रमाचे व्यासपीठ आपण भाजपच्या प्रचारासाठी वापरले आहे. हा तुकोबारायांच्या पावित्र्याचा व देहूच्या सडेतोडपणाचा अपमान आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना सुद्धा व्यासपीठावर असून भाषणाची संधी देण्यात आली नाही. त्यामुळे हा सुद्धा महाराष्ट्राचा राजकीय अपमान आहे. तो अजिबात खपवून घेतला जाणार नाही या सर्व बाबींची गंभीर दखल विठोबा रखुमाई मुक्ती आंदोलनाने घेतली असून अपेक्षित कालावधीत आंदोलनाद्वारे याचे योग्य उत्तर दिले जाईल असा इशारा डॉक्टर भारत पाटणकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.