दैनिक स्थैर्य । दि. ०२ ऑगस्ट २०२२ । फलटण । थोर विभूतीच्या चरित्रातून प्रेरणा व जगण्याची दिशा मिळते. लोकमान्य टिळक व अण्णा भाऊ साठे ही स्वतंत्र विचारांची व अस्तित्वाची व्यासपीठ होती. आपल्या विचारांनी त्यांनी समाज जागृती करून नवा भारत उभा करण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेतले. दोघांचे विचार बंडखोर होते त्यातून मार्ग काढून समाज सुधारणा केली. टिळक व अण्णा भाऊ साठे यांनी भारतीयांचे विचार स्वातंत्र्य प्राप्तीसाठी कसे पोषक होतील असे विचार दिले त्यामुळे त्यांचे विचार अजरामर राहतील त्यांचे विचार प्रेरणादायी आहेत असे मत साहित्यिक ताराचंद्र आवळे यांनी स्पष्ट केले.
रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल रुई तालुका कोरेगाव येथे लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात साहित्यिक व ज्येष्ठ शिक्षक ताराचंद्र आवळे यांनी विचार मांडले. यावेळी व्यासपीठावर मुख्याध्यापक हितेंद्र घाडगे, पुरुषोत्तम धापड,महेश नजन,स्वाती भिलारे उपस्थित होते.
ताराचंद्र आवळे पुढे म्हणाले की, भारताला स्वातंत्र्य मिळून देण्यामागे लोकमान्य टिळक व अण्णा भाऊ साठे यांनी आपली लेखणी झिजवली, आपले विचार सडेतोड मांडले चुकीच्या विचारांचे समर्थन न करता त्यावर प्रहार केला व समाज जागृती केली.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक हर्षल लवंगे यांनी केले. आभार सौ. दीपाली करपे यांनी तर सूत्रसंचालन कु. श्रावणी अनभुले हिने केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भरत वाघ, श्री ठोंबरे, कु.भोसले यांनी परिश्रम घेतले.