
प्रा. विकास शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या सामाजिक, साहित्यिक आणि पत्रकारितेतील प्रवासाचा आढावा घेणारा विशेष लेख. सातारा जिल्ह्यातील एक निर्भीड पत्रकार आणि समाजाभिमुख साहित्यिक म्हणून त्यांची ओळख आहे.
स्थैर्य, फलटण, दि. १४ मार्च : प्रा. विकास शिंदे यांची जडणघडण मुळात सामाजिक कार्य करणारे ज्येष्ठ साहित्यिक सुरेश शिंदे आणि ‘साखरशाळा’ प्रकल्पाच्या जन्मदात्या लेखिका सुलेखा शिंदे यांच्या संस्कारात झाली आहे. लहानपणापासूनच त्यांनी चळवळी, संघर्ष आणि आंदोलने जवळून पाहिली आहेत. याच संस्कारांमधून अन्यायाविरुद्ध बंड करून लढणारा एक समाजाभिमुख आणि निर्भीड पत्रकार म्हणून प्रा. विकास शिंदे यांची ओळख संपूर्ण सातारा जिल्ह्यात निर्माण झाली आहे. आज त्यांचा वाढदिवस असून, त्यानिमित्ताने त्यांच्या या प्रेरणादायी प्रवासावर टाकलेला हा एक विशेष दृष्टिक्षेप.
प्रा. विकास शिंदे यांचे संपूर्ण शिक्षण फलटणमध्येच पार पडले. यशवंतराव चव्हाण हायस्कूलमधून माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी मराठी विषयातून पदवी आणि पदव्युत्तर (एम.ए.) शिक्षण घेतले. त्यानंतर शिक्षणशास्त्र विषयातून बी.एड. व एम.एड. पूर्ण केले. पत्रकारितेची आवड त्यांना लहानपणापासूनच होती. अगदी चौथी-पाचवीत असताना त्यांनी ‘दैनिक शिवसंदेश’साठी लेखन केले होते. त्यावेळी कॉम्रेड हरिभाऊ निंबाळकर यांनी त्यांच्या पाठीवर केवळ कौतुकाची थापच दिली नाही, तर शिवसंदेशच्या माध्यमातून त्यांना एक हक्काचे व्यासपीठही उपलब्ध करून दिले होते. प्रा. विकास शिंदे यांनी सणबूर (ता. पाटण) येथील महात्मा गांधी उच्च माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्ये काही वर्षे अध्यापनाचे कामही केले. तसेच, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ व मराठी भाषेच्या अभ्यासक डॉ. मॅक्सिन बर्नसन यांच्यासोबत फलटण तालुक्यातील प्राथमिक शाळांवर ‘वाचन लेखन प्रकल्प’ व ‘इंग्रजी सुधार प्रकल्पावर’ त्यांनी काम केले. या काळात त्यांना डॉ. मॅक्सिन बर्नसन यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.
पत्रकारितेतील प्रगल्भ आवडीमुळे प्रा. विकास शिंदे यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाकडून वृत्तपत्रविद्या व जनसंज्ञापन विषयात पदवी संपादन केली. गेली पंधरा वर्षे त्यांनी पत्रकारितेत विविध नियतकालिकांसाठी व दैनिकांसाठी सातत्याने लेखन केले आहे. साप्ताहिक लोकजागर, साप्ताहिक विचार संगम, फलटण अंजन, दैनिक शिवसंदेश, दैनिक स्थैर्य आणि एकता दर्शन यासाठी त्यांनी विपुल लेखन केले आहे. या प्रवासात त्यांना ज्येष्ठ पत्रकार रवींद्र बेडकिहाळ, स्व. दिलीप रुद्रभटे, स्व. प्रा. रमेश आढाव, दिलीपसिंह भोसले आणि बबनराव क्षीरसागर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. मागील तीन वर्षांपासून ते ‘लोकमत’चे फलटण प्रतिनिधी म्हणून काम पाहत असून, त्यांच्या बदल घडवणाऱ्या बातम्या नेहमीच समाजाभिमुख राहिल्या आहेत. सध्या प्रा. विकास शिंदे हे भारतीय पत्रकार संघाचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष म्हणूनही कार्यरत आहेत.
प्रा. विकास शिंदे यांना लहान वयातच ज्येष्ठ समीक्षक व विचारवंत ग. प्र. प्रधान यांचे मार्गदर्शन व सहवास लाभला. हडपसर येथील सानेगुरुजी हॉस्पिटलमधील वास्तव्यादरम्यान ग. प्र. प्रधान सरांनी प्रा. विकास शिंदे यांचे लेखन गुण ओळखून त्यांना वाचलेल्या पुस्तकांच्या समीक्षा लिहिण्यास सांगितले. यातूनच त्यांचे ‘ज्ञानबोध’ हे समीक्षात्मक पुस्तक आकाराला आले आणि ते अल्पावधीतच लोकप्रियही झाले. यापूर्वी संस्कार भारती, फलटणने त्यांचा ‘वाळूचे घर’ हा बालकविता संग्रह प्रकाशित केला आहे. लवकरच प्रा. विकास शिंदे यांची शिक्षण या विषयावरील ‘पहिल्या बाकावरची मुलं’ ही दीर्घ कादंबरी प्रकाशित होणार आहे. तसेच, ‘साखरशाळेतील मुलांचा शैक्षणिक अभ्यास’ या विषयावर त्यांनी इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठाकडे आपला शोधनिबंध सादर केला आहे. ते फलटण येथील साहित्य परिषदेचे सदस्य असून, साहित्यिक विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी त्यांनी ‘साहित्य संवाद’ नावाचे व्यासपीठही तयार केले आहे, ज्यामध्ये त्यांना प्रा. ताराचंद्र आवळे आणि रानकवी राहुल निकम यांची मोलाची साथ मिळत आहे.
महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा पुढे घेऊन जाणारा एक प्रगल्भ साहित्यिक आणि पत्रकार म्हणून प्रा. विकास शिंदे यांच्याकडे पाहिले जाते. ते स्वतः थेट राजकारणात सक्रिय नसले तरी समाजाभिमुख पत्रकारितेबरोबरच सामाजिक एकता व बंधुता टिकवून ठेवण्यावर त्यांचा भर असल्याने राजकारणातही त्यांची भूमिका महत्त्वाची राहिली आहे. जात, धर्म, पंथ यापलीकडे माणसाला माणूस म्हणून जगू द्यावे, या उदात्त विचारामुळे सर्वच जाती-धर्मांतील लोक त्यांच्याशी जोडले गेले आहेत. सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी सातत्याने लेखणी चालवणारे प्रा. विकास शिंदे हे नव्या पिढीच्या पत्रकारांसाठी खऱ्या अर्थाने एक दीपस्तंभ ठरले आहेत. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना निरोगी आणि यशस्वी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
(लेखक: हिंदुराव गायकवाड, सहसंपादक – समर्थ २४ तास न्यूज नेटवर्क, फलटण)
