स्थैर्य, कोळकी, दि. 11 : कोळकी ग्रामपंचायत निवडणूकीत आपल्या राजे गटाने जे अधिकृत उमेदवार उभे केले आहेत त्यांच्याच पाठीशी उभे राहण्याची सर्वांनी भूमिका घ्यावी. आतमध्ये, बाहेर असा भेदभाव राजेगटात नसून जे अधिकृत उमेदवार आहेत फक्त आणि फक्त त्यांनाच आमचा पाठिंबा आहे. प्रभाग क्रमांक ६ मध्ये व इतर काही ठिकाणी राजे गटातून बाहेर जाऊन बंडखोरी करत काही जणांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत. त्या सोबतच ते बंडखोर जनतेमध्ये संभ्रम निर्माण करीत आहेत. तरी बंडखोरांना अजिबात थारा देवू नका. कोळकीचा विस्तार होत असल्याने आगामी ५ वर्षांमध्ये कोळकी ग्रापंचायतीचे रूपांतर हे नगरपंचायतीमध्ये करायचे आहे, असे प्रतिपादन सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केले.
कोळकी ग्रामपंचायत निवडणूकीतील राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित राजे गटाचे प्रभाग क्रमांक ६ मधील अधिकृत उमेदवार तुषार नाईक निंबाळकर, राधिका पखाले व तेजश्री मुळीक यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत श्रीमंत संजीवराजे बोलत होते. यावेळी पंचायत समिती सदस्य सचिन रणवरे, ज्येष्ठ नेते दत्तोपंत शिंदे, माजी नगराध्यक्ष पांडुरंग गुंजवटे, नगरसेवक किशोरसिंह नाईक निंबाळकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
गेल्या अनेक वर्षांपासून कोळकी ग्रामस्थ ना.श्रीमंत रामराजेंच्या नेतृत्त्वामागे ठामपणे उभे राहिले आहेत. कोळकी गावात झपाट्याने अमुलाग्र बदल झाले आहेत. फलटण शहराची वाढ कोळकीमध्ये व्हावी अशीही मागणी होत असते. गावात मतदारांपेक्षा बाहेरुन येणारे लोक जास्त आहेत. कोळकीच्या समस्यांना सामोरे जाताना त्या योग्य प्रकारे हाताळल्या तर त्यात यश येईल. या ठिकाणी पाण्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे. नळ पाणी पुरवठा योजना आपण केली. ही देखील योजना आपल्याला कमी पडणार आहे. त्यात आणखीन सुधारणा करावी लागणार आहे. भूमीगत गटार योजनेसाठी सातारा जिल्ह्यातून कोळकी गावाची निवड झालेली आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे या ठिकाणी सुविधा कमी पडतात मात्र ना.श्रीमंत रामराजेंच्या नेतृत्त्वाखाली विकासकामे कशी मार्गी लागतील यादृष्टीने काम करण्याचा आमचा मानस आहे असे सांगून आपल्या सर्व अधिकृत उमेदवरांना आपण प्रचंड मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहनही श्रीमंत संजीवराजे यांनी यावेळी केले.