दैनिक स्थैर्य । दि.०७ मार्च २०२२ । मुंबई । मुंबईत अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या भेडसावत होती. आता एमएमआरडीए, महानगरपालिका यांसह सर्व संबंधित यंत्रणांच्या माध्यमातून वाहतूक जंक्शनच्या जागेचा कल्पकतेने उपयोग करून वाहतूक सुरळीत केली जात आहे. याचबरोबर नागरिकांसाठीही सुविधा निर्माण केल्या जात आहेत. कलानगर प्रमाणेच मुंबईत सर्वत्र अशा सुविधा निर्माण करून मुंबई सुंदर बनविली जाईल, असे पर्यटन मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
वांद्रे पूर्व येथील कलानगर जंक्शनच्या सुधारणा व सौंदर्यीकरणाच्या कामाचा आज पर्यटन मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी परिवहन मंत्री अनिल परब, आमदार झिशान सिद्दीकी, नगरसेवक रोहिणी कांबळे, स्थानिक लोकप्रतिनिधी, एमएमआरडीएचे आयुक्त एसव्हीआर श्रीनिवास आदी उपस्थित होते.
कलानगर येथेच आपला जन्म झाल्याने या परिसरातील स्थित्यंतरे आपण पाहिली आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही या परिसरातील वाहतूक कोंडीवर उपाययोजना करण्याच्या सूचना केली होती. त्यानुसार कलानगर जंक्शनचे रूप बदलले असून याचा वाहनधारकांसह रहिवाशांना निश्चित लाभ होईल, असा विश्वास श्री ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला. बीकेसी या जागतिक व्यापार केंद्राचे हे प्रवेशद्वार असल्याने मुंबईच्या आंतरराष्ट्रीय सिस्टर सिटींचे झेंडे येथे उभारण्याचा मानस असल्याचेही ते म्हणाले.
एमएमआरडीएमार्फत उड्डाणपुलांच्या खाली आणि वाहतूक बेटावर सुशोभिकरणाचे हे काम करण्यात आले आहे. सुशोभिकरणाच्या या कामांमुळे अतिशय व्यस्त असणाऱ्या कलानगर जंक्शनवर वाहतूक सुरळीत होऊन नागरिकांना सुविधायुक्त अतिरिक्त जागा वापरण्यास मिळणार आहे.
कलानगर जंक्शनचे क्षेत्रफळ सुमारे ८६९० चौरस मीटर आहे. कलानगर जंक्शनवर मोठ्या संख्येने वाहतूक सुरू असते. त्यामुळे पादचाऱ्यांसाठीही ते धोकादायक होते. यावर मात करण्यासाठी एमएमआरडीएमार्फत या परिसराचा विकास करण्यात आला आहे. यामुळे वांद्रे रेल्वेस्थानक आणि वांद्रे कुर्ला संकुलाकडे जाणाऱ्या पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी सुरक्षित मार्ग उपलब्ध होईल.
कामाचे स्वरूप
कलानगर जंक्शन येथे उत्तर प्लाझा, दक्षिण प्लाझा आणि बेट प्लाझा अशा तीन बेटांचा विकास करण्यात आला आहे. यामध्ये लँडस्केपिंगसह आधुनिक पद्धतीचे पाण्याचे कारंजे, बसण्यासाठी ग्रेनाईटचे बाक, फूटपाथ आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सद्यस्थितीत असलेल्या झाडांभोवती सुशोभिकरणाद्वारे कुंपण घालण्यात आले आहे. याशिवाय विद्युत शिल्प, विविध प्रकारची फुलझाडे, मुलांना खेळण्यासाठी जागा या बाबी सुद्धा येथील आकर्षणाचे केंद्र ठरणार आहेत.
यामुळे उड्डाणपुलांच्या खालील मोकळ्या जागेचा योग्य वापर होऊन नागरिकांसाठी सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. ज्येष्ठ नागरिक तसेच दिव्यांग व्यक्तींना देखील या जागेचा सहज आणि सुरक्षितपणे वापर करता येईल याची दक्षता घेण्यात आली आहे. पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी सुलभता व्हावी यासाठी पुरेशी जागा उपलब्ध करून देण्यात आली असून त्यादृष्टीने बेटांवर पुरेशी विद्युत व्यवस्थाही उभारण्यात आली आहे.